'तुलसी' एक अनोखी अनुभूती
अभिनय,गायन,दिग्दर्शन,संवाद सर्व एकाच व्यक्तीची कलात्मकता,कौशल्य दाखवते असे मी ३ प्रयोग पाहिले.तुलसी कालच पाहिला.शेखर सेन ह्या बहुगुणी कलाकाराने हयात खरोखर कमाल केली! कर्णमधुर संगीत,तुलसीदासांची चौपाई,आणि त्यांच्या आयुष्याचे लहानसे दर्शन.
स्टेजवर शेखर सेन जेव्हा तुलसीदास म्हणून आपल्यासमोर येतात,आणि बोलू लागतात,तेंव्हा आपण त्यांच्यासोबत त्या काळात विहरु लागतो.एकपात्री प्रयोग ही संकल्पना ऐकायला सोपी आणि प्रत्यक्षात वठवायला कठीण !भूमिका अतिशय सुंदर सादर करताना शेखरजी ज्या सहजतेने रंगभूमीवर वावरतात,प्रत्येक पाऊल टाकताना संवाद थेट प्रेक्षकांशी,संगीतही उत्तम दर्जाचे आणि वेगवेगळे राग प्रेक्षकांच्या कानांना सुखावतात!
भारतात आल्यावर आई बाबांनी मला ह्या नाट्यप्रयोगाबद्दल सांगितले तेंव्हाच मी ठरवले की सेन ह्यांचे सर्व एकपात्री प्रयोग पहायचे.विवेकानंद आणि सूरदास ह्या प्रयोगांना पण गेले होते.प्रत्येक व्यक्तिचित्र रंगवताना,सेन ह्यांनी कमाल केली आहे! ह्या महान व्यक्ती त्यांचे कार्य,जीवनकाल,त्यातील काही महत्वाचे प्रसंग घेऊन,ते जिवंत केले आहेत! आवाजातील योग्य चढ उतार,शब्दांची फेक,मध्येच विनोद निर्मिती करून प्रेक्षकांची टाळी घेतली आहे,तर हृदयद्रावक प्रसंगांतून पाहणाऱ्यांच्या अश्रूंनी ही दाद दिली आहे!
हे असे प्रयोग कमी आहेत,आणि संगीत,गायन तर लाजवाब! आपल्या मनात प्रत्येक व्यक्तिचित्र इतक्या कमी वेळात उभे करून,वेगवेगळ्या कालावधीत, घेऊन जाऊन विचारांना,भावनांना जागे करण्याचे यशस्वी कार्य हे प्रयोग निश्चितच करतात!
सेन ह्यांच्या आवाजात एक माधुर्य आहे, खंबीरपणा ही डोकावतो.
नेपथ्य अप्रतीम! प्रकाशाचे खेळ स्टेजचा क्षणात समुद्र बनवतात,तर दुसऱ्याक्षणी; लोकांनी भरलेल्या प्रेक्षागृहाचा पाहणाऱ्यांना फील येतो.तर संगीत स्वर आणि सेन ह्यांचा आवाज आपल्याला थिएटर मध्ये खिळवून ठेवतो!
मी पाहिलेले तिन्ही प्रयोग मला अतिशय आवडले!
माझ्या सोबत ह्या स्मृती सदैव राहतील.
हिंदीत सादरीकरण आहे.नक्कीच अनुभवावे असे हे आहेत,त्यामुळे जरूर पहा!
-मोना

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा