साथ

   



         'त्याच्या' भोवती 'तिचे'सारे विश्व एकवटले होते.तो म्हणेल ते!आणि तो पण तिला हवे ते देत होता,देत गेला.तिच्या मागण्या पण कधीच काही फार नव्हत्या.असच काहीसे आपोआप होत गेले दोघांमध्ये.
एक 'अनोखा रिश्ता',एक आगळे वेगळे नाते.न बोलता मनातले ओळखणारे नाते.न मागता बरच काही देऊ शकणारे नाते.अपेक्षांच्या भोवऱ्यात एकमेकांना न अडकू देता सोपे करून समजून घेणारे एक नाते.सहज,समजून घेत पुढे जाता जाता कधी घट्ट होत गेले बंध कळलेच नाही दोघांना.एकमेकांसाठी झुरताना,कधी मने एकरूप झाली कळलेच नाही! एखाद्या वाऱ्याच्या झुळकीने जसे वाळू उडून जाऊन समुद्रात पडावी आणि परत अलगद नंतर भिजवून तिला सागराने आणून टाकावे त्याच्या किनाऱ्यावर तसेच काहीसे झाले होते दोघांमध्ये .
            
               इतक्या सहज इतके खरे वागत जाणारा तो तिला आवडून गेला होता.ठरवून काहीही होत नसते हे अगदी पटले दोघांना.तिचा खेळकर स्वभाव त्याला आवडला.एकमेकांना समृद्ध करण्याकडे कल होता दोघांचा.एकमेकांकडून शिकण्यासारखे जे होते ते शिकून घेत गेले. दोघांमध्ये साधर्म्य निर्माण झाले होते.
लहान सहान वाद,जितके सहज होत तितकेच सहज विरून पण जात.रुसव्या फुगव्यांना विशेष स्थान नव्हते दोघांमध्ये.निखळ असे काहीसे जाणवत राहायचे.एकमेकांसोबत चालताना,बोलताना,हसताना कुठेच आड पडदा नव्हता ,'हे कसे बोलू,काय वाटेल' असे विचार शिवले नव्हते दोघांना कधी,पण एकमेकांच्या मनाचा विचार केला जायचा.सहजपणे सावरत एकमेकांना;वावरत होते दोघे,त्यांच्या एका वेगळ्या विश्वात;ज्या विश्वाचा एक भाग बनले होते हे खरे आजूबाजूचे विश्व.
             
              तिच्या 'नकारात' एक 'अस्पष्ट होकार' लपलेला त्याने पहिला आहे.तिच्या ओठातून बाहेर न पडलेले शब्द त्याने झेलले आहेत कित्येकदा मनकवडा झाला आहे तो.अनेक वेळा तिची वाट पाहत थांबणारा तो.तिच्या उशिरा येण्यावर नेहमीच खोटे रागे भरणारा तो.त्यांच्या त्या जवळ येण्यात एक 'खास बात' होती,आगळीवेगळी 'साथ' होती.त्या दोस्तीत 'जान' होती.त्यांना सगळ्या सगळ्याचा विसर पडायचा एकमेकांजवळ असताना .तिला त्याचे हसणे आवडायचे,रागावणे देखील आवडायचे.तो तिला किती जपतो हे ती जाणून होती.दोघांच्या मनात एकमेकांबद्दल आदर होता,एक श्रद्धा होती,आजही टिकून आहे ती.           
           
           किती सारे एकत्र अनुभवले,दुःखाचे आघात,आनंदाच्या लाटा,पडलेले प्रश्न तिचे,त्याने दिलेली उत्तरे त्यांची.त्याच्या प्रश्नांना ती नेहमीच 'उत्तर' बनून 'आकार' द्यायची.कधी सावली कधी उन,कधी उतार कधी चढाव अस एकत्र सतत चालत राहिले दोघे.एकमेकांच्या सोबतीने किती दिवस,वर्षे सजवली त्यांनी.पण कुठेतरी काहीतरी घडते,आणि सगळे थांबते.विचार संवाद आपोआप थांबतात.काळाला औषध नाही न! हे असे थांबणार आहे कधी न कधी,माहित असताना देखील सगळेच एकमेकांना फसवत असतो,आणि पुढे जात असतो,जगत असतो.काळानेच तिला हिरावून घेतले होते त्याच्यापासून, सगळे संपले होते एका दिवसात त्याचे विश्वाच बदलून गेले होते ती गेल्यावर....          
            
              त्याच्या जगात आज 'ती' नाही.कुठे हरवली ती? तिचे शब्द,तिचे असणे,हसणे,हसवणे,रागावणे सगळे एका मूक शून्यात परिवर्तीत झाले आहे.'एक काळोख' जो कधीच न संपणारा;उजेडाच्या पलीकडला,त्याला जाणवला,जेव्हां 'ती' निघून गेली.ती गेली परत न येण्यासाठी.कधीच दिसणार नव्हती 'ती'.'सावल्यांच्या जगाच्या' पलीकडे पोहोचली होती 'ती'.'इतकी घाई का केली तिने?'त्याला प्रश्न पडला.दोघांनी एकसाथ जायचे होते,"एकदम जाऊ.'जाऊ' तेव्हां सोबत असू" असे तो तिला सांगायचा,नाही; मागायचा तिच्याकडून असे,पण 'ती' मात्र ठाम होती,"गेले तर मी आधी" असे म्हणायची 'ती'....आणि तेच तिने केले.कधीच कोणताच त्याचा शब्द खाली पडू दिला नव्हता तिने,पण हे तिने ऐकले नाही त्याचे.
            
