रामेश्वराच्या सान्निध्यात .....


     
          रामेश्वराचे आवार डोळ्यासमोर उभे राहिले आहे.आज का कोण जाणे,सकाळपासून ह्या देवालयाची आठवण येते आहे.आठवण स्वस्थ बसू देत नाही आणि तिला जिवंत व्हायचे असते कागदावर! 
शांत हिरवळीने नटलेले कोकणातले रेवदंडा आणि आसपासचा परिसर,,निसर्गाने दिलेले वरदान.गावापासून थोड्याच अंतरावर चौल फाट्याजवळ हे देऊळ आहे.पुरातन असे हे देवालय आजही डोळ्यांसमोर येते.किती वेळा बालपणी ह्याच्या आवारात गेले आहे.समोरची पोखरण,त्याच्या भोवती वसलेली कौलारू घरे आणि पाठी नारळी पोफळीची झाडे,आजही,वाऱ्याने हलता डूलताना,आता डोळे मिटले तर दिसत आहेत.ह्या देवळात प्रत्येक मुख्य सणाला लहान मोठे कार्यक्रम असत.देवळासमोर दीपमाळा होत्या.मुख्य श्री शंकराचे स्थान आणि मग लहान अश्या काळ्या दगडातल्या विठ्ठल रखुमाई,राम सीता,ह्या दैवतांच्या मुरत्या आहेत.देवळाच्या पायऱ्या उतरताना दोन्ही बाजूला बैठक आहे जिथे पांथस्थ मंडळी विसावतात.

         बालपणी हे देऊळ खूपच मोठे,अवाढव्य भासायचे.देवळाचा आतला भाग,घुमट,शिवाचे स्थान आणि त्या गाभाऱ्यातला गंभीरपणा.अनेक हंड्या देवळात उंचावर लावलेल्या आजही आहेत.घंटा वाजवताना बाबा उचलून घेत आणि उंच करून मोठा टोला देणाऱ्या घंटेला मी टोला देत असे.त्याचा तो घुमणारा नाद,आणि गोलाकार घुमटाखाली वर पाहत गोल फिरणारे माझे डोळे! देवळात मुळात पावलांना त्या फरशीचा स्पर्श आजही ताजा वाटतो.उजेड म्हणाल, तर तितकासा देवळात येत नसे कारण रचनाच तशी होती.काही लहान दगडात कोरलेल्या तावदानांमधून थोडासा प्रकाश आत डोकवायचा.देवळात पालखीचे सामान,देवाचा मुखवटा,ताशे ढोल हे एका ठिकाणी नीट ठेवलेले असत.

      महाशिवरात्रीला जत्रा भरत असे..आणि त्यावेळी पालखी आणि प्रसादाचे जेवण असे.भजनाचा कार्यक्रम रंगायचा.ह्या जत्रेत देवळाच्या आवारात अगदी मोजकी लहान दुकाने लागत. फुगे,बांगड्या,काही लहान मुलांचे खेळ विकणारी दुकाने,फुलांच्या वेण्या,हार,शेंगदाणे चणे फुटाणे,आणि इतर काही खाद्यपदार्थ विक्रेते दिसत.त्यावेळी ते 'सगळेच' हवे असायचे.आणि काहीही खायला घेतलेले कोण चवदार लागायचे!! आम्हीं सर्वजण न चुकता देवळात जात असू.तेव्हां ओळखीच्या मैत्रिणी देवळात दिसत.मग आपल्याकडे काय खास आहे,एखादा फुगा किंवा नवीन बांगड्या हे एकमेकींना दाखवण्याचा कार्यक्रम असायचा.जवळच थंड विकत मिळायचे.गोटी सोडा,लेमन,थम्स अप.गोल्डस्पॉट वगेरे मिळायचे ते दुकान खासच वाटायचे.उसाचा रस थंड गार,अजूनच थंड वाटायचा! शिवाय वडील मंडळींसाठी चहा,कॉफ्फी असायची.देवळात गजबज आणि कधीही न दिसणारी मंडळी पण दिसायची.दीपमाळ सजवली जायची.संध्याकाळी गेलो तर सुंदर दिसायचे देवळाचे आवार आणि देऊळ.अनेक वेळा ह्या देवळाला रंग देण्यात आला.पुरातन असल्याने डागडुजी देखील केली गेली. ग्रामस्थ मंडळी आजही ह्या देवळाला जपतात. 

