"सुट्टी"
"सुट्टी"शब्दाची जादूच अशी आहे कि सगळी मंडळी ती पडली कि एकदम खुश!सुट्टीचा आनंद काही वेगळाच.सक्तीची सुट्टी वेगळी पण घेतलेली सुट्टी,मग ती शाळेला सुट्टी असो,ऑफिसला किंवा घरकामाला, ह्या शब्दात एक मौज आहे.लहानपणी शाळेत जाणे,शाळेतला अभ्यास,शाळेतला खेळ आणि इतर शालेय उपक्रम,स्पर्धा ह्या व्यतिरिक्त आम्हां मुलांचे एक वेगळे विश्व नक्कीच होते.ह्या विश्वात जो वेळ मिळायचा तो नेहमीच कमी वाटायचा,"अजून थोडा वेळ आलेच ग आई","थोडे वाचते अजून","अजून खेळूदे न",हि अशी वाक्य आठवतात.
शाळा संपून लागलेली सुट्टी 'मे महिन्याची',दुसरी दिवाळी आणि मग गणपतीची सुट्टी ह्या सुट्टीतले कार्यक्रम सणासुदिशी निगडीत असत.घरात पाहुणे मंडळी एक वेगळेच उत्साहाचे सणाचे वातावरण.आम्हीं मुले ह्या वातावरणाचा एक भाग बनून जात असू.मग घरात मोठ्यांना कामात मदत करताना पण सुट्टी असल्याने एक आनंद मिळायचा.गणपतीत मोदक बनवायला आणि आपण बनवलेले मोदक खायला एक वेगळीच गम्मत वाटायची गणपतीची आरास,आरत्या,प्रसादाचे जेवण,असा हा मिळून साजरा केलेला गणेशोत्सव,काकांकडे सगळे जमत असू सुट्टीत आणि मग हि सुट्टी लहानशी असली तरीही खूपच ऐसपैस वाटायची.दिवाळीची सुट्टी थोडी मोठी आणि फटाके रांगोळी दिवे फराळ ह्यासोबत सगळे दिवस कसे निघून जात कळायचे देखील नाही.....
मे महिना तर सुट्टीचा खास!!उन्हाळा कितीही असला तरीही आंबे कैऱ्या,चिंचा बोरे आणि धमाल खेळ ह्या सर्वांनी पूर्ण दिवस व्यापलेला असायचा.हल्लीसारखे सुट्टीतला अभ्यास वगरे प्रकरणे आठवत तरी नाहीत. आणि शिवाय दूरदर्शन सुद्धा आता इतके प्रगत न्हवते,आपल्या फांद्या किंवा मुळे जशी आता ह्या दूरदर्शन वाहिन्यांनी लोकांच्या,लहान मुलांच्या गळ्यात अडकवल्या आहेत तसे तेव्हां नसल्याने सुट्टीचा खरा आनंद आम्हीं मिळवत असू.....आता आले आहे क्लास्सेस चे वेड. सुट्टीतले सगळे दिवस काहीतरी शिकत राहणे आणि ते सुद्धा एक गोष्ट नाही तर अनेक गोष्टी,ह्यामुळे नक्की काय मुलांचा फायदा होतो हे मात्र सांगणे कठीण. सुट्टी लहानपणी आम्हीं तरी प्लान कधीच केलेली आठवत नाही फक्त मामाकडे किंवा काकांकडे जाताना काय तो प्लान.पण सुट्टी हि त्या मुलांची 'खरी कमाई' असते त्यांच्या मनासारखे त्यांना खेळता यावे म्हणून दिलेली सुट्टी.एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात सुट्टीत करावी,नक्कीच काही वेगळे शिकावे पण अनेक क्लास्सेस करून सगळी सुट्टी एक न धड भाराभर चिंध्या अश्या प्रकारात जमा होऊ नये असं वाटते.आता दहावी बारावी महत्वाच्या वर्षांसाठी असलेले क्लास्सेस ते आम्हीं देखील केले होते.त्यांचा फायदा देखील झाला प्रश्नच नाही.पण पूर्ण सुट्टी हि दोन वर्ष सोडली,तर बाकीच्या वर्षी मात्र धमाल करण्यात गेलेली स्मरते.
हे झाले लहानपणचे सुट्टीचे विश्व,आता मोठेपणी सुट्टीचे महत्व वाढल्यासारखे वाटले.'सुट्टी हि प्रत्येकाची गरज आहे'..आरामासाठी घेतलेली सुट्टी आणि नेमेची येणारा रविवार ह्यात फरक आहे नक्कीच.