            आज वाद घालायला भांडायला कोणी नाही.आज 'ती' त्याच्या जवळ नव्हती.सर्वांना हे पटले होते कि त्त्या दोघांमधले तिचे स्थान रिकामे होते.त्याला कित्येकांनी त्या दिवशी समजावण्याचा पण प्रयत्न केला.
त्याला हे 'सत्य' खोटेच वाटत होते खूप सारे दिवस! पटकन वाटायचे तिची हाक येईल.कान टवकारून तिच्या चाहुलीची वाट पहिली त्याने तासंतास.जुने फोटो काढून बसला,पत्र,ती पण वाचली.'तिचा आवाज' रेकॉर्ड करून ठेवलेला कानावर पाडून घेतला,किती वेळा खोल श्वास घ्यावा तसा तो आवाज मनात खोल रुतवला असेल  त्याने,मनाच्या अंतर्मनाच्या कोपऱ्यात लपवला,दडवला तरीही,हवाहवासा वाटणारा तिचा आवाज! अश्यावेळी त्याला भान न्हवते वेळेचे,काळाचे,कारण सगळे हरवल्यागत वाटत होते.थांबल्यागत,संपले अचानक! त्याचे आता एकट्याचे अस्तित्वच उरले होते,एक नाव मग येणारे आडनाव बनून राहिला होता 'तो'.सगळ्या जगासाठी फक्त 'एकटा'.

      
                मग भूतकाळ डोळ्यापुढे उभा राहिला,वाटले कि किती काय घडून गेले होते इतक्या वर्षात,इतक्या साऱ्या आठवणी आणि सोबत तो 'एकटा'.त्याने किती वेळा तिला रडवले असेल,तो स्वतः किती वेळा रडला असेल.कित्येक वेळा ती प्रयत्न करायची त्याला सांभाळून घ्यायची.तिच्या वर रागावूनही ती मात्र शांत असायची जणू काही विचार करते आहे.तिचा राग मात्र फार वेळ टिकायचा नाही.तिची वाट पाहून आता डोळे थकले आहेत,अश्रुंशिवाय रडतो तो कित्येकदा!त्याच्या रात्री आणि दिवस एक तपश्चार्येप्रमाणे आहेत.'ती' तिच्या वचनाला जागली.त्यांचे 'आगळेवेगळे नाते' जगली त्याच्यासाठी;आणि 'तो' तिच्यासाठी.
            

        
           एकमेकांच्या आयुष्यात येऊन दोघांनी बरच
काही मिळवले.त्यामुळे आता ती गेल्यामुळे एक पोकळी निर्माण झाली जी त्याला सुरवातीला मान्य नव्हती पण तिने असताना ज्या गोष्टी त्याच्यासाठी केल्या,तिच्या परीने ती कष्टली ते सगळे तो आठवून गहिवरत राहिला.बाप्पांकडून मागत राहिला कि तिच्या शिवाय जगताना तिच्या अस्तित्वाच्या खुणा सतत मनात राहूदे,त्या शक्ती देतील पुढचा मार्ग दाखवतील.एक नवा हुरूप देतील,मन प्रसन्न करतील.
              
                शेवटी आज त्याने ठरवले तिला काय आवडायचे ते सगळे करायचे.मस्तपैकी भटकायचे.त्याच्या गाडीने सुसाट वेगाने निघाला तो.तिला आवडणाऱ्या ठिकाणी जाण्यासाठी.सगळ्या जागा जिथे दोघे फिरले होते एक एक करून फिरणार होता अस ठरवूनच टाकले त्याने.बागेत ज्या ठिकाणी 'ती' बसली होती तिथे परत पिवळ्या फुलांचा सडा होता.ती फुले आजही तशीच तितकीच पिवळी आणि सजीव वाटली त्याला!पानांच्या कमानीखाली त्याला ऐकू आले 'त्यांचेच' संवाद.दर वेळी येणाऱ्या पहिल्या पावसात मनसोक्त भिजायचे 'तिच्यासाठी'.तिला आवडणाऱ्या कविता त्याने परत वाचल्या एकापाठोपाठ एक.त्याला न समजलेल्या कविता 'ती' कशी त्यांचा अर्थ समजवायची त्याला, ते आठवत होता तो तेव्हां.
              
                   तिला आवडणारे पदार्थ खायचे ठरवले.तिची आवडीची पुस्तके वाचायचे आणि तिला आवडणारे त्याचे शर्ट परत एकदा कपाटातून काढले त्याने,जे खराब होऊ नयेत,'तिने दिलेली भेट' म्हणून,कपाटात आराम करत होते अनेक वर्ष.तिला आवडती गाणी,एकत्र ऐकलेली अनेक, त्याने परत कानाला लावली.एक एक करून सगळे सोबतीने पाहिलेले चित्रपट तो पाहणार नक्कीच!घराच्या भिंतींना रंग द्यायचे ठरवले त्याने.नवा रंग,'तिच्या' आवडीचा,आणि पडदे पण आवडत्या रंगाचे विकत घेऊन आला तो.

