'सुंबरान-सोनेरी दिवसांच्या आठवणी'.
हल्लीच एक चित्रपट पहिला,मराठी चित्रपट..पूर्वी असलेल्या मराठी चित्रपटांपेक्षा वेगळा असा.चित्रपटाकडून जेव्हां काही गोष्टी शिकायला मिळतात तेव्हां ती नुसतीच करमणूक राहत नाही तर चित्रपटगृहाच्या बाहेर आल्यावर एक समाधान असते,काहीतरी मिळवल्याचा आनंद असतो!आजपर्यंत असे फारच मोजके चित्रपट पहिले आहेत ज्यातून खूप काही मिळाले,त्यातलाच श्री.गजेंद्र अहिरे दिग्दर्शित,'सुंबरान-सोनेरी दिवसांच्या आठवणी'.
ह्या चित्रपटाची कथा,त्यातील पात्रे,त्यांचे एकमेकांशी असलेले नातेसंबंध,पिढ्यानपिढ्या जपलेल्या अश्या आणि आता जीर्ण झालेल्या वाड्याशी असलेली प्रत्येकाची भावनिक गुंतवणूक,नात्यांमधील सच्चेपणा आणि भूतकाळातील अनेक घटनांची वर्तमानात केलेली पेरणी,असा हा चित्रपट.ह्या कथानकातील काही पात्रे हि स्वतःचा भूतकाळ आपल्याला सांगत आहेत.वर्तमानातल्या आजच्या त्यांच्या परिस्थितीला त्यांचा भूतकाळ हा कसा जबाबदार आहे हे आपणास हळू हळू उलगडत जाते.
अस म्हणतात,'जेव्हा विचारांच्या शृंखला होतात,काही ध्येयाने प्रेरित झालेले असे लोक ह्या शृंखलांनी सदैव बांधलेले असतात'.हे ध्येय प्रेरणा देते आणि पुढचा प्रवास सोपा होतो..त्यांना स्वतःकडे पाहायला स्वतःचे कौतुक करायला वेळच नसतो...सतत एकच विचार.कधी कधी हे ध्येय एखाद्याला गरिबीतून,अशिक्षितपणातून पूर्ण वर काढते.कधी कोणाचे स्वप्न पूर्ण होते ह्या ध्येयपुर्तीतून.देवाने इतर प्राण्यांहून वेगळे असे काही दिले मानवाला.विचारशक्ती,मन,अनेक भावभावनांचे बनलेले असे हे हळवे मन कधी कधी इतके कठोर होते कि हेच मन काल इतके हळवे होते ह्यावर स्वतःचाच विश्वास बसत नाही.ह्या कथेत असेच मन असलेला वीरू आणि ध्येयाने प्रेरित अशी'कल्ली' हि दोन पात्रे चांगलीच लक्षात राहतात.धनगर गीताच्या प्रेरणेने 'वीरू' संगीतसाधना करण्यासाठी स्वतःचे वैद्यकीय शिक्षणाला सोडून देतो.तर कल्याणी(कल्ली)आपल्या अशिक्षित धनगर आईचे स्वप्न पूर्ण करत शिक्षण घेऊन उच्च पदाला पोहोचलेली दाखवले आहेत.कथेत हरवलेले प्रेम,घरातल्यांच्या मतभिन्नतेमुळे परिणाम झालेले असे बालपण,आणि काळाच्या पडद्याआड नाहीसे झालेले असे बरेच काही,पण कथेच्या शेवटी,सापडतात एकमेकांशी असलेले नातेसंबंध जे रक्ताच्या नात्यांना पण लाजवतील.
ह्यातील पात्रे ह्या कथानकाला साजेशी आणि प्रत्येकाने आपापली भूमिका योग्य तर्हेने वठवली आहे.कथेत वीरू (जितेंद्र जोशी) आपल्या बालपणाची कथा सांगत आहे.ह्या कथेत त्याचा दादा वसंत (श्री.मकरंद अनासपुरे),वाहिनी (वृंदा गजेंद्र),वीरूची बालपणची मैत्रीण कल्याणी उर्फ "कल्ली"(मुक्ता बर्वे),वीरुसोबत त्याचे मित्र आणि मैत्रीण ह्या भूमिकेत शुश्रुत मंकणी आणि सई ताम्हणकर हे दिसतात.ह्या चित्रपटात वसंत आणि वीरूच्या वडिलांच्या भूमिकेत श्री रवींद्र मंकणी ह्यांनी अप्रतीम भूमिका केली आहे.एक कडक शिस्तीचे वडिल जे गावचे पाटील असतात,घरात आई आजी,आत्याबाई आणि कमळी आई जिची माया खऱ्या आईहुनही जास्त जाणवते.
गावाकडून बालपण मागे सोडून शहरात आलेला वसंत,आपल्या संसारात मन गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करत असलेला वसंत,गावातल्या वाड्याला विकताना त्याची मनात होणारी कालवाकालव,खूप काही मागे ठेवून आलेला पण न विसरू शकणारा वसंत,ह्या भूमिकेत श्री अनासपुरे ह्यांनी त्यांच्या नेहमीच्या विनोदी भूमिकेहून वेगळी अशी भूमिका चांगली केली आहे ,अजूनही छान अभिनय करू शकले असते असे वाटते...थोडे काहीतरी कमी पडल्यासारखे जाणवते.वसंताच्या बायकोच्या भूमिकेत एक सुजाण पत्नी म्हणून जुने धरून ठेवणारी अशी आणि नात्यांना जपणारी अशी एक घरातली वाहिनी,हि भूमिका सौ.अहिरे ह्यांनी उत्तम केली आहे.तसं पाहायला गेले तर कित्येक संवाद हे प्रेक्षकांच्या मनात घर करून जातात.
