स्मृतींचा हिंदोळा
दिवेलागणीची वेळ. एका शांत संध्याकाळची उतरती उन्हे. संध्याप्रकाशाचे कवडसे सांभाळत झाडाची पाने एक एक कवडसा अलगद हलवून लाकडी गजाआड सांडत राहिलेली. लहानपणी आजी बसायची त्या व्हरांड्यात लाकडी गज समोर बाजूला होते आणि आतल्या बाजूला दोन आरामखुर्च्या - त्यातली एक लहान, एक मोठी - समोरासमोर गजांना लागून ठेवलेल्या असत. उरलेल्या जागेत आणखी दोन खुर्च्या असत. त्या जरा भक्कम पण लाकडीच होत्या. हिरव्या रंगाचे जाड कापड आणि आत स्प्रिंग आणि भुसा भरलेला अशा. ह्या दोन खुर्च्यांवर बसले की त्या स्प्रिंगमुळे वाजायच्या आणि आमचा आपला एक खेळ व्हायचा. एका खुर्चीवर आजीची मनीमाऊ, तिचे नाव पेशवीण, अगदी बिनधोक बसलेली असायची. तिला एक हक्काची मऊ उशी आजीने बसायला दिली होती. अगदी शांत निद्रेत गहन विचार करत असल्यागत दिसायच्या पेशवीण बाई! आज त्या व्हरांड्यात उभे राहून समोर पाहताना सगळे आठवत आहे. दुपारी आरामखुर्चीत बसून आजीचे स्त्री आणि किर्लोस्कर ह्या मासिकांचे वाचन चालायचे. तिच्या वाचनात शक्यतो खंड पडायचा नाही. बाहेर रस्त्यावर काही ठराविक आवाज येत. बैलगाडीच्या चाकांचा, रस्त्यावरून जाण्याऱ्या गाईंच्या हंबरण्याचा, लां...