'मन्या द वंडर बॉय'

   
           'मन्या द वंडर बॉय',नावात सगळे आले आहे का? पहायलाच हवं...म्हणून चित्रपट पाहू लागले आणि सर्व वयोगटातील व्यक्तींनी पहावा असा हा मराठी चित्रपट,शेवटपर्यंत मला माझ्या जागेवरून उठू देईना!एका गावात लहानगा मन्या (रीशीराज पवार ),त्याचे आई वडील आणि बहिणीसोबत,रहात असतो.मन्या आठवीत,शाळेत जाण्यास उत्सुक पण घरात बिछान्याला खिळलेले वडील त्यामुळे घरातली कामे देखील हिरहिरीने करत असतो.घरात गाई आणि दुधदुभते.बहिण आणि तो आईला मदत करून मग शाळेत जात असतात.दुग्धालयात दुध पोहोचवून शाळेत जाईस्तोवर नेहमी होणारा उशीर,आणि त्यामुळे शाळेत होणारे हसे,अपमान पचवणारा बोलक्या डोळ्यांचा मन्या.मन्याचा मित्र 'ओम्या'नेहमी मन्याला सांभाळून घेणारा,वेळी अबोला धरणारा पण मदत करणारा,आणि 'जाई' जिच्या आयुष्यात खूप लहान वयात आई वडिलांचे छत्र हिरावले जाते आणि काकांच्या घरी आधाराला राहिलेली अशी हि मन्याची मैत्रीण.मन्याला शाळेत उशीर होऊ नये म्हणून बाबा,आणि बहिण मिळून त्याच्यासाठी एक पाठीवर लावायची पिशवी शिवतात,हात रिकामे राहतील आणि दुधाचे कॅन पाठीवर तर दप्तर समोर गळ्यात असे लावता येईल.शाळेत धावत जाताना गैरसोय होणार नाही ह्यासाठी शिवलेल्या त्या पाठीवर लावायच्या कापडी पिशवीवर,जाई आपल्या कलेचा वापर करून सुंदर फुलांची चित्र काढते.जंगलातून धावत जाताना भिणारा मन्या,बाबांच्या काही लक्षात राहतील अश्या आदर्श विचारांचे पाठबळ घेऊन धिटाईने  वेळ वाचतो म्हणून जंगलाच्या रस्त्याने शाळेत जाऊ लागतो. 



        शाळेचे मुख्य देणगीदार 'पाटील' ह्यांच्या भूमिकेत एक खलनायक म्हणून, श्री अभिजित चव्हाण खूप छान भूमिका करतात.पाटलांच्या मुलाला नेहमी सर्व विषयात वर ठेवण्यासाठी धडपडणारी शाळेतली मंडळी अगदी मुख्याध्यापक देखील जेव्हां, मन्या धावण्याच्या शर्यतीत सर्व मुलांना हरवतो हे पाहतात,तेंव्हा त्यांना मोठे आश्चर्य वाटते.कारण पाटील खास कोच ची नेमणूक करून आपल्या मुलाला ह्या शर्यतीसाठी,ज्याचे बक्षीस दहा हजार रुपये आणि ढाल हे असते,तयार करतात,तरीही...ओम्याच्या मदतीने घरातील सर्वांच्या आधाराने मन्या हि शर्यत जिंकतो.कोच सर जेव्हां मन्याला धावताना पाहतात,आपल्या मुलाचे शूज त्याला भेट म्हणून देतात.आणि त्याच्या यशानंतर त्याला पुढे जाण्यासाठी जणू काही पूर्ण जबाबदारी घेतल्यागत मदत करतात.त्यात घरात अचानक एक दुखद घटना घडते...त्यामुळे सगळेच मध्यंतरानंतर बदलते.

         मन्याच्या वडिलांचे घरातील अस्तित्व,मन्यासाठी प्रेरणादायक असे.बाबा कारगिल युद्धात एक शूर सैनिकाप्रमाणे लढतात पण गोळी लागल्याने अपंगत्व येते,तरीही मनाने मात्र देशाबद्दल तितकेच प्रेम आणि देशाभिमान,कर्तव्य दक्षता आणि पुढे जाण्याची सकारात्मक वृत्ती ते मन्याला देतात.बाबांची तब्येत अजून बिघडते.मन्या शर्यतीच्या बक्षिसाच्या पैश्याने बाबांची योग्य चिकित्सा करायला त्यांना शहरात घेऊन जाऊ शकतो का? मन्याला कोच सर पुढे मार्गदर्शन करतात का?मन्या त्याच्या आठवीतल्या शालेय स्पर्धेतल्या यशातून अजून पुढे ,देशासाठी काही करायची इच्छा बाळगून पुढे जातो का,हे मी न सांगता आपणच ह्या चित्रपटात  पहावे असे वाटते.

        मराठी शीर्षक नसले चित्रपटाचे,तरी चित्रपट अगदी मराठमोळा आहे.२०११ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे 'श्री संग्रामसिंग गायकवाड' ह्यांनी.पटकथा 'हरीश नायर' ह्यांची असून संगीत 'निलेश मोहरीर' ह्यांचे आहे.कलाकारांची योग्य निवड हे ह्या चित्रपटाचे वैशिष्ठ्य आहे.श्री आकाशदीप पांडे ह्यांनी केलेले  उत्तम छायांकन,शिवाय कोच च्या भूमिकेत 'राजेश शृंगारपुरे',मोठ्या मन्याच्या भूमिकेत 'अमित्रीयन' ह्या दोघांनी छान अभिनय केला आहे.

        लहान मन्याची भूमिका करणारा कलाकार आपल्या बोलक्या डोळ्यांनी ह्या अभिनयाच्या अविष्कारात खूप मोठी भर घालतो.इतका लहान असूनही उत्तम अभिनय केला आहे ह्या कलाकाराने.मन्याची आई म्हणून 'माधवी जुवेकर' दिसतात.आईच्या आयुष्यातील कष्ट,मेहेनत गरिबी पण तरीही आपल्या मुलांना योग्य तर्हेने शिकवण देत,मुलावरचा प्रचंड विश्वास आणि प्रामाणिक प्रयत्न मुलांनी करत राहावा ह्यासाठी घेतलेले निर्णय,सुख आणि दुःखाचे प्रसंग झेलत उमेदीने उभी राहणारी मन्याची आई जुवेकारांनी योग्य साकारली आहे.चित्रपटातील इतर लहान मोठ्या भूमिका देखील कथेला अनुरूप वाटतात. दोन गाणी आवडली.प्रसंग कंटाळवाणे होत नाहीत.चित्रपटाचे चालणे न चालणे हे कश्यावर अवलंबून असते,हे आपल्या सर्वांनाच माहित आहे,पण आजकालच्या मसाला चित्रपटांच्या जगात हा मन्या एक साध पण आशा निर्माण करणारे कथानक घेऊन येतो आहे.

         क्रीडाविषयावर असलेला हा सिनेमा गावातून अगदी खेड्यातून देखील खेळाडू कसा वर येऊ शकतो हे दाखवतो.'मनोहर सोनावणे' म्हणजे 'मन्या' हि जिद्दीची रेस जिंकतो का?
जुईचे पुढे काय होते...आणि आपल्या कारस्थानात पाटील यश मिळवू शकतात का हे पाहण्यासाठी नक्की पहा 'मन्या द वंडर बॉय'!!
-श्रिया (मोनिका रेगे )

चित्रपटाची झलक या लिंक वर जरूर पहावी...



टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