द्वंद्व


          

            जिवंतपणी कधी कधी माणूस स्वप्न पहातो.असे सत्य,जे स्वप्नासारखे भासणार पुढे जाऊन,ह्याची त्याला कल्पना पण नसते.कोणाचे तरी अस्तित्व एका क्षणापासून खूप महत्वाचे होते.कोणाची तरी चाहूल पण हृदयाची धडधड वाढवून जाते. आठवणीने डोळे पाणावतात आणि स्वर ओलावतात....अचानक हवेत सुगंध पसरतो आणि तो क्षण हलकाफुलका वाटू लागतो.पिसासारखा आणि देखणा.हे असे एक न दोन अनेक क्षण, जेव्हां जवळ असतात आणि ते क्षण देणारे कोणी निघून जाणार असते कधी न भेटण्यासाठी कधी न बोलण्यासाठी,काय वाटून घ्यावे हे ठरवण्या आधीच ते वाटू लागलेले असते.विचार झोपू देत नाहीत,डोके सुन्न होते आणि मोकळा श्वास घेता येईनासा होतो.डोळ्यात प्रश्न आणि मनात शब्द गर्दी करतात.सगळे तेच गोलगोल फिरत राहते.एक दिवस एक चक्रीवादळ येते.उलथून टाकते सगळे,केलेले विचार,एकत्र ठरवलेले कार्यक्रम.एकाच वाऱ्याच्या तुफान जोराने असा तडाखा बसतो कि परत चुकून कधी असा विचार येणार नाही मनात असे मनच समजावते मनाला.अश्रू पिऊन बसलेले डोळे सुके आणि निष्क्रिय बनतात.काही ओलावलेले क्षण कापत राहतात हृदयाला मध्येमध्ये, लहान लहान छेद देत राहतात.का आठवतात हे आनंदाचे तुषार?काळ हा औषध आहे म्हणे,दुःख जगायला शिकवतो काळ.जेव्हां दुःख अनुभवतो,सामोरे जातो तेव्हांच खरेतर त्याचा घाव बसलेला असतो,ती जखम शरीरावरची नसते तर मनावरची आणि तिला बरे व्हायला काळ मदत करतो...खरच करतो का?कि मन स्वतःला फसवत राहते?मग का स्वप्नात परत डोळे सकाळी ओलावलेले टिपले जातात.सकाळ झालेली नकोशी वाटते कारण ते स्वप्न संपते.मग पुन्हा एकदा तेच स्वप्न आठवण्याचा निष्फळ यत्न,पण ते उडून गेलेलं असते मनातून साफ,कापुरासारखे. कोणा शिवाय जगता येते का?.....येते. जगत तर असतोच,जोवर श्वास आहे तोवर आयुष्य आहे,पण पूर्णत्व?...ते मात्र कुठे अडकून पडू नये.

           मनाला कोसळायचे होते जेव्हां ती येऊन म्हणाली,"उद्यापासून मी नसेन.भेटेन तुला तुझ्या स्वप्नात,तुझ्या मनात असेनच.तू खूप उशीर केलास;कि मी जाते आहे,कि सगळे संपवायचे बाप्पाच्या मनात होते,तुझ्या सोबत पाहिलेले स्वप्नं जिवंतपणी अनुभवायची इच्छा होती पण सर्वांचा विचार करत आहोत दोघे.मनात दोघांच्या जे आहे त्याला धक्का न लावता जाते आहे मी,लग्नाला येशील न?तुला कसे लग्नाला बोलवू कळत नाही,आणि कसे समजावू ते पण,,मी तसा प्रयत्न करणार नाही कारण तू समजून घेशील ह्याची खात्री आहे मला" असे बोलली चक्क ती....त्याचा विश्वास बसेना.त्याला इतके गृहीत धरत आली होती ती.काही गोष्टी शक्य नव्हत्या पण अशक्य कोटीतल्या पण नव्हत्या.त्याने एक दीर्घ निश्वास सोडला आणि पुढे नुसता तिच्याकडे पाहत राहिला होता.तिने विचारले"तुला तू दिलेल्या गोष्टी परत देऊ का?"...त्याला उत्तर सुचत नव्हते,कि त्याने दिले नाही?शब्द नाराज होते.त्याच्या चेहेऱ्यावर विचित्र भाव होते.बरच काही समजुतीने घेत आला होता तो.तिच्याकडे पाहून रागवायचे पण तो विसरून गेला होता.'कोणाची काहीच चूक नाही' इतकच काहीतरी बोलू शकला आणि त्याची पावले तिकडे थांबायला तयार नव्हती.

