एक संवेदनशील कलाकृती!

       

           एक लहानस गाव.गावात यशोदेचे लहानसे घर.घरासमोर विहीर आणि गोठ्यात गाय आणि वासरू...यशोदा गरीब पण स्वाभिमानी.स्वतःचे मूल नसताना प्रेमाने सवतीच्या मुलीचे,सुरेखाचे करणारी,तिच्या आजारासाठी ऑपरेशनचे पैसे जमवण्यासाठी खूप मोठा निर्णय घेऊन बसते.यशोदेचा नवरा तिला सोडून निघून गेलेला असतो. शेतात कष्ट करून आपले आणि सुरेखाचे करणारी यशोदा मोठ्या जिद्दीची दाखवली आहे.मेरी नावाची एक गोरी आणि तिचा नवरा परदेशातून भारतात येतात.बाळंतपणाची भीती आणि सौदर्य कमी होते म्हणून स्वतःच्या गर्भात हे बाळ मोठे न करता यशोदाला हि जबाबदारी देणारी गोरीपान सोनेरी केसांची मेरी यशोदाला समजून घेण्यासाठी तिच्यासोबत तिच्या घरी राहते.डॉक्टर बाई यशोदाला सगळे काही व्यवस्थित समजावून देतात.'सरोगेट मदर' म्हणजे काय हे जाणून घेऊन फक्त स्वतःच्या लेकीसाठी,इतकी मोठी गोष्ट करायला तयार झालेली यशोदा,मेरी सोबत देशाबाहेर न जाता स्वतःच्या घरातच राहण्याचा निर्णय घेते आणि मेरीला,अनेक गोष्टी नव्याने शिकवते...मेरीचा नवरा परत जातो पण मेरी मात्र माघारी यशोदा सोबत म्हणजे अर्थात,यशोदाच्या गर्भात दिवसागणिक वाढणाऱ्या तिच्या बाळासाठी भारतात राहते.

दिग्दर्शिकेने ह्या चित्रपटात काही गोष्टी थोडेसे विनोद घडून मनोरंजन व्हावे म्हणून घातल्यासारख्या आहेत..असे जाणवते,जसेकी अगदी सुरवातीची मेरी आणि गावकऱ्यांची भेट,गावातला यशोदेला अक्का म्हणणारा आणि बहिणीची माया करणारा गणपत,गणाच्या प्रेमात पडलेली त्याची मैत्रीण आणि तिचा आणि मेरीचा नाच.
   
मेरी,यशोदेला समजून घेते.यशोदेचे रोजचे कामच तिला तिच्या गर्भारपणात कसे योग्य व्यायाम देते ते पाहते.तिचा आहार कसा आहे,तिचे डॉक्टरकडे जाण्याचे दिवस असतात,तेव्हां मेरी तिला सोबत करते..कराराप्रमाणे नऊ महिन्यांनी झालेले बाळ मेरी आपल्या सोबत न्हेणार आणि यशोदेला तिचे पैसे मिळणार असे ठरलेले असताना एक धक्कादायक बातमी कळते....डॉक्टरांच्या रिपोर्ट प्रमाणे यशोदेच्या गर्भात वाढणाऱ्या बाळात दोष आढळतो....आणि मग काय! मेरीला हे कळताच ती एका फटक्यात एक निर्णय घेते,परतण्याचा...
.
यशोदेला सांगते,"मूल झाले कि अनाथाश्रमाला देऊन टाक,काहीही कर पण मला नको"....हि चित्रपटाला दिलेली कलाटणी,सुंदररित्या दिग्दर्शिकेने हाताळली आहे..मुळात ह्यात यशोदेच्या मनातली चलबिचल,तिचे मेरीशी झालेले संभाषण,उद्वेगाने,रडत ती मेरीला ,"आई म्हणून कसे काही तुला वाटत नाही?" हे विचारात राहते....पण मेरीचा विचार कायम असतो.तिला हे मूल नको...आणि ती यशोदेला पैसे देऊन निघून जाते..
पुढे काय? डॉक्टर बाई यशोदेला समजावतात,"सुरेखाची जबाबदारी असताना,आणखीन एक वाढवणे कठीण..मेरी म्हणते त्याचा विचार कर ",असे सुचवतात.पण यशोदा मात्र आपल्या निर्णयावर कायम असते...यशोदेचा निर्णय योग्य होता का?चित्रपटात पुढे काय होते? हे जाणून घेण्यासाठी 'मला आई व्हायचं 'हा चित्रपट पाहायला हवा.
       
