आठवण एक साठवण!

              आजोबांचे एक मित्र आठवतात.त्यांच्याकडे आम्हीं लहानपणी खेळायला जात असू.खरेतर त्यांच्याकडे लहान मुले  नव्हती पण तरीही आम्हीं हट्टाने त्यांच्या घरी आजोबा निघाले कि निघत असू.ह्यांना आम्हीं 'जोशी आजोबा' म्हणायचो.जोशी आजोबांच्या पत्नींना 'मनुताई' म्हणत असू.रघुनाथराव जोशी हे आजोबांहून वयाने मोठे.शिडशिडीत देहाकाठी,उंच होते.अंगावर पांढरा शुभ्र सदरा आणि धोतर असा त्यांचा वेष असे.
           
                 आज अचानक मनुताईंची आठवण आली,का आली तर,'कांद्यापोह्यांचा' विषय निघाला आणि मी आत्ता पर्यंत खाल्लेले लक्षात राहिलेले असे पोहे म्हणजे जोशी आजोबानकडचेच मनुताईनच्या हातचे.मग अर्थात मनात जुन्या आठवणी गोळा झाल्या.सगळे सगळे जे बोलले जोशींबद्दल ते इथे लिहावेसे वाटू लागले म्हणून हा प्रयत्न.
           
                 कित्येक माणसे आपल्या लहानपणापासून आपल्या आयुष्यात येतात.त्यातली काही अनपेक्षितपणे बरच काही देऊन जातात.काही माणसे लक्षात राहतात.लहान लहान गोष्टीं मधून देखील हि माणसे असे काही शिकवून जातात कि जे आपल्याला पुढील आयुष्यात मार्गदर्शक ठरते.जोशी आजोबा आणि मनुताई,खरे तर 'जोशी आजी' म्हणायला हरकत न्हवती आम्हां मुलांना त्यांना,पण सुरवाती पासूनच 'मनुताई' हेच त्यांचे नाव कानावर आले होते न!सुरवातीला मला प्रश्न पडे कि त्यांना 'मनुताई' असे का बरे म्हणत असावे?मग अंदाज आला कि त्यांच्या लहान भावंडांना त्या 'ताई',मग ते नाव तसाच सर्वांच्या तोंडी येऊ लागले असावे..
               
               जोशी आजोबांना ३ मुले होती,अर्थात सगळी शहरात स्थायिक झालेली.आजोबा आजी आपल्या लहानश्या कोकणातल्या घरात राहत होते.सुटीत मुले नातवंडे येऊन जात.आजोबा वैद्यकी करत.
त्यांचे घर आजही डोळ्यापुढे जसे च्या तसे उभे राहते आहे.कमाल वाटते!काही म्हणून बदल नाही.अर्थात आता अनेक वर्ष उलटून गेली आहेत.ते घर,मी असे ऐकले कोणी विकत घेतले आणि त्यात बदल हा तर झालाच असणार!पण मी मात्र तो मान्य करू शकत नाही.माझ्या मनःचक्षूनपुढे मात्र ते बैठे कौलारू घर,अंगण,तुळस आणि घरासमोरचे प्राजक्ताचे झाड तसेच्या तसे येते.जास्वंद,रातराणी,गुलाब,झेंडू अशी आणखीन पण फुलझाडे होती.घरापाठी देखील थोडी झाडे होतीच,नारळ,फणस,चिकू आणि केळी हि मागील दारी........घरासमोरचा भाग,ओटीवर संध्याकाळी दिवा लागे,लहानसा.तुळशीपाशी पण.
          
                 घरात आत गेले कि;डाव्या हाताला एक झोपाळा होता लाकडी.हा झोपाळा म्हणजे आमचे हक्काचे सिव्हासन.ते सुधा अगदी आमच्या लहान विश्वात आकाशापर्यंत उंच झेप घेणारे!आल्या आल्या पहिले आम्हीं मंडळी ह्या झोपाळ्यावर दंगा करत असू.आजोबा आणि मनुताई कधी कधी रागावलेले आठवत नाही.उलट कौतुकानेच पाहत.त्या झोपाळ्याच्या जुन्या कड्या करकरत,तो आवाज आजही कानात उमटतो.आमची गाणी चालत झोपाळ्यावर बसून.गाण्याच्या भेंड्या....धमाल यायची.