        ती त्यांची शेवटची  भेट...गडबडीतली,इतकी लहान आधी कधीच नव्हती,वेळ अपुरा पडायचा त्या दोघांना नेहमीच.आणि आज एकदम सगळे थांबले एका क्षणात.हा क्षण कापरा,कडक,टोचरा पण मनात मात्र सर्वात जास्त घर करून राहिलेला ठरला.तो दिवस,ती संध्याकाळ त्याची भयाण गेली.नंतरचे काही आठवडे त्याचे,, विक्षिप्त वागत होता का तो? सगळ्यावर विचार करण्याइतका वेळ नव्हता, त्यानेही स्वतःला दिला नाही.पण शरीर जरी काम करत राहिले तरी मन उसवलेले;कुठेकुठे शिवणार आणि ठिगळ लावणार?मनाला त्रास झाला कि मन शरीराइतके लवकर भरून येत नाही हेच खरे ....

          आज त्या मुसळधार पावसात परत एकदा अचानक,त्या विजेच्या प्रकाशात त्या जिन्याखालच्या काळोख्या आश्रयाला दोघे आले होते.किती सारी वर्ष मध्ये गेली त्याचा पत्ता नाही कारण त्याचे मोजमाप कोण ठेवणार.जातानाचा 'तो' दिवस तिकडेच थांबला होता.समोरच्या घरातला खिडकीतला मंद प्रकाश गजाच्या खिडकीतून सिलिंगवरच्या पंख्याची हालचाल दिसत होती.त्याच्या चपलेला पावसात तुटायचे होते आणि तिच्या छत्रीला.त्या जिन्याखाली मोकळ्या जागेत आपले बस्तान बांधून बसलेला एक चांभार, आणि हा त्यांच्या भेटीचा १५ वर्षांनंतर आलेला योग...तो जेव्हां त्या आडोशाला आला तेव्हां त्याला कल्पना पण नव्हती कि ती तिथे असेल..तिने त्याला अजूनही ओळखले नाहीये.त्याला ह्याची कल्पना होती.तो तसाच शांत राहिला..पावसात भिजत,तिला तो भिजतो आहे ते जाणवले,म्हणाली,"अहो तुम्हीं भिजत आहात अजून आत सरकून घ्या मी इकडे बाजूला उभी राहते"..तिचा तो नेहमीचा आवाज,तो मात्र तसाच नाजूक राहिला होता.त्याला आठवले ..जिन्याच्या आडोशाला एक लहानसा दिवा होता नेमका त्याचा अंधुक प्रकाश तिच्या चेहऱ्यावर  मधूनच पडत होता पण त्याच्यावर मात्र इतका पडत नव्हता, त्या प्रकाशात त्याने तिला साधारण नीटसे पाहून घेतले...बदलली होती पण त्याच्याइतकी नाही.चष्मा लागला होता.केसात थोडी चांदी होती...पण 'तिचे डोळे' तसेच जबरी....त्याचे आवडते....तिने काहीतरी बोलायचे म्हणून पटकन विचारले,"तुमच्याकडे छत्री कशी नाही?आजतरी पाऊस सकाळ पासून आहे"...तिच्या प्रश्नाला पावसाने उत्तर दिले विजेचा कडकडाट आणि ढगांनी आज सगळे श्रेय स्वतःकडे घेतले होते.ती घड्याळ बघत होती.त्याने बोलूया का,ओळख दाखवूया का ,असा विचार केला पण मग ती आतासारखी वागेल का कि पटकन बोलायची नाही आणि शांत होईल..कि निघून जाईल?छे नको..चांभाराने त्याची चप्पल आणि तिची छत्री दिली पैसे दोघांनी दिल्यावर अचानक पावसाने ठरवले अजून बरसायचे आणि तो पडू लागला मुसळधार...चांभाराने आपले बस्तान गुंडाळले आणि चालू पडला इतक्या पावसात कोण येणार म्हणाला....

