हा सागरी किनारा....





















तुझ्या संथ निळाईत तुझी अथांगता सामावलेली आहे. लाटांच्या गर्जना आणि अलगद स्पर्श करून जाणारया , लाटांचा समान लयीतला आवाज.... तुझ्या विशालतेला तुलना नाही! हिमालयाच्या उत्तुंगते सारखीच हि विशालता अवर्णनीय आहे ! लोभस किनार्याची तुला साथ असतेच.किनार्याला इतका मोह होतो तुझा; कि दिवस अन रात्र तुझ्या कवेत राहतो .....

सागराच्या अस्तित्वाच्या खुणा आस पास पसरलेल्या असतात ,अनेक शिंपले , शंखांच्या रुपात.त्याच्या पोटातले जग इतके जिवंत आहे आणि रंगीत आहे कि आम्ही पृथ्वीवासी पण पराजय पत्करू! तुझ्याबद्दल काहीतरी गूढ वाटत आले आणि अनेक कवींनी ते त्यांच्या कवितांमधून सुंदर तरहेने वाचकांपर्यंत पोहोचवले...तरीही शब्द पुरेसे नाहीत असे ते सौंदर्य आहे!

मला सुरवातीपासूनच सागराचे आकर्षण होते .समुद्राच्या त्या लाटांना पावलांचा स्पर्श जवळ जवळ दर आठवड्याला झालाच आहे! किनार्यावर जाऊन ह्या निसर्गाच्या वरदानाला एकदा तरी भेट दिली जायचीच.

कोकण पट्टीला तर हे निसर्गदत्त वरदान लाभले आहे. मी लहानपणी ज्या गावात होते ते गाव समुद्रानजिक होते .....
आमच्या शाळेच्या पाठीमागे समुद्र किनारा. नेहमी सर्व वर्गांना समुद्रावरून येणारे खारे वारे , गार ठेवत असे ,कधी पंखा लागलेला आठवतच नाही.
शाळेच्या पाठीमागे सुरुची झाडे होती.....


लहानपणी आजोबांबरोबर आम्हीं भावंडे समुद्रावर जात असू. आठवड्यातून २ दिवस तरी हा कार्यक्रम ठरलेला होता. घरापासून समुद्र १५ मिनिटांवर होता. आजही त्या समुद्रावर जायच्या रस्त्यावर तशीच सुकी वाळू पसरलेली आहे जशी माझ्या लहानपणी होती. रस्त्याच्या दुतर्फा नारळी पोफळीच्या वाड्या .... सुपारीची पण झाडे होती वाड्यांमध्ये. रहाटाचे आवाज येत....लोकांचे आवाज कधी कधी कानावर पडत. खूप नीटनेटक्या ठेवल्या होत्या ह्या वाड्या त्यांच्या मालकांनी.... समुद्राजवळ असण्याचा काही फायदा नक्कीच असावा त्या झाडांना.

उतरत्या उन्हाचे आम्हीं घराबाहेर निघत असू, उड्या मारत, पळत मध्येच एकमेकांचे हात धरत , सोडत ,खेळ , गप्पा ह्यांना उधाण यायचे. ह्या वाळूने भरलेल्या कच्च्या रस्त्याची एक औरच गम्मत होती! पाय वाळूत बुडून जायचे मध्ये मध्ये, आणि समुद्रावर जातो आहोत ह्याचा आनंद अधिकच जाणवायचा.... पळता पळता मध्येच पायातली चप्पल मागे रहायची वाळूंत अडकून; आणि मग ती हुडकून काढून परत निघायचे पुढे.ह्या वाळूच्या रस्त्यावरून जाताना वर्दळ म्हणजे बैलगाड्या, घोडागाड्या त्या मोजक्याच आणि सायकली.....पायी जाणारे लोक खूप भेटत..... ओळखीचे नमस्कार चमत्कार घडत.... छान वाटायचे !

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या ह्या वाड्या इतक्या दाट होत्या कि त्यांची जणू काही शाकारणी ह्या रस्त्याला होती असं वाटायचे. दिवसाढवळ्या पण सूर्यप्रकाश कमीच यायचा त्या रस्त्यावर, आणि संध्याकाळच्या वेळी नक्कीच लवकर काळोख पडायचा तिथे. ह्या रस्त्याला लागलो कि मग एक वेगळंच वातावरण असायचे.... काय काय खेळायचे समुद्रावर ह्याच्यावर आमची आपापसात बोलणी होत, हा रस्ता संपत आला कि एक पक्का लहानसा रस्ता ह्या रस्त्याला अडवा जात असे. त्याच्या एका कडेला एक मारुतीचे देऊळ होते... नेहमी समुद्रावर जाताना त्या लहानग्या देवळात मारुतीचे दर्शन घेऊनच आम्हीं पुढे जात असू हा क्रमच होता. उजव्या हाताला कोळीवाडा होता.. आणि हा डाव्या हाताचा रस्ता समुद्राकडे जायचा.... मग दोन्ही बाजूला खारी जमीन आणि त्यातली झुडपे ह्यांचे पसरलेले साम्राज्य! खारे वारे अंगाला झोंबत आणि खाऱ्या खाडीच्या वासाची आठवण आजही येते.

