पाऊले
पाऊलांना ऐकायचे नसायचे तेव्हां कोणाचे ...
स्वतःचेच खरे करायचे मनावर घेतलेले असायचे.......
आई म्हणायची "झाडावर चढू नको पडशील"....
"पाऊले ऐकत नाहीत ग तुझे आई काय करू सांगशील?"
पाऊलांना वाटायचे सायकल शिकायची
शंभर वेळा पडले तरी हार नाही मानायची....
बाबा म्हणायचे "सांभाळून बाळ".....
पण पाऊलांना कुठे भीती असायची!
शाळेतले खेळ, स्नेहसंमेलनाची वेळ...
स्टेजलाच आमची भीती वाटायची.....
अभ्यास केला,पण खेळ सांभाळून....
पाऊलांना तेव्हां अभ्यासाची जाण असायची.....
हल्ली सारखे फुटले नव्हते क्लासेस चे पेव...
स्वतःलाच स्वतःचा देता यायचा वेळ....
पाउलांची वाट तितकी अवघड झाली नव्हती
स्पर्धेपाठी सगळी इतकी वेडी झाली नव्हती....
मैदानी खेळ दूरदर्शनवर भारी होते....
आई बाबा संध्याकाळी मुलांसाठी होते....
पाऊलांना अनेक गोष्टी आजीने दिल्या
बालपण त्यांचे खूप आल्हाददायक होते....
आज पाऊले मोठी झाली..तरी मन बालपणात रमते...
जुने सोबती,शाळा सुटली तरी आठवांमध्ये गुंगते....
पाऊलांना बरेच काही ते मोकळे बाल्य देते ..
अन धमाल मस्ती आजही पुरेल इतकी उरते....
-श्रिया (मोनिका रेगे )
-श्रिया (मोनिका रेगे )

छान लिहिलयं गं !!
उत्तर द्याहटवापाउलांची कल्पना खरंच खूप छान...
धन्यवाद दीपक ...हि कल्पना खूप दिवस मनात होती,शेवटी कविता तयारच केली पाऊलांनी पाऊलांसाठी...
हटवा..पावलच होतात मोठी आणि धुंडाळतात ती नव्या वाटा ... आपल्याला वाटत आपण मोठे झालो, आपण बदललो ... :-)
उत्तर द्याहटवाखरे आहे सविता ताई तुझे.पाऊले मोठी होताना मनाला मात्र सोबत नेहमीच घेतील असे नाही...मन रेंगाळते बालपणात.लहानपणी आठवते,वाटायचे कधी एकदा आपण मोठे होणार आणि मग ह्या मोठ्या माणसांसारखे आपले जग असेल,पण खरी गम्मत बालपणात सुटून जाते,मग उरतात मोठी पाऊले आणि त्यांचे धावपळीचे जग..... नव्या वाटा धुंडाळताना पण साथ देतात लहान पाऊलांचे अनेक अनुभव....
हटवाअगं किती सहज शब्दात मांडलस गं! आवडलं!
उत्तर द्याहटवापावलांची खरेच दमछाक झालीये आताशा...
कळत असूनही ती वळतच नाहीत ही खंत प्रत्येकाच्या मनात...
भानस अगदी बरोबर.तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
उत्तर द्याहटवादमछाक झाली आहे,पाऊले इकडे तिकडे धावून दमली आहेत सर्वांचीच.मनाला पण विश्रांती नाही आणि पाऊलांना पण नाही....दिवस पळतात,आणि प्रगतीच्या चाकाला बांधलेली पाऊले धावत राहतात.
कळूनही उमजूनही विश्रांती नाही.... थोडी गती कमी केली,आजूबाजूच्या जगाशी स्पर्धा करणे कमी केले तर पाऊलांना जाणवेल कि ती जिवंत आहेत,रोबोट नाहीत.....एका मनाला जोडलेली आहेत ती..
माणसाला बाप्पाने लहानपण दिले हे खरच खूप मोठे काम केले त्याने! नाहीका?