चित्रपटात दाखवलेले धनगरांचे आयुष्य,किती कठीण,उघड्यावर रानोमाळ भटकणारी हि मंडळी,तरीही आपल्या आनंदात इतरांना सामावून घेणारी.कल्लीची आई तिची मोठी बहिण,तिचे वडिल जे वीरूच्या वडिलांचे जिवलग मित्र,धनगर गीत जे लक्षात राहिले,आणि त्यांचा नाच,जो अजूनही डोळ्यापुढे येतो.कथेत वीरूचा मित्र आणि मैत्रीण ह्यांचे सतत त्याच्या सोबत असणे हे फक्त ती कथा पूर्ण ऐकून घेताना आम्हां प्रेक्षकांना सोबत म्हणून आहे इतकेच जाणवते.अभिनयाला पण ह्या दोन कलाकारांना विशेष वाव नाही कारण तसे प्रसंगच दिसत नाहीत जास्त.
'मित्रप्रेम',कसे असू शकते हे देखील ह्या चित्रपटात सुरेख दाखवले आहे.ह्यात पाटील आणि त्यांचा धनगर मित्र ह्यांची मैत्री किती पक्की आहे,हे काही संवाद,काही प्रसंग दाखवून देतात.कमळीआई,तिचे स्थान वीरूच्या घरातले हे,एका ठेवलेल्या बाईचे,पण तरीही तिने वेळोवेळी दाखवलेली ह्या घरावरील श्रद्धा,आणि स्वतःच्या मुलांसारखी वीरू आणि वसंताची केलेली मदत ह्यावरून रक्ताच्या नात्याहुनही कधी कधी हि जोडलेली नाती कशी मदतीला धावून येतात ते दिसते.कमळीआईची भूमिका अश्विनी कळसेकर छान करतात.श्री.सिद्धार्थ जाधव आपल्या अभिनयाने हसवून आणि हळवे करून जातात.सर्वात महत्वाचे म्हणजे आपल्या लहानश्या भूमिकेत मुक्ता बर्वे खरच खूपच परिणाम करून गेल्या,डोळ्यातून भाव मांडणे फार कमी कलाकारांना जमते,अभिनय कौशल्य हे तेव्हां जाणवते जेव्हां दिग्दर्शकाने दिलेल्या वेळेत आणि प्रसंगाला पूर्ण न्याय दिला जातो .ह्या चित्रपटासाठी निवड केलेले कलाकार आपल्या लहान लहान भूमिका सुद्धा उत्तम अभिनयाने सुरेख वठवतात.
स्मृती माणसाला नेहमीच हव्या असतात.चांगल्या स्मृती नकळत जपल्या जातात.'आपल्या हातून काही चुकले तर नाही न?',ह्या संभ्रमात कधी कधी काही स्मृती नकोश्या होतात.'जुने ते सोने'म्हणतात,पण त्यापासून लांब निघून जाऊन ह्या सोन्याची किंमत कमी होत नाही,तर उलट ती वाढतेच....हे ह्या कथेच्या शेवटी जाणवते.
निसर्गाचे,जुन्या वाड्याचे,आजूबाजूचा परिसर ह्याचे चित्रीकरण छानच केले गेले आहे.शिवाय प्रत्येक प्रसंगातून दुसऱ्या प्रसंगात जाताना कथा कंटाळवाणी होत नाही.उत्कंठा वाढवणारेअसे काही प्रसंग,उत्तम कथानक,दिग्दर्शन आणि अभिनय सर्वच बाबतीत हा चित्रपट उजवा वाटला आहे.
श्री अहिरे ह्यांच्या ह्या चित्रपटाची निवड IFFI 2010 मध्ये करण्यात आली.'सुंबरान-सोनेरी दिवसांच्या आठवणी' हा चित्रपट नक्कीच पाहण्यासारखा आहे. वसंताच्या आठवणी काय आहेत?काय असते त्या वाड्याच्या भिंतीत?वीरुला सापडते का त्याचे प्रेम?ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी हा चित्रपट जरूर पहा....
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे)
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे)
खालील धनगरगीत ऐकण्यासारखे आहे....
.

सुंदर लेख झालाय ! आवडले.. नेहमीच्या सरधोपट परीक्षणापेक्षा वेगळे आणि चांगले :)
उत्तर द्याहटवाधन्यवाद संकेत.....
उत्तर द्याहटवाshriya ,khupach chan abhyas ahe tuza, khara tar mi ha cinema pahilay matra ha lekh vachalyavar punha ekada pahanar ahe ,khup chan.
उत्तर द्याहटवाधन्यवाद प्रवीण ..नक्कीच परत पहा चित्रपट छानच आहे.
उत्तर द्याहटवाहं! संधी मिळाल्यास जरूर पाहीन .. तुमच्या लेखनावरून चांगला वाटतोय चित्रपट!
उत्तर द्याहटवाधन्यवाद सविता ताई,हो अगदी नक्की बघा हा चित्रपट...
उत्तर द्याहटवाKhup chan film ahe mi donda pahila
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद जाधवरावजी .
हटवाह्या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि ह्यातील सर्व कलाकारांचे एकत्र प्रयत्न, ह्या चित्रपटाला एक वेगळाच दर्जा देतात.