तिथेच जवळ एक स्मशानभूमी होती. आम्हां भावंडांना नेहमीच ह्या स्मशानभूमी जवळून जाताना भुताखेतांच्या गोष्टी आठवत....लहानपणीच्या खास गप्पांमध्ये ह्यांचा समावेश होता,ह्या गोष्टीतल्या खरया किती असतील कोण जाणे पण त्या एकमेकांना सांगताना मनात भूतांचा वावर असायचा !!! मग जसजसा समुद्र जवळ यायचा तसतसे वारे आणि दर्याचा तो आवाज कानावर पडायचा ,आपसूकच पायांना गती यायची.....अर्थात वेळेचे बंधन होते, घरी दिवेलागणी पूर्वी पोहोचायचे असायचे न!

समुद्रावर आलो कि पायातल्या चपला अक्षरश गळून पडायच्या, आणि मग ओल्या वाळूचा पहिला स्पर्श पायांच्या तळव्यांना दर वेळी नवीनच वाटायचा. पहिला काही वेळ पकडा पकडीत जायचा मग वाळूचे किल्ले , त्यात पाणी लागले कि कोण आनंद व्हायचा! कपडे किती मळायचे त्याचे भान कोणाला असायचे! पण मनसोक्त खेळून झाले कि समुद्राच्या लाटांशी खेळायला जायचो.... त्या लाटा जणू संवाद साधत आमच्याशी. गेल्या वेळी काय केले होते, कसे खेळलो होतो त्याचा आढावा घेत असू आम्हीं...ह्यावेळचा किल्ला जास्त छान झाला कि गेल्यावेळचा छान होता,ह्यावर वाद घालत असू. मग शिंपले शंख गोळा करत असू. सोबत दर वेळी एक पिशवी असायची, इतके सारे शिंपले तेव्हां त्यांचे रंग आणि आकार पण वेगवेगळे वाटत.दर वेळी नवीन वाटत .किती सुंदर !!! आणि मागे किती सारे घेऊन गेलो होतो घरी त्याचे अनमान राहत नसे . आई मात्र थोडी रागवायची कारण, सारखे घरात शंख आणि शिंपले येतात आणि मग त्यांचे करायचे काय असा प्रश्न पडतो! असे ती नेहमीच म्हणायची! पण आम्हाला हे शिंपले गोळा केल्याशिवाय त्या दिवशीची समुद्रावरची सहल पूर्ण झालेली वाटायचीच नाही .

हळू हळू रवि आपल्या किरणांचा पसारा एकत्र करू लागायचा . आकाशाचे रंग तर अप्रतीम होते , दर वेळी त्यांची वेगळीच रंगसंगती दिसायची .त्या रंगांकडे पाहताना कोणता रंग जास्त खुलतो आहे ते कळायचे नाही...पण केशरी रंगाच्या त्या सुर्यनारायणाला निरोप देताना आता घरी जावे लागणार ची सूचना मोठ्यांकडून मिळालेली असायची. ती संध्याकाळ तिच्या त्या मावळतीच्या रूपाने उजळून निघालेली असायची आणि आम्हीं भावंडे सुद्धा खूप खेळून समाधानाच्या, आनंदाच्या ,लाटा झेलत घराकडे परतत असू.

परतताना काळोख पडायचा आणि मग रस्त्यात एका खांबावर , उंचावर एक विजेचा दिवा . त्याच्या पांढरया शेड वर दिव्याच्या दिशेने ,आलेली खूप सारी पाखरे असायची.....तो दिवा कितपत रस्त्यावर उजेड पाडायचा ,सांगणे कठीण! पण आमच्याकडे torch light असायचा, मग पळत धावत पक्क्या रस्त्यावर यायचो. वाळूच्या रस्त्यावर असताना कधी कधी इतका काळोख असायचा , कि काहीच दिसायचे नाही मग आम्हीं सगळे एकमेकांच्या अगदी जवळ हात धरून चालत असू, त्यात पण एक गम्मत होती. दुरून पक्का रस्ता जवळ आल्याची खूण म्हणजे बस गाड्यांचा आवाज आणि लोकांचे आवाज.... घराघरातून दिवे लागणीचे सूर असत .... धुपाचा , उदबत्यांचा सुगंध दरवळायचा . खूप प्रसन्न वाटायचे.....

