बयो...एक अप्रतीम चित्रपट!

             
                      तळकोकणातल्या एका गावातली ही प्रेमकथा,दिग्दर्शकाने इतकी जिवंत केली आहे कि अक्षरशः पूर्ण चित्रपटात आपण ती कथा जगतो.कुठेच कंटाळवाणा होत नाही हा चित्रपट,कारण अतिशय सुंदर मांडणी केली आहे.प्रसंग पण छान गुंफले आहेत.शिवाय मध्ये मध्ये शास्त्रीय संगीताची जोड आणि कोकणचा निसर्ग! दिग्दर्शक,श्री गजेंद्र अहिरे ह्यांनी प्रेक्षकांना बरच काही दिले आहे ह्या 'master piece ' मधून;असे वाटले.

         सर्व कलाकारांनी अप्रतीम भूमिका केल्या आहेत..सौ.देशमुख' ह्या लेखिकेच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी आहेत.नवऱ्याच्या दूतावासातल्या नोकरीमुळे लंडनला आलेली रावी देशमुख,खूप एकटे वाटत असते तिला घरी.परत मायदेशी जावेसे वाटत असते,भारतात असताना नोकरी करणारी रावी इकडे घरी पूर्ण वेळ रिकामी असल्याने कंटाळते,'लिहिणे' हा तिचा छंद,२ पुस्तके तिची प्रकाशित झालेली असतात.श्री देशमुखांच्या भूमिकेत 'यतीन कार्येकर' आहेत,आपल्या परीने रावीची समजूत काढून तिला लंडन मधल्या जीवनाशी मैत्री करण्याचा सल्ला देणारा एक पति...त्याला त्याच्या बायकोचे कौतुक पण असतेच हे त्याच्या रावीच्या लिहिलेल्या बयोवारिल पुस्तकाच्या प्रकाशनाची पूर्ण जबाबदारी घेण्यावरून लक्षात येते.

            
             आपल्या लिखाणात स्वतःला बुडवून घेऊन मनाला मनातल्या विचारांना अडवणारी रावी,एक दिवस, तिला घरातल्या माळ्यावर एका पेटीत काही पत्र मिळतात.कोणा बयोने (मृण्मयी लागू) तिच्या विश्वनाथला (श्रेयस तळपदे) लिहिलेली पत्र.हा १९५० सालचा कालखंड दाखवला आहे, आणि ही  पत्र साधारण ६ वर्षातली,न चुकता नेमाने लिहिलेली.पण विश्वनाथला कधीही ह्या बयोची ह्या पत्रातली हाक ऐकूच आलेली नसावी कारण ह्यातले एकही पत्र फोडलेले नसते.. ह्या अनेक पत्रांना वाचताना कोकणातला स्वातंत्र्य चळवळीतला  काळ उलगडत जातो,१९४७ पूर्वीची काही वर्ष,कोकणातल्या वाड्या,शेते,काही माणसे ह्यांची आपल्याशी पण ओळख होते.

               जात धर्म न मानता बयोला आणि विश्वनाथला लहानाचे मोठे करणाऱ्या अप्पांच्या भूमिकेत श्री विक्रम गोखले आहेत.बयो त्यांच्या एका मुसलमान मित्राची मुलगी जे स्वातंत्र्य सेवक असल्याने बयोला ह्या ब्राह्मण मित्रावर सोपवतात.एका पित्याप्रमाणे बयोचा सांभाळ करणारे अप्पा, उत्तम संगीत शिक्षक असतात, बयो आणि विश्वनाथ दोघांना संगीताचे शिक्षण देताना हळू हळू त्या दोघांचे मन,एकमेकांकडे कसे झुकते आहे ह्याची त्यांना कल्पना असते.
विश्वनाथ एक क्रांतिकारक असतो.
      
                रावीला पत्रातली बयोच्या मनातली तळमळ लक्षात येते,तिच्या मनातले प्रेम,विश्वास कायम असतो, विश्वनाथ परत येणार तिच्यासाठी ह्याची तिला किती खात्री असते.अप्पा पण स्वातंत्र्य युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देतात.बयोला विश्वनाथ परदेशात जातो आहे इतके माहित असते तो परत येईल असे वचन त्याने तिला दिलेल असते.अप्पा जेव्हां तिचे लग्न ठरवून देत असतात तेव्हां ती आपल्या मतावर ठाम रहाते, अप्पा त्याचा स्वीकार करतात.विश्वनाथ च्या शब्दावर विश्वास ठेवून ती त्याची वाट पाहण्याचा निर्णय घेते.
बयोचे धावत पायऱ्या उतरत पोस्टमन काकांना विश्वनाथ कडून कोणते पत्र आले का हे विचारायला येणे ह्यातली तिची धावपळ, ओढ,आणि जेव्हां पोस्टमन काका 'नाही' म्हणतात तेव्हां तिच्या चेहेर्यावर उमटणारे भाव,खूप प्रभावी अभिनय केला आहे ह्यात वादच नाही!

