" ती "


तिच्या डोळ्यातला पाऊस होऊन
बरसत राहावे,कधी हर्षाचा कधी खेदाचा..

कधी तिच्या ओठातले बोल होऊन 
सांडत राहावे तिचे काव्य तर 
कधी भावना बनून ...

कधी तिचा हळुवार स्पर्श 
व्हावे, अलगद मोरपिसासारखे
फुलारून यावे,बहरून यावे...

तिच्या केसांची बट बनून
लहरावे,तिने सावरता 
पटकन नाठाळ होऊन 
अजून विस्कटून जावे....

कधी तिची वस्त्र बनून 
तिलाच अलगद बिलगावे....
तिच्या नकळत तिच्या सौंदर्याचा 
भाग बनून उरावे.....

तिच्या आरक्त पावलांची 
कधी व्हावी रक्तिमा 
तिच्या भाळीची चंद्रकोर 
खुलताना कधी पाहावे ...

तिचा गजरा बनून कधी 
राहावे तिच्या केसात 
आभूषण बनून लखाखून
टाकावी तिची कांती...

मग तिच्या रागात, तिच्या 
क्लेशात, उद्विग्नतेत उरावे
तिचा आत्मविश्वास बनावे कधी 
 पाहावे तिला परत सावरताना ...

अहं बाजूला ठेवून तिला 
ओळखावे, कधी समजावे.
तिच्यासाठी तिच्या शब्दांसाठी
आनंदासाठी जगत राहावे...
                                               -- श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