उंच जाई झोका !


    
     हल्लीच 'उंच माझा झोका' ह्या मालिकेचे भाग पाहण्यात आले.कै.रमाबाई रानडे ह्यांच्या आयुष्यावर रेखलेली हि मालिका.कुतूहल होते,कारण अनेकांकडून ह्या मालिकेचे नाव ऐकले होते म्हणून पाहण्याचा मोह झाला.उत्तम सादरीकरण आणि अभिनय,दोन्हीचे पाठबळ लाभलेली हि मालिका पाहायला सुरवात केली आणि मग काय...पुढे पुढे पाहण्याची इच्छा,आणि रोज काहीतरी नवे शिकायला मिळते आहे असा अनुभव येत गेला.रमाबाईंचा जन्म जानेवारी १८६२ सालातला..त्यांनी त्या काळात स्वतः शिक्षण घेऊन स्त्रीशिक्षणाचा पुरस्कार केला तसेच 'सेवासदन 'ह्या संस्थेच्या मुख्य कार्यकर्त्या आणि 'हुजूरपागा' हि शाळा पुण्यात काढणाऱ्या सुधारक विचारांच्या रमाबाई,आणि त्यांचे पती न्यायमूर्ती.महादेव गोविंद रानडे ह्यांचे कार्य दाखवणारी हि 'झी मराठी' वरील  मालिका आहे.

       जुन्या स्वातंत्र्यपूर्व काळातले पुणे शहर,ते वातावरण,डोळ्यापुढे उभे केले आहे दिग्दर्शकाने.उत्तम मराठी,संस्कृत श्लोक आणि संस्कार ह्यांचे सुंदर दर्शन घडविले आहे.लहान यमुना किंवा रमा,तिचे माहेर,आई वडील भाऊ वाहिनी,आत्याबाई,दाजी आणि केशव ह्या सर्वांच्या एकमेकांसोबत असणाऱ्या नात्याला खूप सुंदर खुलवले आहे...ह्यातील प्रसंग पाहून बाळबोध वातावरण कसे असेल ते जाणवते.एकमेकांबद्दल अतीव आदर,पती पत्नी,आई मुलगी,आजी नात,भावंडांचे आपापसातले नाते; ह्या सर्वाला योग्य प्रसंग आणि संवाद ह्यांची साथ मिळाली आहे.रमेच्या भूमिकेत 'तेजश्री वालावलकर' ह्या लहानग्या धिटुकलीने कमाल केली आहे.भूमिकेत इतके समरस होऊन मन लावून काम करणे इतक्या लहान वयात जमतेच असे नाही.पण रमेच्या भूमिकेत अगदी छान वाटते तेजश्रीला पाहायला.तिचे बोलके डोळे,नऊवारी नेसून,पदर सावरत लाजत,मुरकत बोलणे,रुसणे आणि पटकन हसणे देखील....भावते.कधी कधी एकदम मोठ्या काकूबाई सारखे बोलणे,,,"माझी आई म्हणते"....अशी सुरवात करणे खूप आवडू लागले.

     
     तिच्या आईच्या भूमिकेत कविता लाड ह्या अभिनेत्री सुंदर अभिनय करतात.आई आणि मुलीचे आगळेवेगळे नाते,त्यातील भावना आणि शिस्त पाहायला मिळते.रुईच्या उडणाऱ्या म्हातारीशी गुजगोष्टी करणारी लहानगी रमा,आणि ह्याच रुईशी बोलून तिच्या आईने मुलीसाठी पाठवलेला निरोप सुंदर कल्पना! किती तो निरागस विश्वास ह्या कल्पनेपाठी! आजकालच्या जगात कृत्रिमता इतकी वाढते आहे...कि हे असले प्रसंग डोळ्यात पाणी उभे करतात.लहान सहान गोष्टीतून पूर्वी घरात स्वआचरणाने संस्कारांचे बीज कसे रुजत असे ते दिसते.रमाच्या वडिलांच्या भूमिकेत आहेत श्री. शैलेश दातार.समंजस पण शिस्तीचा पिता.आज सारखे मोकळे वातावरण त्या काळी नसल्याने मुलगी आणि वडील ह्यांचे नाते खूप आदरयुक्त आणि त्या काळाला अनुसरून असायचे असे वाटले.नाते समृद्ध कसे होईल आणि पुढील पिढीकडे हे संस्कार कसे जातील ह्याबाबत पण आपोआपच जागरुकता येत असावी.