         सर्वात लक्षात राहिलेले म्हणजे, मी आणि माझी बहिण रात्री आजोबांसोबत देवळात भजनाला जात असू ते.देवळाच्या पडवीत भिंतींवर सुंदर वेदिक काळातील कथांवर आधारित चित्र रेखाटलेली आहेत.तेव्हांही ती तशीच होती.ती पाहणे अगदी जवळून मला फार आवडायचे.सुंदर रंग भरलेल्या कथा येथे साकारलेल्या होत्या. पेट्रोमॅक्सचे  दिवे आणि कंदील जर वीज गेली तर लोक तयार ठेवत.बसायला सर्वांना मोठ्या दऱ्या अंथरण्यात येत.काही स्त्रिया असत.जास्ती पुरुषवर्ग आणि लहान मुले.

         बुवांनी सोबत आणलेले पेटी,तबला,तंबोरा,झांजा,मृदंग,टाळ इत्यादी सगळे स्थिरावले आणि छान जम बसला कि सुरवातीला कीर्तन आणि नंतर भजन असे.हौंशी गावकरी पण आवाज लावीत.तल्लीन होऊन सर्व श्रोतृवर्ग टाळ्या वाजवून साथ देई.बसायला ऐसपैस असल्याने आम्हीं मुले अगदी खरेच ऐसपैस पसरत असू.सुरवातीला आपल्या सवंगड्यानमधील कोणी आले आहे का हे पाहण्यात थोडा वेळ जायी,मग बुवांचे निरीक्षण चाले.त्यांचे कपडे, पगडी इत्यादी पाहायला गम्मत वाटे.नंतर टाळ्या वाजवून कंटाळा आला कि हळूच जागेवरून उठून देवळाच्या आवारात भटकण्याचा कार्यक्रम.आजोबा तसे शिस्तीचे होते.त्यांना टंगळमंगळ  केलेली मुळीच खपत नसे.त्यात काळोख असल्याने आणि गावात साप,विंचू हि मंडळी सर्वत्र मुक्त संचार करत असल्याने आम्हाला तशी परवानगी क्वचित मिळे.तरी नंदीचे स्थान असलेल्या लहानग्या देवळाच्या पायऱ्यांवर बसून सजवलेली सुंदर पोखरण पाहायला डोळे उत्सुक असत.संगीताचे स्वर,काळोखात पोखारणीत दीपमालेचे आणि दिव्यांचे पडलेले हलते प्रतिबिंब,दूरवर लहानशी दिसणारी अंधुक घरे आणि घरांच्या आतील दिवे,दिसत.मग वळून देवळामागची  वाडी डोळे पाहू लागत.तो काळोख खूप वेगळा वाटायचा.गूढ आणि थोडासा उजेडात मिसळलेला.वारा आला कि हलणाऱ्या उंच नारळाच्या झावळ्या पहिल्या कि अंगावर काटा उभा राहायचा.

     पालखी,आरती मग भजन सगळे कार्यक्रम झाडून भाग घेतला तरी आमचे समाधान व्हायचे नाही. काहीतरी राहिलेले असायचे...एकदा जाऊन त्या देव्हारयाच्या लहानश्या तावदानातून "शंभो मी आले आहे!" अशी हाळी नेहमी द्यायचीच असायची.ती दिली; कि समाधान वाटायचे जणू शंकर बाप्पाशी आमचे ते संवाद ठरलेले १००% होतेच.

        देवळाचे गुरव पिढीजात आणि अगदी सर्व गावकऱ्यांना ओळखणारे.देवळात आलो कि देवदर्शन झाले कि गुरव असतच.लहानपणी दुपारी देवळात जाण्याचे प्रसंग कमी आले. एकदा अशीच गेले होते देवळात,गाभाऱ्यावर उंच घुमटात वटवाघुळे आपापले संसार थाटून असत.प्रदक्षिणा घालणे म्हणजे लहानपणी थोडे अवघड काम वाटायचे कारण ह्या प्राणी वर्गाची तेव्हां भीती वाटायची.देवळात किती उदबत्या लागत पण हि मंडळी त्या देवळातील वर्दळीला आणि त्या उदबत्तीच्या सुवासाला पुरून उरलेली.कशाला म्हणून न भिणारी अशी हि टोळी.दुपारी देवळात गर्दी नसली कि मग इकडे तिकडे उडून ह्यांचे व्यायायाम चालत,ते आठवले.