         ती आपल्याला पूर्ण विसरून गेली असेल का?....असा प्रश्न पटकन मनात येऊन गेला त्याच्या.तिच्या त्याला लक्षात राहिलेल्या काही गोष्टी,तिची अंगठी,ती अजूनही  मधल्या बोटात दिसत होती...तिची गळ्यातली चेन,अरे ती अजूनही घालते ती? त्याला आश्चर्य वाटले...त्याने ती चेन तिच्याकडे तिची आठवण म्हणून मागितली होती,स्टेशनवर, त्यावरून दोघे किती वेळ भांडले होते....ती द्यायला तयार नव्हती....आणि तो ऐकायला..शेवटी तिने दिली पण लगोलग परत काढून पण घेतली त्याच्याकडून बोलण्यात....नंतर त्याचा बदललेला पत्ता मागत होती ती चेन पाठवायला त्याला,ते त्याला आठवले...तिची अंगठी, तिची बोटे,त्याला आवडणारे म्हणजे तिचे बोलणे,रागावणे,तिचा हळवेपणा,तिचा मोकळेपणा,तिचा आवाज,तिचे गाणे,तिचे छान छान नवे कपडे घालून त्याला येऊन दाखवून नकळत अपेक्षा करणे कि ती कशी दिसते हे त्याने सांगावे.....आणि मग, 'तू किती छान दिसते' असा म्हंटले कि तिचे खुश होणे...

        आठवणींना पावसाइतकच कोसळायला हीच वेळ होती का!.तिने त्याच्याकडे फारसे पहिले नाही हे त्याला जाणवत होते कारण तो तिच्याकडे मधून मधून पाहत होता,पाहावेसे वाटत होते तिला खूप.का अडवावे स्वतःला,असेही वाटत होते.ती थकल्यासारखी वाटत होती...म्हणाली"तुम्हीं इकडेच राहता का जवळ...का कोण जाणे तुम्हीं ओळखीचे वाटत आहात! ".तो म्हणाला"नाही हो मी पाहुणा आहे ह्या शहरात..मी बाहेर असतो.तुम्हीं इकडेच असता का?"ती म्हणाली"हो इकडेच असते..जवळच राहते."..तो आपला चेहेरा शक्यतो काळोखात राहील असा करून उभा राहत होता आणि तिनेही जास्त प्रयत्न केला नाही त्याची चौकशी करण्याचा..ते दिवे ती घरे,तो रस्ता त्यांचा ओळखीचा,त्यांच्या सगळ्या भेटी एक एक करून त्याला आठवल्या..तो रमला थोडा वेळ त्यात,सवयीचे होते त्याला पण आज ती पणहोती,सोबत..


      तिच्या त्या परफ्यूमचा सुगंध ओळखीचा.."हा परफ्यूम मी सोडून कोणासाठी कधी लावणार नाहीस न?" ह्या त्याच्या प्रश्नावर तिने "नाही"असे उत्तर दिलेले आठवले तेव्हां त्याला.त्याने दोघांच्या आठवणी त्यावर लिहिलेले बरेच काही .तिला लिहिता यायचे नाही पण त्याने लिहिलेले वाचले तिने,आवडले होते दोघांना..तिला बाहेर खाणे आवडायचे त्याला किती ठिकाणी घेऊन गेली ती..ते शहर त्याला आता अनोळखी नव्हते पण ते जेव्हां पहिल्यांदा भेटले तेव्हां तसे ते शहर त्याला नवीन होते..तिला ओळख न देता तसाच तिथे थांबून तिच्या नुसत्या अस्तित्वासोबत आठवणींना अनुभवत होता तो. काही चूक तर करत नव्हता न?जणू काही काळ जरासा थांबला होता दोघांसाठी.

       पावसाचा वेग मंदावत होता,त्याला आता वाटू लागले ह्या निसटत्या क्षणांना धरून ठेवावे...एकमेकांच्या जवळ येताना काहीच न ठरवता जवळ आले होते दोघे.कल्पना होती का कि कितीही एकमेकांसाठी असले तरी योग नाही.'योग' ह्या शब्दाचा त्याला प्रचंड राग आला.तेव्हां माहित असताना देखील काहीच थांबवले नाही,विचार देखील अडवले नाहीत.दोघांनी सगळे सगळे आले तसे घेतले...कधी न कधी तो दिवस येणार होताच ..सगळे काही थांबणार.तो दिवस आला,त्या दिवशी दोघे किती समजूतदार होते?सगळा आव आणत होते कि मनापासून समजून घेऊन निर्णय झाला,कोणास ठावूक?पण आजही तो तिच्याबाबतीत तितकाच हळवा होतो,पावसाळतो...आज त्याला त्याचा अनुभव आला....