          त्या कालखंडात सोवळे ओवळे,विधवा विवाहाला मान्यता नसणे,स्त्री शिक्षण पण पुरस्कारित नव्हते,शिवाय बालविवाहाची प्रथा पण होतीच.कर्मठपणा आणि रूढींना जपणे हे आपले परमकर्तव्य आहे असे मानून सगळा समाज वागत असे,ह्याचे दर्शन काही प्रसंगांमधून दिसते.पण सुधारक विचार कसे हळू हळू पगडा घेत गेले ते हि दिग्दर्शक दाखवत आहेच..कै.महादेव रानडे ह्यांची भूमिका करणारे कलावंत हि भूमिका छान करत आहेत.मवाळ  मतवादी असे रानडे सरकारी नोकरीत असूनही समाजसुधारणेचे आपले कार्य पार पाडताना दिसतात.परंतु घरातील वडील मंडळींच्या दबावाखाली येऊन विधवा विवाह करता जेव्हां रमेशी विवाह होतो तेव्हां त्याला झालेला विरोध हा पण दाखवण्यात आला आहे मालिकेत.विधवांची मानसिक स्थिती,केशवपन केलेल्या आणि कर्मठ विचार बाळगून पण मनाची होणारी त्यांची कुचंबणा मनात वेदना निर्माण करते.आज इतक्या वर्षांनी पूर्वीचे कर्मठ विचार,रूढी पाहून अनेक प्रश्न मनात डोकावतात.हे सगळे कडक नियम स्त्रियांनाच का बरे असेही वाटून जाते...जेव्हां एखादी लहानगी,कळायच्या वयाआधीच विधवा झालेली अशी आणि मग तिचे आयुष्य हे कसे खडतर असावे....पण हि मालिका ह्या सर्व गोष्टींवर प्रकाश पाडत पुढे जाता जाता सुधारणा कशी घडते आहे ते देखील दाखवत आहे...मनातल्या जटील रुढीपासून सुधारक विचारांच्या प्रवाहामुळे कशी वैचारिक वादळे येतात ते देखील दिसते.

       रमेच्या सासऱ्यांच्या भूमिकेत श्री.शरद पोंक्षे अभिनय करताना दिसतात.रमेची सासू,'माई'सावत्र असूनही आई इतकी माया तिला देताना दिसते,तर 'ताई काकू' म्हणजे रमेच्या चुलत सासूबाई मात्र तितक्याच कडक शिस्तीच्या.घरात दीर वयाने लहान आणि एक नणंद जी विधवा म्हणून परत आलेली.घरातल्या वडील मंडळीत आजींच्या भूमिकेत नीना कुलकर्णी नेहमी प्रमाणे सुंदर अभिनय करताहेत.
ह्यातील महादेव रानड्यांचा मोठा वाडा आणि देवघर दिग्दर्शकाने हे सर्व चित्र योग्य तऱ्हेने उभे केले आहे.शिवाय  जुनी मराठी कानावर येते.एकमेकांना मान देण्याची पद्धती प्रत्येक नात्यात जाणवते.

            लहानांनी काय शिकावे ह्या मालिकेतून ...आणि मोठ्यांनी काय...अनेकांची अनेक मते असावीत.काहींना असेही वाटत असावे कि हि मालिका आता ह्या काळात दाखवण्याची काय गरज?मला असे वाटते कि एखाद्या आदर्श व्यक्तीचे आयुष्य अश्या तऱ्हेच्या मालिकेतून पाहायला मिळाले तर काय वाईट! काही मालिका तर इतक्या रटाळ असू शकतात कि ते भागानंतर पाहीले तरी सहज समजू शकते कि नक्की काय घडले असेल..आधीच ह्या कथानकाची कल्पना आलेली असते...नुसती पुढे पुढे जाणारी कथा बास!,आणि त्यातले अतिरंजक प्रसंग...ह्याहून उजवी अशी हि' उंच माझा झोका' नक्कीच आहे..

'सास बहूप्रकारच्या आणि अनेक वादविवाद निर्माण होतील अश्या घरेलू मालिका लोक चवीने पाहतात मग हि मालिका जी जुन्यावर प्रकाश टाकून योग्य ते घ्या असा सल्ला देते ती नक्कीच पहावी.शिवाय ह्या मालिकेत सर्वच कलाकारांच्या भूमिका पण चांगल्या झाल्या आहेत कुठेही पाल्हाळ वाटत नाही...आणि मला सर्वात आवडते ते ह्या मालिकेचे सुरवातीला येणारे गीत..शीर्षक गीत...
हि मालिका साधी आहे, जुने वातावरण दाखवले आहे, कुठेही कथानक घसरत नाही आणि उगाच लांबण  पण जाणवत नाही शिवाय  सर्वांना पाहता येण्याजोगी आहे.
मला आवडलेले गीत खाली देते आहे जरूर पाहावे...

