काही खटकलेले..


      मनात आलेले खूप दिवस मांडायचे राहून जात होते मग अगदी ठरवून आज काही मनात बोचणारे लिहायचे ठरवले.तसे आणखीनही विषय आहेत पण जे ह्या गेल्या काही दिवसात जास्ती जाणवले ते इथे मांडते आहे.
          काव्य आणि विनोद ह्याहून वेगळे,थोडेसे जाणवणारे,कुठेतरी खोल रूतणारे आणि प्रश्न निर्माण करणारे काही....आणि काही अनुभवातून जाणवलेले सत्य.
        'कोरडेपणा जगातला वाढत जातो आहे'
अगदी 'खटखटीत कोरडेपण'.सगळीकडे उन्नती असूनही असूया जास्त दिसते.सतत एकमेकांशी स्पर्धा करत राहणे म्हणजे प्रगती आहे का?
      अपेक्षा मग त्या अर्थार्जनाच्या असोत किंवा आणखीन कोणत्याही त्या जर पूर्ण झाल्या नाहीत तर माणसाला स्थैर्य नाही.मुलभूत गरजा भागून पूर्वी मंडळी खुश असत...किंवा तसा प्रयत्न असे..पण आज गरजा आपला जबडा विस्तारत जात आहेत...आणि माणूस त्यामुळे पूर्णपणे त्या जबड्यात अडकत चालला आहे.महागाई वाढली पण पगार देखील वाढलेच कि..जे जमणार नसेल त्याच्यापाठी लागून आलेले सोन्यासारखे दिवस आणि क्षण फुकट घालवले जातात.किती तो कामाचा बोजवारा!!कधी कधी स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवल्या जातात.मोठ्या पगाराची नोकरी हवी..मान्य.आणि मग तशी नोकरी टिकायला हवी..अशी नोकरी मिळाली कि त्या सगळ्याला साजेसे घर लगेचच गाडी लगेचच सगळे हे जे 'लगेचच'आहे न ते संपत नाही.तुफान मेल आहे ती,आणि मग अर्थात त्या एका वर्गात(स्टेटस) प्रविष्ठ झालात कि तिथले नियम पाळावे लागतात..समाजातली आपली उन्नती टिकायला आणि झालेली लोकांना दाखवण्याकडे प्रचंड कल असतो.मला अस वाटायचे कि कोणाची प्रगती लपून राहत नाही ती दिसते,जरी स्वमुखाने सांगितले नाही तरी कळू शकते.आज सगळीकडे सुज्ञ लोकांचा वावर आहे.मग अश्या लोकांमध्ये दिखाऊपणा का असावा? स्वतःचे गोडवे स्वतःच्या तोंडून गाणारी लोक पहिली कि मग वेगळे वाटते..पटत नाही.४ लोक भेटले कि नुसत्या पैश्यांचा गप्पा..एकमेकांकडे किती पैसे आहेत,कोणती गाडी आहे,किती मालमत्ता आहे ह्याचे वर्णन करून काय होते?हा आनंद क्षणिक टिकणारा..आणि परत दुसऱ्या मिनिटाला आपल्याकडे कमीच आहे ह्याची जाणीव करून देणारा..परत असे बोलणे म्हणजे त्यात काहीच वावगे नाही असेही अनेकांना वाटते...स्वतःकडे काय आहे हे सांगून वाढत नाही..इतरांनी त्याचे न सांगता स्वतःहून पाहून कौतुक केले तर विशेष! नाही का?