      देवळाच्या पाठी वाडी आणि वेगवेगळी झाडे.परिसर स्वच्छ आणि लक्षात राहिलसा.संभाजी कालीन हे देऊळ,देवाच्या मुरत्या  देखील काळ्या दगडातल्या.देवळाला गावकरी सुधारणा म्हणून रंग देत असतात कारण पावसाळ्यात शेवाळ माजते आणि देऊळ पुन्हा एकदा रंग बदलते.ह्या देवालयाने अनेक वर्ष गावात अनेकांच्या श्रद्धास्थानाचे रक्षण केले आहे.अनेक आठवणी येथे लहानाच्या मोठ्या झाल्या आहेत.शंकराची ती पिंडी,नंदीचे ते स्थान आणि ती पोखरण,पर्जन्य,अग्नी आणि वायू कुंड ह्यांचे स्थान तिथेच आहे.

       आजोबांसोबत यायचे ते दिवस त्या पायरीला पाय लागला कि आठवतात.अश्या अनेकांच्या आठवणी त्या देवळाच्या नुसत्या विचारानेही जाग्या होत असतील! 
आजही मन प्रसन्न आणि एकाग्र व्हावे असे वाटू लागले कि,रामेश्वराचे ते देऊळ आठवते...आणि क्षणात एकदम सगळे शांत आणि स्थिर होऊन जाते!
-श्रिया (मोनिका रेगे )

छायाचित्र आंतरजालावरून साभार...

टिप्पण्या

  1. प्रत्युत्तरे
    1. मला वाटते प्रवीण मी जे काही वर्णन केले आहे इथे ते खूपच कमी आहे ह्या परिसरासाठी.रेवदंड्यात राहिलेल्या सर्वच व्यक्तींना नक्कीच हि जागा तुम्हीं म्हटल्या प्रमाणे स्वर्गसुंदर भासत असणार!
      विशेषकरून मी तर म्हणेन प्रत्येक ऋतूत ह्या देवळाच्या परिसराचे रूप बदलते आणि त्यामुळे अधिक सुंदर दिसते.
      हा लेख वाचून प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद!

      हटवा
  2. वा !! छान वाटले वाचून .... मी गोव्यातले शांतादुर्गा पहिले आहे....इथले वर्णन वाचून त्याची आठवण झाली ... छान वाटले .... मला हे रामेश्वराचे देऊळ पहायची खूप इच्छा होती आणि आहे..
    हा लेख वाचून आणि जे काही मी माझ्या स्नेहिंकडून ऐकले होते त्यावरून आता नक्कीच भेट द्यावी असे वाटते ..मला नेहमीच अशा शांत देवळाची कमतरता भासते ..कारण आजकाल बर्याच देवळांमध्ये commercial पणा आलेला आहे...

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे.शांत परिसर असलेले,निवांतपणा जाणवेल असे देऊळ आहे रामेश्वराचे. आणि आपण नक्कीच ह्या देवळाला भेट द्यावी.प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      हटवा
  3. सुंदर आठवणी. आयुष्यात आपण जितकं पुढं जावं तितकं मागचं आठवतं म्हणतात :-)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सविताताई बरोबर बोललात,पुढे जाणे अपरिहार्य ते करता करता अश्या आठवणी अचानक उभ्या राहतात आणि मन आनंदी होते.आपण जितके पुढे जातो तितके मागचे आठवते..ह्या आठवणी कधीच पुसट होऊ नयेत असे वाटते!आपल्या ह्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      हटवा
  4. रामेश्वराचे नाव वाचून आधी दक्षिणे कडलं रामेश्वरम् च वाटलें पण कोकणातल देऊळ मह्णून उत्सकता वाटली.
    उज्जैन ला आम्ही असतांना प्रगटेश्वरा च्या देवळाच्या अशाच आठवणी आहेत. छान छान कीर्तनकार यायचे अन
    त्यांची कीर्तनं व्हायची. वाड्यातली सर्व मंडळी जायची .त्याच्या ही आठवणी अशाच आहेत.

    उत्तर द्याहटवा
  5. बारीक सारीक तपशिलासह मस्तच वर्णन...
    अगदी अगदी देवळातच जाऊन आल्यागत शांत वाटतेय वाचताना... :)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