         ती निघाली.त्याला 'बाय' म्हणताना तिने हात हलवला आणि तिच्या गाडीवर बसली जाऊन,गाडी नवी असली तरी तिला आवडणाऱ्या गाड्यांमधलीच एक होती.....तिच्या वेगाला कधी त्याने अडवले नव्हते ...गाडीचा तिचा वेग त्याला आवडायचा...तिच्या कडून आजही तो वेग दिसला त्याला.तिचे निघून जाणे जाणे त्याला न ओळखता,,कुठेतरी मनात काहीतरी सलते आहे का त्याला? बोललो असतो तर?२ शब्द छे !!ओळख दाखवली असती तर! आता विचार करून काय उपयोग?त्याने पण घरचा रस्ता धरला मनात 'ती' होती. तिचे आठवणीतले खोडकर स्मितहास्य .....परत आता ती साथ करणार होती काही दिवस पावसाचे ......
             
       ती थोडी पुढे गेली कोपऱ्यावर थांबली ,गाडीवरून उतरली ...थोडे अजून काळोखात गल्लीत शिरली आणि ढसाढसा रडू लागली,,,,,मनमोकळे रडली डोळ्यांना थांबवले नाही तिने, हा पाऊस आज असाच शिंपत राहिला होता,पुन्हा एकदा तिला भिजवून जात होता....ती नाराज होती स्वतःवर एकही शब्द ती ओळखीचा बोलली नाही,त्याच्या डोळ्यांकडे बघण्याचे सामर्थ्य पण गळून पडले होते का तिचे? १५ वर्षांपूर्वीचा तिचा निर्णय...बरोबर होता का?आज का तिला हा प्रश्न पडतो आहे?तो तिला विसरला असेल?ती 'ती' होती,'त्याची फक्त त्याची 'असे म्हणणाऱ्या त्याला हे तरी कळले असेल का?असे प्रश्न तिच्या मनात थैमान घालू लागले...नाही आज तिने स्वतःला का अडवले? त्याला तिच्या गळयातली चेन हवी होती,अरेरे!! परत ती राहून गेली तिच्याकडेच....त्याच्याकडे जितक्यांदा पहिले तिला कमीच वाटले होते आज.किती वाळला होता.किती बदलला तिला आठवणारा तो.....आज किती शांत झाला होता.रोज भेटीत एकमेकांशी बोलताना त्याचे शांत होणे तिला कधीच आवडायचे नाही आणि आज तिला ते सहन करावे लागले होते....तिने गाडी वळवली परत सुरु केली आणि त्या जिन्याकडे आली परत. तो असेल उभा अजूनही तिथे?थांबला असेल? काहीतरी कारणाने आला असेल का परत असे विचार करत ती जिन्याकडे आलीहि .तो उभा होता तिथे उतरून उभे रहावेसे वाटले तिला...त्याच्या मनात काय चालले असावे? ह्याचा अंदाज घेत ती थांबली, तो होता तिथे.परत जावेसे वाटले तिला हे तिचे चुकले का?त्या ठिकाणी उभे राहून त्याच्या मनात डोकवावेसे वाटले तिला हे तिचे चुकले का? 

              तो जिना, तो पाऊस ती संध्याकाळ,ती अचानक भेट, दोघांना अनोळखी करून टाकणारी....एकमेकांचे असताना परत एकदा दोन वेगवेगळ्या दिशांना घेऊन जाणारी अशी ओलीचिंब संध्याकाळ....
--लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

  1. वाह, काय लिहल आहेस...हृदयस्पर्शी आणि अगदी ओघवत...ऑस्सम....

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद दवबिंदू ....
    प्रयत्न करते पण तरीही वाटते शब्द कमी पडतात ...मनात भरभरून काही असते पण तसे उतरत नाही असे वाटते...पण मी प्रयत्न सोडणार नाही......never give up.....

    उत्तर द्याहटवा
  3. खूप सुंदर... विरह कोणत्या कारणाने येईल ते सांगता येत नाही, पण त्यानंतरही
    >> जगत तर असतोच,जोवर श्वास आहे तोवर आयुष्य आहे,पण पूर्णत्व?...ते मात्र कुठे अडकून पडू नये.
    हे आवडलं.... काळ सगळ्यावरच औषध आहे म्हणतात. एकदा एकमेकांशिवाय जगायला शिकल्यानंतर असं परत कधी एकमेकांसमोर येण्याचा प्रसंग खरंच येऊ नये....