     मी मागच्या पिढीकडे पाहते.काहींना कित्येक गोष्टी करता आल्या नाहीत..आल्या नसतील,खंत असेल कुठे तरी ,पण तरीही त्यांच्या मुलांना ते कधी तितकेसे जाणवले नाही.आई वडील कुरबुर करताना मुलांपुढे विचार करत.कदाचित आज इतका ताण नोकरीच्या ठिकाणी इतरत्र त्यांना नसावा..मुलांपुढे प्रश्न म्हणून गोष्टी आणून,लहानग्या वयात उभ्या करणे,असे नकळत घडताना आजूबाजूला दिसते आहे.ह्याला सर्व माध्यमे पण तितकीच जबाबदार आहेत..एक क्लिक केले कि जालाचे महाप्रचंड माहिती दान करणारे माध्यम,दूरदर्शन,दूरचित्रवाणी..ह्यांचे विस्तारलेले जग,शिवाय वृत्तपत्रे...लहानग्यांचे आयुष्य आधीच अभ्यास आणि क्लासेसच्या मागे धावते आहे त्यात त्यांना अनेक नको त्या गोष्टी कळू लागल्या आहेत,दिसत आहेत.
    आता फेसबुकचे उदाहरण..खरेतर आई वडिलांनी जालावर मुलांना कितपत जाऊ द्यायचे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे पण तरीही असे वाटते कि जितके योग्य तितकेच आईवडील नक्कीच ठरवू शकतात..मुलांना जरी वाटले आपले पण फेसबुक प्रोफाईल असावे,पण आई वडिलांनी जर नीट समजावून सांगितले कि ते योग्य ठरेल का लहान वयात,आणि वयाची एक मर्यादा दाखवून देऊन त्यांना जालाच्या फार जवळ जाऊ न देणे हे योग्य नाही का ठरणार? इकडे परदेशात अभ्यासासाठी जालाच्या माध्यमाचा शाळेतून वापर केला जातो आहे, अर्थात हे जगात आता सर्वत्र आहे, पण नक्कीच ह्या सगळ्या गोष्टींकडे योग्य लक्ष देता येऊ शकते...नको ते आणि नको त्या वयात मुलांना समजू लागले तर ते मात्र चूक आहे.
        आता विषय बदलते..परवा बस मधून लहानसा प्रवास घडला.बस मध्ये चिकार गर्दी होती पण अर्थात ढकलाढकलीचा मामला नाही.इकडे सुरवातीच्या काही जागा वयोवृद्ध व्यक्तींसाठी असतात हे माहित असून काही मंडळी तिकडे बसलेली.गाडीत २ अजीबाया चढल्या..असतील ७० ते ८० पण ह्यातले कोणीही उठून त्यांना जागा द्यायला तयार नाही.अर्थात हे हल्ली खूप ठिकाणी आढळते.उभ्यांपैकी एका व्यक्तीने बसलेल्यांपैकी २ व्यक्तींना शेवटी ह्याची जाणीव करून दिली आणि मग योग्य परिणाम झाला,पण स्वतःहून सुचणे आणि दुसऱ्याने सांगणे ह्यात फरक आणि आज स्वतःसाठी आपण जर इतके समंजस वागू शकतो तर मग दुसऱ्यासाठी का नाही?काही जण असेही म्हणतात कि एखाद्याला उठून जागा दिली तर अपमान वाटू शकतो,खरे आहे मलाही असा एक अनुभव आलेला आठवतो,एका आजींना जागा देऊ केली तर त्या मला म्हणाल्या,"तुला मी इतकी म्हातारी वाटले का कि मी उभी देखील राहू नाही शकत?"..त्यांचे ते उद्गार ऐकले,थोडे वाईट वाटले,पण मग मी जेव्हां आजूबाजूला बसलेल्या इतर प्रवाश्यांकडे पहिले तेव्हां मला जाणवले कि माझे काहीच चुकलेले नाही हे भाव त्यांच्या डोळ्यात होते..आजींनी मी त्यांना बसायला जागा दिली हे अपमानास्पद घेतले..खरेतर जे सरळ अर्थाने घ्यायचे ते तिरक्या अर्थाने का बरे घेते जग?
