" नेमेची येतो बघ ' पाववाला ' ! "

          "नेमेची येतो बघ 'पाववाला'!" ह्या वाक्यातला बदल, तुमच्या लक्षात आलाच असेल! पण हे अगदी खरे आहे हं! एक वेळ 'पावसाळा' मागे पुढे सुरु होईल पण 'पाववाला' मात्र अगदी नियमित येणारी व्यक्ती आहे.
                   
             
            शहरातून ठराविक भागात बेकरीतले काही पदार्थ सायकलवरून विकणारा हा 'पाववाला' आणि त्याची ती ठराविक हाळी ऐकली कि सवयीने सकाळी सकाळी लोक पैसे तयार ठेवतात. मऊ आणि कडक पाव, खारी आणि बटर शिवाय आणखीनही  बरेच गोड पदार्थ देखील हे आणून देऊ शकतात. नियमितपणा चुकलेला नाही ह्याला. पावसाळ्यात मुसळधार पावसात देखील हजेरी लावणारच.सायकल कोपऱ्यावर लावून अगदी गुढघाभर साठलेल्या पाण्यातून  चालत येणारा पाववाला पण पहिला आहे मी.ठरलेली घरे, ठरलेले पैसे ह्यासाठी इतकी धडपड! कधी एक शब्द जास्त बोललेला आठवत नाही, आहे मराठीच पण 'रामराम' हा एकच शब्द आणि 'किती देऊ पाव?' हा दुसरा प्रश्न सोडला तर काहीच ऐकले नाही कधी.पांढरा सदरा, लेंगा, टोपी आणि सायकलवर पाठी टोपलीत आणि पुढे पिशवीत हे बेकरीचे जग घेऊन फिरणारा पाववाला, मुंबईकरांची सोयीची घराघरापर्यंत  पोहोचलेली बेकरीच म्हणावी लागेल!
             
                 असाच, आपला सकाळचा एक आणखीन सोबती म्हणजे,वृत्तपत्र घराघरात ठराविक वेळेला जाईल ह्याची काळजी घेणारा 'पेपरवाला'.आता ह्याचे नाव काय कोणास ठावूक! ह्या सर्वांची नावे गुलदस्तात असतात. पण 'पेपरवाला' हे नावच सर्वांना लक्षात,अगदी लहान मुलांना पण.त्या दिवशीची ताजी बातमी माहित नसली तरीही; त्या बाबत उत्सुकता कितीही असली तरीही; आपल्याहून जास्त महत्वाचे गिऱ्हाईक आहे आणि त्यांना योग्य वेळी पेपर दिलाच पाहिजे हि श्रद्धा! क्वचित उशीर होतही असे ह्याला यायला,पण मग कसे आहे न,कि 'वृत्तपत्र वाचन' हे पण काही जणांना व्यासानासारखे असावे,त्यामुळे एखाद दोन शब्द तोंडातून निघून जात असावेत ह्या पेपरवाल्यांवर.त्यांची हाळी पत्र लक्षात राहण्यासारखी असते....'.पेपाआर्र्र्रर्र'
           नंतर येणारा म्हणजे 'दुधवाला' जो हल्ली फारच दुर्मिळ झाला आहे...... 'भय्या' आणि मग त्याच्याशी आपल्या special  हिंदीत केलेले संवाद, .... आमच्या घरी येणारा 'भय्या' पण साधा न्हवता.....दुधात पाणी कि पाण्यात दुध असा प्रश्न पडावा,नेहमीचा वाद, शेवटी 'आरे कॉलोनी' मदतीला आली.हल्ली तर पिशवीतले दुध घेतले जाते आहे.

           एक आणखीन व्यक्ती जिची वाट सगळेच लहान थोर पाहतात .हल्ली  इमेल मुळे पत्रव्यवहार खूपच कमी झाले आहेत हे जरी खरे असले तरी 'पोस्ट' आपली जागा आणि महत्व टिकवून आहे,आणि ह्या पोस्ट ऑफिस आणि सर्वसामान्यानमधला दुवा म्हणजे ' पोस्ट मन '.किती मोठे काम करतात नाही हे लोक! लहान पदावर बसूनही त्यांचे महत्व फार असते.
       