- श्रिया (मोनिका रेगे)

टिप्पण्या

  1. नुकताच मुंबईत आलेलो तेव्हा घरी आई न चुकता ही मालिका पाहते, त्यामुळे पाहण्यात आली.. चांगली वाटली, पण मी फार वेळ घरी नसल्यामुळे जास्त अंदाज आला नाही. तुला मात्र चांगलीच आवडलेली दिसते मालिका.. छान लिहिलं आहेस :)

    उत्तर द्याहटवा
  2. चि.श्रिया उर्फ मोनिका.....!
    उंच माझा झोका वरील उत्कट भाष्य ...वाः क्या बात है.....!
    तू तिथे कॅनडा मध्ये राहून आपल्या मराठीचा आस्वाद घेतेस हे बघून
    मला तुझा नुसताच अभिमान नाहीतर गर्व वाटत आहे ....
    मला असे वाटते की तू एका लग्नाची दुसरी गोष्ट ही मालिका देखील तू बघत असावीस
    अन तीही तुला आवडत असावीस ...ती वरील असेच रसग्रहणात्मक भाष्य वाचायला आवडेल
    तुझाच ,
    श्याम काका
    ताजा कलम = जर काकस्पर्ष हा नुकताच प्रदर्शित झालेला तुला नक्कीच भावेल !

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. श्याम काका आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!
      उंच माझा झोका हि मालिका खूप आवडली,मनात खूप दिवस बाळबोध काही पहायचे अशी इच्छा होती.जुन्या काळात कर्मठपणा असला तरी एक बाळबोध वातावरण दिसायचे.लोकांचा नात्यांना जपण्याकडे कल होता.
      आजच्या बदलेल्या कालखंडात, अशी जुन्या वातावरणात सामावलेली पण हळू हळू बदल स्वीकारत पुढे जाणारी रमाबाई च्या आयुष्यावर आधारित हि मालिका सर्वांनी पहावी अशी वाटली म्हणून हा प्रयत्न केला आहे.
      आणखीनही काही मराठी मालिका चांगल्या म्हणून ऐकिवात आहेत.आणखीन लिहीनच...काकस्पर्ष बद्दल बरेच ऐकले आहे...नक्कीच पाहीन.
      आपले आशीर्वाद आणि प्रोत्साहन नेहमीच सोबत असावेत.

      हटवा
  3. खरंच खूप सुंदर मालिका आहे. रोजच पाहायला मिळत नाही पण आतापर्यंत पाहिलंय त्यामध्ये प्रत्येक भाग पाहताना एकदा तरी डोळ्यातून पाणी आलंच...

    उत्तर द्याहटवा
  4. प्रतिक्रियेबद्दल आभार! खरे आहे इंद्रधनू...नुसते मनोरंजन नाही तर मनोरंजनातून काही घेण्यासारखे...प्रत्येक भागातून एकेका वाक्यातून पण काही शिकता येते. डोळ्यात पाणी उभे राहणे ते पण नुसते दुखःद प्रसंग नाहीत तर अनेकविध भावनिक प्रसंग,यांची योग्य मांडणी.
    छानच आहे मालिका!

    उत्तर द्याहटवा
  5. हो ग ताई खरच मस्त आहे ही मालिका ...ती एवढीशी रमा नउवारी पातळ नेसून इतका सफाईदार अभिनय करते की फार छान वाटत... खूपच बोलकी आणि अप्रतिम मालिका आहे... पूर्वीच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या प्रसंगातून अगदी सहज दाखवल्या आहेत... आता मोठ्या रमाच्या भूमिकेत कोण? खूपच औस्तुक्य आहे... बाकी तु छान लिहिलंय ...

    उत्तर द्याहटवा
  6. ह्या मालिकेतून शिकायला मिळते,जुने विचार जरी कर्मठ वाटले तरी नातीगोती माणसांचे एकमेकांशी संवाद ह्यातून काही प्रसंगात आदर्शवाद जाणवतो.
    मला पण कुतूहल आहे कि मोठ्या रमेच्या भूमिकेत कोण...
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद तेजश्री...

    उत्तर द्याहटवा
  7. पूर्णतः सहमत
    ह्याच धर्तीवरमहर्षी धोंडोपंत कर्वे , आगरकर ह्यांच्यावर मालिका पहावयास आवडेल.

    उत्तर द्याहटवा
  8. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद निनाद .
    मला असे वाटते कि हि जी मंडळी खरच लोकांसाठी काही करू शकली...त्यांनी कधीच स्वतःचा बडेजाव मिरवला नाही न प्रसिद्धीची त्यांना हाव होती...ह्या सर्व समाज कार्यकर्त्यांच्या आयुष्यावर मालिका होणे शक्य नसेल कदाचित पण तुम्हीं म्हणता तसे धोंडो केशव कर्वे, आगरकर ह्यांच्या आयुष्यावर रेखलेली मालिका आली तर खूपच आवडेल पहायला.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