     'माणुसकी' म्हणतात ती हरवत जाते आहे हे नक्की.हे विचार आले कि वाटते आणखीन माझ्यासारखी मंडळी असतील का कि ज्यांना हे जाणवत असेल.
     इकडे रस्ते स्वच्छ आणि प्राण्यांचा वावर रस्त्यात नसतो,तीन ते चार पदरी आणि शिवाय गर्दी खूप नाही तरी सर्वांना कुठेतरी जायची मरणाची घाई असे का? त्यात सिग्नल तोडले जातात,कधी कधी बेदरकारपणे कट मारून पुढे जाणे,नियम पाळून गाडी चालवणारे कोणी असेल तर त्याच्याकडे रागाने पाहून,कधी हॉर्न वाजवून किंवा रागाने बोटे दाखवून त्याचा अपमान करणे चालते.गाडीला पाठीमागून खूप जवळ येऊन ज्याला इकडे 'टेल गेटिंग' म्हणतात तो प्रकार करणे...हे सुधारलेले जग पण अश्या बेदरकार वृत्तीमुळे गाडी चालवणे हे किती जणांना आज मनापासून आवडते? रस्त्यात शांतपणे आनंदाने प्रवास करणे,नियम पाळणे ह्यात तरी काहीच चूक नाही...आपले वाहन विशेष जोरात चालवण्याचे कसब दाखवण्यासाठी highway ची विशेष सोय केलेली असतेच इथे.कोणी टर्न घ्यायला उभा असेल तर त्याला हॉर्न देऊन भंडावून सोडणे...घाई करणे हे देखील दिसते आजूबाजूला..मला देखील गाडी वेगात चालवणे आवडते,पण साध्या रस्त्यात मात्र त्या माझ्या उर्मीला मी आवर घालते...
     हल्ली सगळ्यांकडे सेल फोन आले आहेत.उत्तम सोय आहे पण ते हातात ठेवून एका हाताने गाडी चालवणारे महाभाग पाहिले आहेत मी. तसेच हंड्सफ्रीची सोय ती तरी मदत करते का तर,नुसता विचार करा काहीतरी महत्वाचे किंवा काळजी निर्माण करणारे,किंवा वाद विवाद हे शेवटी फोन वर गाडी चालवत असताना चालणे योग्य आहे का?संवाद कोणताही असो गाडी बाजूला उभी करून मगच तो फोन वर पूर्ण करावा असा मला वाटते...'आपल्या जीवना इतकच,इतरांच्याही जीवनाला महत्व दिले तर काहीच वावगे नाही'.
    'कशातच काहीच गैर नाही उरले'असे काहीसे आपापल्या सोयीनुसार सगळीकडे जाणवते आहे.जे पूर्वी चूक म्हणंत ते आजकाल नरोवा कुंजरोवा सारखे गुपचूप घडते आहे.खरेतर वृत्तपत्रांमध्ये, अश्या तऱ्हेचे अनुभव येत असावेत...तुमच्या कानावर अश्या तऱ्हेचे अनेक वेळा येऊन गेले असावे,किंबहुना ह्याबाबत तुम्ही देखील नाराज असाल आणि विचार केला असेल...पण राहून जाते..लिहिणे बोलणे आणि काही गोष्टी टाळणे..पण मनातले बोलणे जे खटकते त्याचा विरोध करणे आपल्या हातात असते आणि योग्य तर्हेने ते घडलेच पाहिजे.
तुम्हाला काय वाटते जरूर सांगा......
शिवाय असे अनुभव वरील लेखायोग्य देखील सांगा जे मनाला टाचणी लावून गेले असतील....