आता ह्या चित्रपटाच्या कथानकाबद्दल सांगण्यासारखे असे कि' हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे.मुळात सरोगेट मदर,तिच्या भावना,पैश्यासाठी अश्या तर्हेचे मोठे निर्णय एक स्त्रीला घेण्याची वेळ येते.मातृत्व कित्येकांना शारीरिक दोषामुळे नैसर्गिकरीत्या नाकारले जाते,मग पैसे असतील तर असे मार्ग अंगिकारले जातात.एखाद्या गरीबाची नड भागते आणि श्रीमंताला पुत्र सुख मिळते.ह्या चित्रपटाला २०११ चे National film award मिळाले असून,भारतातील ह्या वाढत्या सरोगेट मदर विषयावर हा चित्रपट प्रकाश टाकतो.
     
हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे 'समृद्धी पोरे' ह्यांनी.ह्यात यशोदाची भूमिका केली आहे 'उर्मिला कानेटकर' ह्या अभिनेत्रीने.आईच्या मनाची चलबिचल सुंदररित्या दाखवली आहे.पती सोडून गेलेला असताना,संयमित मनाने आराधना केल्यासारखे आपले घर सांभाळणारी एक गावातली सरळ,कष्टाळू यशोदा खूपच सुंदर उभी केली आहे उर्मिलेने.इतक्या लहान वयात इतका सशक्त अभिनय करणारी उर्मिला,दिग्दर्शिकेची योग्य निवड वाटते.गणपतच्या भूमिकेत विवेक राऊत आहेत,ज्यांनी यशोदा अक्काचे मन जाणले आहे.चित्रपटाच्या काही प्रसंगांमध्ये आपण पहालच कि गणपतचा अभिनय छान झाला आहे.यशोदा आक्काच्या पाठीशी उभे राहणारा गणपत हे ह्या चित्रपटातील एक मुख्य पात्र आहे.शिवाय मेरीच्या भूमिकेत अमेरिकन अभिनेत्री स्टेसी बी ह्या थोडी बोली मराठी शिकून अभिनय करताना दिसतात.इतर कलाकारांमध्ये लहानगा चुणचुणीत,एडन बार्कले आपल्या बोबड्या मराठीत बोलून आपली अभिनय क्षमता दाखवतो.तर लहानश्या भूमिकेत सुलभा   देशपांडे,सुचित्रा बांदेकर हे कलाकारही दिसतात.कलाकारांची योग्य निवड दिसून आली.चित्रपटात बोलण्यात येणारी मराठी विदर्भातली.जे गाव दाखवले आहे ते अमरावती जिल्ह्यातले...लोकांची वेशभूषा आणि बोली भाषा मराठीचे रांगडेपण कानावर येते.

चित्रपट मध्यंतरानंतर खरी पकड घेतो.मूळ कथानक अतिशय प्रयत्नपूर्वक योग्य प्रसंगांतून मांडले आहे...आईची माया किती हळवी असते,पण वेळी कठोर पण होऊ शकते...'त्याग' हा मुळी त्याचा पायाच आहे! मातेचे प्रेम,वात्सल्य, हे निरपेक्ष आणि फक्त मुलाच्या भल्यासाठीच असते.म्हणूनच त्याची तुलना कशाशीही  होऊ शकत नाही आणि मातेची जागा कोणीही घेऊ शकत नाही! हे हा चित्रपट दाखवून देतो....डोळ्यात पाणी उभे करणारा आणि कमीतकमी वेळात काही गोष्टी शिकवून जाणारा 'मला आई व्हायचं' पहावा असा आहे.एक उत्तम चित्रपट,एक उत्तम कलाकृती तयार होण्यासाठी अनेकांच्या कष्टांचे पाठबळ असते...आणि ह्या चित्रपटासाठी छायाचित्रण राहुल जाधव ह्यांचे तर कला प्रस्तुती श्री. संतोष फुटणे ह्यांनी केली आहे.
       मराठी दर्जेदार चित्रपटांच्या यादीत आता हळू हळू भर पडत आहे हे नक्की!
        आपल्याला हा चित्रपट पाहून काय वाटले नक्की सांगा....
-श्रिया  (मोनिका रेगे )
       

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