             
               जी गोष्ट त्याच्यासाठी किवा तिच्यासाठी खूप अवघड गेली असती,समजून घेणे कि 'एकमेकांशिवाय कसे जगता येईल',ते नीट समजून घेत जगायचं असा निर्णय घेतला त्याने.तिला आवडले असते आज जर,ती असती सोबत तर,त्याची ' positive attitude'.....आणि म्हणाली असती 'ती' त्याला,"नेहमी असाच हसत  राहा".कारण तो कधी मौन,अशांत,दुखी झालेला तिला आवडलाच नसता.'तिच्यासोबत परत एकदा जगायचे आहे त्याला आणि जिवंत करायच्या आहेत त्या सगळ्या सगळ्या आठवणी'....

            रडत,मनातून खचून जाऊन जगून चालणार नाही न!'तिला' नक्कीच आवडले नसते हे.'तो' स्वतःशीच हसला.तिच्यासाठी आजही तितकाच हळवा होत परत एकदा त्याच रस्त्याच्या वळणावर आला होता 'तो'.ज्या वळणावर त्याने गाडी उभी केली होती,'तिला' पहिल्यांदा पाहत उभा होता 'तो.परत एकदा त्याच वळणावर थांबून पहिले.खूप आवडले,सगळे परत एकदा आठवले,चित्र उभे राहिले,बरंच काही अगदी त्यावेळची हृदयाची धडधड पण तशीच होती. 'त्याच्या' मनातल्या 'तिचे' हसू 'स्मित' बनून ओठांवर आले 'त्याच्या',परत कधीही न लांब जाण्यासाठी.' अशीच जवळ राहा नेहमी,"म्हणाला 'तो' .
    -लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

  1. माणसाला स्वत:च्या संवेदनांची तीव्रता फार काळ टिकवून ठेवता येत नाही .. जगाची रीत म्हणा की शरीरधर्म म्हणा .. नाव आपण त्याला आपल्या सोयीचे देतो .. पण काळ कोणासाठी थांबत नाही हे अनेकदा मनावर चरा उमटवून गेलेले सत्य आहे .. काळ आपल्यासाठीही थांबणार नाही हे कळून मग जगणे अधिक अर्थवाही होते ...

    उत्तर द्याहटवा
  2. हो खरे आहे सविता तुझे.आपल्याला स्वतःला पण स्वतःबद्दल पण हि जाणीव सहजगत्या मान्य करता येत नाही,बोलतो आपण पण मनापासून त्याचा स्वीकार करणे किती जणांना जमते?ठरलेला काळ ठरलेले कार्य देऊन बाप्पा पाठवतो पृथ्वीवर.आपण सगळे सहज जगू शकतो कारण हे कटू सत्य एकसारखे समोर येत नाही आणि कोणी आणतही नाही.ज्या व्यक्तीच्या साथीने आयुष्य पुढे जात असते तिचे अचानक झालेले निधन हि गोष्ट समजून घेणे,आणि त्या व्यक्तीबद्दल असलेल्या भावनांची तीव्रता,एकमेकांबरोबर असणारे नाते,ह्यावर सर्व अवलंबून असते.पूर्ण आयुष्य एखाद्याच्या आठवणीवर जगणारे लोक पण आहेतच.... व्यक्तीव्यक्तीवर अवलंबून आहे पण शेवटी सकारात्मकतेने जिंकणे योग्य आणि 'जिन्दगीका सफर,है ये कैसा सफर कोई समजा नहीं कोई जाना नहीं! खरे आहे न?

    उत्तर द्याहटवा
  3. Khup chhan lihila ahes! Manus physically javal nastana pan kiti javal rahu shakto, rather tya naatyat aapan kiti javaleek theu shakto, ani tyasathi kay kay karu shakto he jyache tyanech tharvayche aste...Very positive message spread through this blog!

    उत्तर द्याहटवा
  4. तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद कौस्तुभ.:)'सकारात्मकता'अश्या वेळी खूप महत्वाची असते.प्रत्येकाच्या मनाची अवस्था वेगळी,स्वभावावर असते शेवटी.पण आपल्या आवडत्या व्यक्तीच्या अचानक जाण्याचे सत्य पचवणे आणि मग त्या सत्याला सामोरे जाऊन ती साथ कशी बरंच काही शिकवून,दाखवून गेली हे समजून घेत आयुष्यात पुढे जाणे खूप महत्वाचे आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. Khup chhan ,hich khari sath ahe ki jichya janya nantarhi ti tyala shakti ,prerana ,khari sath det rahili na,khara tar apali hi sharire hi nashivantach asatat pan tya kalat apan dileli sath ,vatalele prem hech shashwat asate ,ani tech nirantar sath det rahate ,ya blog madhun khup chan message milala

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