टिप्पण्या

  1. खरंय हल्ली कोरडेपणा वाढत चाललाय. कोरडेपणा हा अतिशय योग्य शब्द वापरलात. पुण्यात शिवाजीनगरच्या पुढे पाटील इस्टेटला पोलीस असल्याशिवाय कधीच सिग्नल पाळला जात नाही. हा रोजचा अनुभव आहे. पोलीस नसेल तर लोक सिग्नल नाहीचे या अविर्भावात चाललेले असतात. बसमध्ये तर राखीव जागांचे नियम म्हणजे मोठा विनोद आहे. आणि बसवाले फक्त नियम करतात, पण त्यांची अंमलबजावणी होते की नाही हे तपासायला कोणी नाही. "नो स्मोकिंग" झोन मध्ये पाट्या लावलेल्या असूनही सर्रास स्मोकिंग केले जाते. एकदा एकाला ती पाटी दाखवल्यावर निर्लज्जपणे तो म्हणाला "हमे पढना आता है", मग म्हटलं फक्त वाचतात येतं, की वाचलेलं काही डोक्यातही शिरतं. या सगळ्यावर विचार केला की मन सुन्न होऊन जातं....

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद इंद्रधनू...शिवाय तुमचा अनुभव देखील कळला.
      तुमच्या अनुभवाकडे पाहता पुण्यातले,शहरातले सुधारलेले जग आणि ट्राफिक सिग्नल साठी तर फक्त कमीतकमी माहिती हवी..जर गाडी ठेवता येते लोकांना तर मग नियम पण माहित असतीलच नाहीका?
      आणि तुम्हाला 'पढ़ना आता है' असे ठणकावून सांगणारा मग जसे तुम्हीं म्हणालात तसेच तरीही ह्या व्यक्तीच्या डोक्यात प्रकाश का बरे पडू शकत नाहीये? बेदरकार वृत्ती.. हे मला वाटते ह्याचे उत्तर असावे...
      शहरातले असो किंवा गावातले असो शिक्षण माणसाला सुबुद्द्ध बनवते असे जर आपण धरले तर मग प्रगती हळूहळू सगळीकडे होईलच...मनात एक येते चुकीच्या दिशेने प्रगती होऊ लागली,तर मात्र ते नको आहे. पाश्चात्य संस्कृतीचे चुकीचे अनुकरण हा देखील एक मुद्दा ह्या लेखात मी घालण्याच्या विचारात होते.

      हटवा
    2. अवांतर आहे, क्षमस्व... पण एक विनंती आहे की तुम्ही माझ्याशी एकेरीत बोला... :)

      हटवा
    3. अग इंद्रधनू तू मला ताई म्हणतेसच कि मग?...एकमेकांना आदराने बोलावले तर मला तरी त्यात काहीच चूक नाही वाटत...पण ठीक आहे ह्यापुढे तुला एकेरीत हाक मारायची मी तर मग तू देखील मला 'तुम्हीं' न म्हणता 'अग ताई' म्हण ते जास्त आवडेल.

      हटवा
  2. परिचित आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! वाहन चालकाने स्वतःची काळजी घेणे आणि त्यासोबत इतरांचाही विचार करणे महत्वाचे पण,नियम हे पाळण्यासाठी नसतात असे काहीसे दिसून येते आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. श्रिया, खरं म्हणजे समाजाच्या सर्व काळात हा कोरडेपणा काही (अनेक) लोकांच्या अंगी असतोच. आपण मोठे झालो की आपलं 'सुरक्षित विश्व' (हे सुद्धा वाट्याला येत नाही काही लहानांच्या) सोडून बाहेर जावं लागलं की जास्त जाणवत. मला वाटत चांगल्या गोष्टी दिसायला लागल्या की कोरडेपणाचा त्रास कमी होतो. दिल्ली मेट्रोत रोज मी असंख्य तरुण मुलींना आपण होऊन वृद्ध स्त्रियांना, लहान मुले सोबत असलेल्या स्त्रियांना, आजारी असणा-या स्त्रियांना त्यांची जागा देताना पाहते - तेव्हा अगदीच काही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही इतका दिलासा मला मिळतो.

    उत्तर द्याहटवा
  4. सविता ताई तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! तुम्हीं म्हणता तसे अगदीच परिस्थिती हाताबाहेर अजूनही गेलेली नाही हे नक्की.पण आधुनिकीकरणामुळे माणूस बराच बदलला,आणि दिवसेंदिवस कोरडेपणा वाढतो आहे असे मला जाणवले.
    बदलता काळ,प्रत्येक पिढीला नवीन काही प्राप्त होते आहे. फायदे आहेतच पण ज्या गोष्टी आपल्याला थोडासा बदल केला तर सावरून घेता येतील अश्याहि जेव्हां लोक सरळ स्वार्थापोटी दिसतच नाही असे करतात,ते पटत नाही.

    उत्तर द्याहटवा
  5. खरंय गं मोनिका.... मला तर बऱ्याचदा असं वाटतं की हे आज काय सुरू आहे सगळीकडे....??? निदान चांगुलपणाने वागणे हेही आजकाल एवढं दुष्कर झालंय का...??? n u pointed it correctly...
    मी इथे एक मला आलेला मेसेज शेअर करू इच्छिते...
    "Dont try to be different... Just be Good....
    Because these days Being Good is different..!!"

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. चैताली तू म्हणतेस ते बरोबर आहे...आणि शेवटी जे वाक्य आहे तुझ्या प्रतिक्रियेच्या ते पण आवडले.."Dont try to be different... Just be Good....
      Because these days Being Good is different..!!"
      आपण चागले वागणे हे आपल्या हातात आहे...इतरांच्या वागण्यावर जोर नाही...आणि अपेक्षा करण्यात पण अर्थ नाही.
      चांगले वाईट दोन्ही आहे आजूबाजूला....आणि आपण विचार करणारी मंडळी...सोडून देऊन पुढे जातो कधी कधी पण कधीतरी काही खटकते....तेच ह्या लेखात लिहिले...
      तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