रविवार शनिवार हा दर आठवड्यात येणारच.आणि मग येणार सोमवार,परत कामाला सुरवात!कित्येकांना रविवार संध्याकाळ त्यामुळे नकोशी होते...सोमवार घाई करत असतो न!चाकोरीबद्ध आयुष्य आजकाल शहरात आणि गावात सुद्धा दिसू लागले आहे.'रजा हवी बुवा' असं म्हणूनही रजा काढता येत नाही असे असते कधी कधी.काम साठलेले असते ऑफिस मध्ये,बॉस रजा देत नाही म्हणतो नंतर घे असे पण म्हणतो.शाळेला जशी सुट्टी पडायची तशी कामावर मात्र मोठेपणी ठरलेल्या वेळी पडत नाही.आपण घेतो तेव्हां आणि मिळाली तर ,नेमकी हवी तेव्हां, तरच खरा आनंद! सुट्टी घेणे आणि पूर्ण आराम करणे हे शक्य नसते कधीच ..अनुभवाचे बोल !!!काही न काही कामे निघतातच,नाहीका? सुट्टी आपल्याला हवी तशी घालवता आली पाहिजे.नाही म्हणायला आपला दिवस आपल्यासाठी काढलेला वेळ आणि मनोरंजन.आईला पण एक दिवस कामापासून सुट्टी,म्हणायला तिचा आरामाचा दिवस.
लहानपणची सुट्टी आणि आता मिळणारी सुट्टी बराच फरक पडला आहे असा वाटते. त्या 'एव्हढ्याश्या विश्वात' देखील त्या 'एव्हढ्याश्या वाटणाऱ्या' सुट्टीतला आनंद पूर्ण उपभोगला,मनात कधीच नाराजी आली नाही धमाल केली आणि आता मोठे झाल्यावर मिळणाऱ्या सुट्टीतला आनंद खरा किती उपभोगला जातो आहे ते सांगणे कठीण!लहानपणी वाटायचे मोठ्यांची काय मज्जा आहे,अभ्यास नाही शाळा नाही नेहमीच थोडेसे काम करायचे आणि सुट्टीच सुट्टी ....पण आता मोठे झाल्यावर तो लहानग्या मनाला वाटणारा मोठ्यांचा हेवा किती खोटा होता ते पटते.
लहानपणची सुट्टी खरी सुट्टी होती,खरा मोकळा वेळ होता 'मस्ती का टाइम' !!!
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
लहानपणी काय धम्माल होती नाही ? छान लेख, nostalgic !!
उत्तर द्याहटवाधन्यवाद संकेत ....
उत्तर द्याहटवालहानपणी खरच धमाल होती....
सुटी लहानपणची लहानश्या जगात राहून मस्त अनुभवली आणि आता मोठेपणी सुटीत खरी सुटी मिळते का हा प्रश्न आहे!
शाळा संपल्यापासून तर "सुट्ट्या म्हणजे काय रे भाऊ " असेच झालंय:(
उत्तर द्याहटवाछान लेख
धन्यवाद बंड्या!तुझे खरे आहे...लहानपणची सुट्टी खरी सुट्टी......शाळा सुटली सुट्टी संपली....
उत्तर द्याहटवा..छान लिहिलंस....गेल्या त्या सुट्ट्या नाही?? आता येतात ते लॉंग विकेंड....केव्हापासुन वाट पाहतेय मी इथल्या ४ जुलैच्या सुट्टीची....हा आठवडा मोजला की हुश्श....
उत्तर द्याहटवाअगं सांगायचं म्हणजे यावर्षी तरी सुट्टीवर लिहुया म्हणून विचार करत होते पण जून कसा संपतोय कळत नाही..तू लिहिलंस म्हणून थोडं मनातल्या मनात तरी आठवलं गेलं...आभार..:)
I hope this comments goes thru finally...:)
अपर्णा तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!:):)लॉंग वीकेंडची वाट पाहणे,हो इकडे त्यांचे आकर्षण असते खास,ठरवून काही कार्यक्रम आखला तरच काही वेगळेपण उरते.
उत्तर द्याहटवाआता उन्हाळ्यात तुला काही कार्यक्रम आखता येतील.सुटीचा पुरेपूर आनंद घेणे महत्वाचे!तसे जुळून यावे लागते हे खरे!
तुझा लेख पण येऊन जाऊदे सुट्टीवर आणखीन पण धमाल वाचनात येईल.....तुम्हीं मंडळी लहानपणी सुटीत काय करायचा ते कळेल...:)