                 भिंतीवरचे जुने घड्याळ आठवते,टोले देणारे मोठे घड्याळ.झोपाळ्यावर सुरवातीला नुसते बसणे मग हळू हळू आडवे होऊन मान खाली करून उलटे होऊन जमिनीला हात लावणे,झोपाळ्यावर उभे राहणे इत्यादी कसरती पण असायच्या आमच्या!घर बैठे असले तरी सुरेख ठेवले होते मनुताईनी.एक बैठक होती सोप्यावर जिच्यावर आजोबा आणि जोशी आजोबा गप्पा मारत बसत.आजी आणि मनुताई आत बोलत बसत. मनुताई माझ्या आजी सारख्याच नऊवार नेसत,त्या खूप उंच न्हवत्या,म्हणायला आजोबा आणि आजींची जोडी 'अमिताभ जया' सारखी म्हणता येईल.जोशी आजोबांना एक गोष्ट मात्र आवडायची नाही जर आम्हीं त्या बैठकीवर शुभ्र चादरीवर उड्या मारल्या तर ते रागवत पण तो राग देखील काही खरा न्हवंताच.त्यांच्या सुपारीच्या डब्याकडे आमचा डोळा असायचा.अडकित्ता हातात घ्यायचा नाही असा नियम होता.आणि चुना आणि तंबाखू ह्यापासून लांब राहायचे.बाकी हट्टाने मी सुपारी मागून घ्यायचेच.बडीशोप ती पण मिळायची.


                 मनुताईच्याकडे एक सन्दुक होती.लाकडी जुने घरात फर्निचर.आरश्याचे कपाट पण वेगळेच होते. त्याच्या वर्तुळाकार कमानीवर सुंदर लाल हिरवी नक्षी कोरलेली आठवते.लालसर,तपकिरी रंगाचे लाकूड होते ते,जुने आणि मजबूत.पलंग,जुन्या काळचा आजकाल असे फर्निचर सहसा आढळत नाही आणि असेल तर खूप महाग.पण सन्दुक मात्र अगदी वेगळी होती,समुद्री चाच्यांकडे चित्रपटात दाखवतात तसली मोठी पेटी.मला खूप नवल वाटायचे ह्यात काय असेल?शेवटी एकदा मनुताईंनी ती उघडली.त्यांच्या मागे जाऊन आम्हीं सगळे उत्सुक गर्दी करू लागलो पाहायला कि आतून कोणता खजिना बाहेर येतो, आत काय असावे? तर त्यांनी स्वतः तयार केलेल्या मऊ रजया,हाताने विणलेले स्वेटर,थंडीचे काही कपडे,जुने फोटो आणि असच बरंच काही....
                
                मनुताईचा आवाज छान होता त्या कधी गाणे गुणगुणत.छान वाटायचे जुनी मराठी गाणी.आम्हां मुलांना त्यांच्या घरातले आणखीन एक आकर्षण म्हणजे मांजरी ...१, किंव्हा २ नाही तर ५ ते ६ आणि त्या पण वेगवेगळ्या रंगाच्या मांजरी.मनुताई त्यांच्याशी मराठीत छान गप्पा मारत.आणि हि मार्जार मंडळी त्यांना प्रतिसाद हि देत,ऐकत म्हणायला हरकत नाही.वेडे लाड न्हवते पण कधी मारहाण देखील नाही.ह्या मांजरी आपल्या शाकाहारी अन्न खाऊनही आनंदात असायच्या छान गुबगुबीत होत्या आणि आम्हाला खूप आवडायच्या.
       
              एकदा आठवते रविवारी मनुताईनच्या स्वयंपाकघरात एक लहानशी चहापार्टी आम्हां लहान मुलांसाठी खास.त्या स्वयंपाकघरात जे वाटले होते तेव्हा ते आजतागायत इतक्यांच्या घरात गेले,कधी जाणवले नाही.काहीतरी असे होते त्या जागेत कि जे मनाला हवेहवेसे वाटायचे.आजही वाटते.
मनुताईनी केलेले मनमोकळे स्वागत असो,त्यांच्या हातचा चहा असो,उत्तम पोहे असोत........खास खासच खास!
त्यात एक गोष्ट होती;' मनापासून भरभरून केलेले स्वागत आणि प्रेम,वात्सल्य.'जेव्हां त्या लहानश्या वाटीतून गुळपोहे,कधी कांदे पोहे खात असू तेव्हां ते स्वयंपाकघर बोलू लागे,ती चूल,ती भांडी,कोपऱ्यातले सुके नारळ,पाण्यासाठी कळश्या आणि भिंतीतली कपाटे,जाळीचे कपाट ज्याच्याकडे मनी मऊ नेहमी आशेने पाहत असायची, एक मनी तर त्या कपाटावर स्वार असायची नेहमीच! चुलीच्या मागे उंचावर भिंतीतली खिडकी होती त्याचे लाकडी गज आणि त्यातून येणारे उन्हाचे कोवळ्या सूर्याचे कवडसे.बाहेरून येणारे पक्ष्यांचे आवाज,आणि दूरवरचा रहाट, त्याचा आवाज. घरात विविध भारतीची गाणी लागत. हे स्वयंपाकघर नेहमीच हसरे,मोकळे आणि स्वागत करणारे वाटायचे.