          ह्या सर्वांच्या वेळा पण ठरलेल्या असायच्या. ह्या नंतर येणारा मुख्य,अत्यंत महत्वाचा,म्हणजे 'डबेवाला'.....हा तर पायाला चाके लावलेली एक चालती बोलती गाडीच! पटापट डबे घेऊन जायचे आणि योग्य व्यक्तीला ते कसे मिळतील आणि ते सुद्धा' गरम' ह्याची उत्तम सोय केलेली  असते. मुंबईकरांचा खरा मित्र म्हणायला हरकत नाही! कधी फालतू चौकश्या नाहीत, डबा घेतला कि दुसरया मिनटाला गायब! ह्यांची मुंबईला खरच गरज आहे! कारण सर्व ऋतू सारखेच म्हणणारे फार कमी लोक आहेत सध्या आणि त्यातले हे डबेवाले!
           
               मग येणारी मंडळी आठवणीतली, म्हणजे धोबी दादा जे आमच्याकडे यायचे पण नंतर त्यांच्या मुलाने इस्त्रीचे दुकान थाटल्यावर मात्र ह्या दादांचे येणे कमी झाले....वय पण झाले होते आणि थोडीशी कुरबुर पण कामात होतीच.
 
           ह्यातली काही मंडळी थोडी आरामात येणारी,बसून चार दोन गप्पा मारणारी अशी....ह्यात भाजीवाली, कोळीण मावशी ह्या दोघी पण धरता येतील.भाजीवाली तर अगदी नेहमीची, कारण ती लहान असताना तिच्या आई बरोबर घरी यायची. मुंबईचा  काही भाग हे तिचे जग . तिथे भाजी विकली कि काम झाले. एक लहान खोलीत संसार पण अगदी नेटका...घरात काय नाही? सगळे सगळे आहे, TV पासून, mobile phone पर्यंत......मुले शिकताहेत हे अभिमानाने सांगते तेव्हां छान वाटते.तशीच कोळीण मावशी 'ताजा बाजार' देऊन जाणारी, विश्वासू....... घरात काही गोड धोड केले कि सणासुदीला प्रसादाचे ह्यांना देण्याचा नियम आहे. कारण ह्या सगळ्या व्यक्ती कालानुरूप जोडल्या गेल्या आहेत न घराला!!

             ह्या दोघींची आणखीन एक खास गोष्ट म्हणजे, सगळ्या बातम्या म्हणायला,सगळी  सोसायटी सोबत घेऊन फिरायच्या ह्या! घराघरात जा  आणि ज्या बातम्या मिळतील त्यातल्या काही उत्तम निवडून त्यावर दुसरीकडे जाऊन चर्चा करणे.....त्यात मग मध्येच  विक्री करणार त्या गोष्टींवर भाव पण करणे घासाघीस हे तर असायचेच , आधी भाव वाढवून मग तो थोडा कमी करून विकणे हा तर स्थायीभाव! पण एक मात्र आहे ह्यातल्या कोणीच  कधी फसवणूक केली नाही ! आणि मुद्दाम लबाडी तर कधीच नाही!
          
                 काही घरांमध्ये पोळ्या बनवायला बाई, स्वयंपाक करायला मावशी आणि घर साफ करायला ( भांडी धुणी) मावशी पण आता washing machine आल्याने कपडे वळत घालणे हे काम उरले आहे.....               
           आज कालच्या धावपळीच्या शहरातल्या जगात, कोणालाच उसंत नसते, अश्या वेळी हि काही मोजकी मंडळी रोजच्या जीवनात येऊन त्यांच्या परीने मदत करून जातात.ह्या 'मदतीचे' पैसे,बक्षिसी पण घेतात,सणासुदीला कपडे,आणि मिठाई पण घेतात पण प्रेमाने आणि नियमाने कामे पण करतात.सगळे जरी कितीही यांत्रिक होऊ लागले असले, तरीही ह्या व्यक्तींचे महत्व कमी होणार नाही, आणि आठवणीत राहिलेली हि माणसे त्यांच्या घरातल्या प्रश्नांना काही काळ विसरून चार दोन चांगले शब्द ,विचार वाटून जे काही देऊन जातील ते खरच महत्वाचे आहे! नाही म्हणायला आपले धावपळीचे आयुष्य  थोडे सोपे करणारी हि मंडळी 'पावसाळ्या' इतकीच  महत्वाची आहेत नाहीका!
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