समुद्राचे वेड काही माझे कमी झालेले नाही. उलट जेंव्हा भारतात जाते तेव्हा ठरवून समुद्रावर जातेच आणि ते पण अगदी मोकळा वेळ काढून.... सोबत जर चांगली असेल तर मग हा किनारा आणखीनच छान वाटतो... किती सारे सुचते आठवते इकडे . किती जणांचे मोकळे स्वागत करतो हा दर्या. "या , माझ्या जवळ बसा , माझ्याशी मोकळेपणानी बोला , हवा तेव्हढा वेळ घ्या," असं सांगणारा हा आपला सखा किती सारे देतो आपल्याला ! न मागता देतो! लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्व जण ह्या किनार्यावर आलेले असतात.
ठराविक जागा आणि ठराविक वेळेला येणारे ठराविक लोक...दिसतातच.


इकडे भारतभूमीपासून लांब परदेशात आल्यावर , मी समुद्रकिनार्याला पारखी झाले आहे.... पण अनेक आठवणी आणि छायाचित्र जमवली आहेत.
तो तसाच समुद्र, ती तशीच वाळू आणि तो तसाच सूर्य इकडे सापडणे कठीण , पण तरीही तो सागरकिनारा इतका भिनला आहे मनात कि डोळे मिटले तरीही डोळ्यांपुढे चित्र उभे राहते आहे ,आणि नेहमीच हे चित्र साथ देते आहे!


ह्यावेळी भारतात समुद्रावर गेले तेव्हां परत ती केशरी संध्याकाळ आणि खूप सारे आकाशाचे रंग माझ्या कॅमेर्याने टिपले , आवडतात का पहा बरे!

-लेखिका श्रिया (मोनिका रेगे)






टिप्पण्या

  1. वा ! काय छान लिहिले आहे !..कोकणात गेल्यासारखे वाटले अगदी...
    ते दिवस किती छान असतील...?
    आणि हो...तुमच्या कॅमेरा ने टिपलेले छायाचित्र तुमच्या लिखाणा प्रमाणेच अप्रतिम :)
    असेच तुमचे लिखाण वाचायला आवडेल यापुढे ,जे आठवणी अगदी ताजे करून जाते

    उत्तर द्याहटवा
  2. खूपच छान लिहीले आहेस गं... तुझ्या टिपलेल्या समुद्रकिनार्‍यांच्या छवींसारखेच लेखन पण अप्रतिम.. लगे रहो मेरी बहना...
    अगदी फिरवून आणलेस की तुझ्या अलिबाग ला... आत्ताच जावेसे वाटतेय गं... मस्तंच...
    तुझीच
    संध्या

    उत्तर द्याहटवा
  3. प्रशांत छान वाटले तुमची टिप्पणी वाचून.....
    ह्या पोस्टला छायाचित्रांची जोड मिळाली आहे आणि त्यामुळे नक्कीच जास्त उठावदार झाले आहे , नेहमीच ह्यापुढे जेव्हां भारतात असेन सोबत कॅमेर्याला नक्कीच ठेवणार आहे.....म्हणजे अनेक छायाचित्र नेहमीच सोबत करतील,आठवणीं सारखीच...

    उत्तर द्याहटवा
  4. धन्यवाद संध्या ,तुझ्या छान छान टिप्पणीमुळे मला नेहमीच खूप प्रोत्साहन मिळते, आणि हो ह्या वेळी जेव्हां आपण दोघी एकाच वेळी भारतात असू, तुम्हा दोघांना अलिबागला घेऊन जाईन.....आणि मग बघच किती छान आहे ते !!...

    उत्तर द्याहटवा
  5. वा श्रिया!
    सुंदर आठवणी आहेत तुझ्या.
    आमच्या शाळेच्या पाठीमागे समुद्र किनारा. >>>> अजून काय पाहिजे ना ? :). सुदैवी आहेस.
    लिहीत रहा.

    उत्तर द्याहटवा
  6. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद राफा....हो आठवणींचे म्हणशील तर खूप काही लिहिण्यासारखे राहणारच..कारण कोण जाणे मनाने कधी ठरवले कदाचित बालपणीच असेल कि छान छान आठवणी संग्रही राहतील.शाळेचे दिवस,आणि सागर किनारा ह्यांचा घनिष्ठ संबंध तेव्हांच निर्माण झाला होता.लाटांचा आवाज वर्गात असताना कानावर पडायचा, स्पष्ट अगदी स्पष्ट जणू त्या लाटा कानावर शिडकावा करताहेत असच वाटायचे....कधीपण जा सागरकिनारा नेहमीच सुस्वागतम ची पाटी लावून,अगदी स्वच्छ,आणि रिकामा दोन्ही गोष्टी आजकाल कठीण आहेत सापडायला समुद्रावर पण हो....तेव्हां तो तसा होता.....दुपारची चमचमणारी वाळू,पायाला कितीही चटके देत असली तरी आम्हीं शाळेतून हळूच एक फेरी मारत असू ते आठवले....कोकणात घर असण्याचे फायदे....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