              मनुताई अमृतांजन लावत तो वास त्यांच्या घरात असायचाच.मला निलगिरीचा वास का आवडतो कोण जाणे! कदाचित लहानपणच्या आठवणी असाव्यात आणि मला परत एकदा जोशी आजोबांच्या घरी घेऊन जात असाव्यात.जोशी आजोबांचा चष्मा आठवतो, आता तशी फ्रेम सापडणे कठीण. मुलांनी त्यांच्याकडे येऊन राहावे अशी जोडप्याची इच्छा होती पण कोणाला जमले नाही.तक्रार न करता आल्या गेलेल्यांचे मनापासून स्वागत करत राहणारे हे जोशी दाम्पत्य.


            ह्या त्यांच्या घरातल्या 'स्वागतात' काही खास होते.मला आजही वाटते परत एकदा लहान होऊन जोशी आजोबांकडे जावे, आणि तसेच त्यांच्या घरात मनमोकळेपणे खेळावे.
गेले ते दिन गेले! पण तरीही स्मृतींना न आवरता,मी मनुताईनच्या हातच्या पोह्यांची चव आठवत असते.
आणि एकेकदा तो मनुताईनी बनवलेल्या कडक चहाचा स्वाद स्मृतीत घोळवत राहते.
- लेखिका श्रिया (मोनिका रेगे)

टिप्पण्या

  1. खरंच आहे ते! शेणाने सारवलेली जमीन, पांढऱ्या मातीने लिंपलेली भिंत व तिचा तो खरपूस वास, घरात असलेली घागरींची व हंड्यांची उतरंड, चुलीच्या मागे उंचावर भिंतीतली खिडकी,..... गेले ते दिन, उरल्या त्या आठवणी...

    उत्तर द्याहटवा
  2. प्रथमेश आणि प्रशांत आपल्या अभिप्रायांबद्दल धन्यवाद!
    कोकणातल्या जुन्या घरातली ठराविक मांडणी आणि प्रथमेश आपण म्हटल्या प्रमाणे पांढऱ्या मातीने लिंपलेली भिंत व तिचा तो खरपूस वास,घरात असलेली घागरींची व हंड्यांची उतरंड,चुलीच्या मागे उंचावर भिंतीतली खिडकी,..... गेले ते दिन,उरल्या त्या आठवणी..आणि ह्या अश्या आठवणी सतत मनात घर करून राहतात,कारण हि गेलेली माणसे न मागता बरंच काही देऊन गेली आहेत!

    उत्तर द्याहटवा
  3. एकदम चित्रमय लिहील आहे तुम्ही... पाहिलेलं नसतानाही ते घर आणि आजी आजोबा डोळ्यांसमोर उभे राहिले :-)

    उत्तर द्याहटवा
  4. सविता तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
    लहानपणच्या आठवणी ह्या खूप मनात घर करून राहतात,आपण सर्वांचाच हा अनुभव असतो.नाहीका?

    उत्तर द्याहटवा
  5. मस्तच....लहानपणच्या सगळ्या आठवणींनी मनात फ़ेर धरला आहे... :) :)

    उत्तर द्याहटवा
  6. धन्यवाद योगेश,जेव्हां आपण काही लिहितो आणि वाचणाऱ्याच्या मनात आपल्या मनातल्या विचारांचे पडसाद उमटतात तेव्हां समाधान वाटते.

    उत्तर द्याहटवा
  7. श्रिया ताइ आजच्या पुणे टाइम्स मध्ये हा लेख प्रसिध्द झाला आहे....तुझ हार्दिक अभिनंदन ः) ः)

    उत्तर द्याहटवा
  8. योगेश छान वाटले तू दिलेली बातमी ऐकून....लिखाणाला वाचक मिळाले कि अजून लिहावेसे वाटते नाहीका?
    बहिणीने पुण्याचा टाइम्स बाजूला काढून ठेवला.
    सर्वांना खूप आनंद वाटला...आभारी आहे!!

    उत्तर द्याहटवा
  9. श्रिया ताइ तुला त्याची scan copy हवी असेल तर सांग मी पाठवु शकेन. ः)

    उत्तर द्याहटवा
  10. नक्कीच योगेश चालेल.... धावेल ...पळेल....आवडेल! पाठव कि copy .... thanks!

    उत्तर द्याहटवा
  11. ज्या वाचकाने हे post वृत्तपत्रासाठी निवडले त्याचे मी मनापासून आभार मानते!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