                     
                बाबुल हा त्यांच्या वाडीत काम करणारा गडीघरातल्या सारखा असतो.अप्पांनन्तर बयोचा मानसिक आधार असा,तिच्या चारित्र्याचे जणू कवच बनलेला असा,'बाबुल' माडावरुन पडून कमरेखाली अपंग होतो.बयो त्याची मनोभावे सेवा करते.तो गेल्यावर ती खूपच हतबल होते.गरीबी अणि लाचारी ह्याचा सामना करण्याची ताकद तिला,तिचे विश्वनाथ वरले प्रेम देत रहाते.तिचा गैरफायदा पण घेतला जातो.....तरीही तिचा विश्वास कायम असतो.

         
              हे बयोचे मनोगत रावीसोबत आपण ही वाचत असतो.बयोची वेदना ह्या कथेतून आपल्या पर्यन्त पोहोचवण्याचे  काम ह्या चित्रपटाने पूर्णपणे अणि यशस्वीपणे पार पाडले आहे.रावी हे बयोवरील पुस्तक पूर्ण करून प्रकाशित करते.तिला मनात खात्री असते कि कदाचित विश्वनाथ हे पुस्तक वाचेल,त्याच्या पर्यंत बयोचे जीवन पोहोचेल.रावी कोकणात जाऊन बयोला भेटते,तिला भेटून तिची उरलेली कथा ऐकते,तिला सांगते कि हि सगळी पत्र विश्वनाथला मिळालीच नाहीयेत.तिने पत्र लिहिणे थांबवावे कारण विश्वनाथ ती वाचत नाहीये,हे सत्य ती बयोला सांगते.
 

            एका बोटीवर विश्वनाथ काम करत असतो.त्याला तिथे एक प्रवासी हे पुस्तक वाचताना दिसतो.
सहज म्हणून चाळायला घेतलेले पुस्तक त्याला त्याच्या बयोकडे घेऊन जाते,कोकणात.रावीची आणि विश्वनाथ ची भेट हा प्रसंग;विश्वनाथ का बयोपासून लांब जातो हे तो रावीला सांगतो आणि तितकाच अतिशय महत्वाचा म्हणजे तो क्षण जेव्हां बयो विश्वनाथला भेटते,हे दोन्ही प्रसंग ह्यातले तिन्ही कलाकारांनी केलेले काम खूप छान झाले आहे.
      

                 रावीच्या प्रयत्नांमुळे बयोला न्याय मिळतो.चित्रपटाचा शेवट खूपच वेगळा आहे.पूर्ण वेळ प्रत्येक भूमिका आणि त्यातली पात्र अभिनय करताहेत हे जाणवतच नाही,ह्यातच तर खरे कौशल्य दिसते! दिग्दर्शकाचे आणि कलाकारांचे.
ह्या चित्रपटात बऱ्याच इतर मंडळींचे पण सहकार्य आहे,सर्वांनी जे हवे तेच, लोकांपर्यंत पोहोचवले आहे.कुठेही खोटेपणा, अतिशयोक्ती नाही. गाणी सुद्धा योग्य ठिकाणी, आणि सुरेल आहेत cinematography पण उत्तम साधली आहे.
     
           हा चित्रपट जरूर पाहावा असा आहे.
आपल्या मराठी चित्रपट सृष्टीत अजून एका उत्तम कथानकाची भर पडली आहे असे म्हणावे लागेल!
हा चित्रपट ज्यांनी पहिला आहे त्यांनी आपली मते इथे जरूर नोंदवावीत...स्वागत आहे!

-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

          ह्या चित्रपटातले एक गीत ....




        

टिप्पण्या

  1. पाहायला हवा ...
    आता DVD मिळवून नक्की पाहीन
    छान लिहिले आहे परीक्षण

    उत्तर द्याहटवा
  2. :) :) आपल्या टिप्पणी बद्दल धन्यवाद,आणि हो,जरूर पहा हा चित्रपट !.....

    उत्तर द्याहटवा
  3. चित्रपटाबद्दल ऐकल होत पण पाहिला नाही....आता मात्र पाहयलाच हवा...परीक्षण छान लिहल आहे.

    उत्तर द्याहटवा
  4. योगेश आपल्या टिप्पणी बद्दल धन्यवाद !
    आपले ह्या ब्लॉगवर स्वागत आहे.....

    उत्तर द्याहटवा
  5. तुमचे परीक्षण वाचत असताना मी हे गाणे सतत चालू ठेवले होते ...चित्रपट पाहिलेला नाही...तरीही आपले परीक्षण वाचून हा चित्रपट नक्की पहिलाच पाहिजे असे वाटले .
    नक्की पाहू आम्ही :) हा चित्रपट . या सुंदर परिक्षणाबद्दल धन्यवाद !!:)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