    उत्तर द्याहटवा
  4. :-) अस होत कधी कधी .. म्हणून माग वळून पाहू नये!! जे सुटल ते सोडून देण्यात शहाणपण असत!

    उत्तर द्याहटवा
  5. खरे आहे इंद्रधनू,असे प्रसंग येऊ नयेत....पण आले तर प्रत्येकाच्या प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतील.मनाचा तोल न ढळू देणे सर्वांना जमेल असे नाही.कुठेतरी काहीतरी सुटून अर्धवट राहून गेलेले असते...हे जर मनात राहिले असेल,काही प्रश्नांची उत्तरे सापडलेली नसतील तर कदाचित असा योग आला तर कठीण वाटत असावे.एकमेकांना ओळखूनही ओळख न दाखवता तरीही मनात एकमेकांचा विचार करत काही क्षण परत एकदा सोबत करता आली ह्या विचारांच्या'द्वंद्वाला'आवरता शेवटपर्यंत दोघांनाही आलेले नाही आणि'अनोळखीपण'मात्र मदतीला धावून आले असे म्हणावे लागेल कदाचित.....
    प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  6. सविता ताई तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद....:)
    काहींच्या जीवनात काही व्यक्ती खूप काही देऊन जातात.सगळेच काही मनासारखे नसले तरी बरच काही साठलेले,एकत्र अनुभवलेले आणि आनंददुखाच्या प्रसंगांनी वेढलेले असे,शिल्लक राहते.मग ती व्यक्ती गेली कि जाणवत राहत असावे...अचानक भेट फार कमी लोकांच्या आयुष्यात असते..'सर्व काही विसरून पुढे जाणे'मार्ग उत्तम.पुढे जाणे शक्य असते पण काहींना मनात काही राहिल्यामुळे विसरून जाणे पूर्णपणे शक्य होत नसावे...प्रत्येकाचे आयुष्य आणि त्यातील प्रसंगावरच्या प्रतिक्रिया..... 'हा खेळ सावल्यांचा!':)

    उत्तर द्याहटवा
  7. मस्तच ग... ओळखी ओळखीचे सारे...

    मग का स्वप्नात परत डोळे सकाळी ओलावलेले टिपले जातात.सकाळ झालेली नकोशी वाटते कारण ते स्वप्न संपते.मग पुन्हा एकदा तेच स्वप्न आठवण्याचा निष्फळ यत्न,पण ते उडून गेलेलं असते मनातून साफ,कापुरासारखे. कोणा शिवाय जगता येते का?.....येते. जगत तर असतोच,जोवर श्वास आहे तोवर आयुष्य आहे,पण पूर्णत्व?...ते मात्र कुठे अडकून पडू नये.

    सुरेख !!

    उत्तर द्याहटवा
  8. सखी ग,तुझ्या....प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद! स्वप्नांना धरून ठेवता येत नाही स्वप्नं,'स्वप्नं'असतात ह्यातच त्यांची खरी मजा आहे नाही?पण सत्यातले स्वप्नं,इतके छान काही सुटून जाते तेव्हां,ते स्वप्नं भंग झालेले पचनीच पडत नाही....अश्यावेळी पावले साथ देतात.आणि कित्येकांना योग्य मार्ग सापडतो....निसटून गेलेले क्षण परत कधी येत नाहीत,म्हणून ते मात्र नेहमीच मोलाचे वाटतात.

    उत्तर द्याहटवा
  9. श्रिया लेख म्हटलं तर अप्रतिम! कुनाच्या आयुष्यात हा प्रसंग नको ! कारण अश्याच एका मैत्रिणीला मागे वळण्याची इच्छा झाली तेही अशा अचानक भेटीनंतर ! तिला वर्तमानाची शपथ देत पूर्वपदावर आणताना खूप कष्ट पडले!

    उत्तर द्याहटवा
  10. गीतांजली ताई तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
    'परत वाट बदलण्याचा'मोह होणे हे मात्र फार कमी लोकांना वाटत असावे.परतून देखील,तो ओलावा तो भावनिक आधार तितकाच प्रबळ राहिलेला असेल का हा प्रश्नच आहे.आणि बदलेल्या स्वतःला,आजूबाजूच्या वातावरणाला,सांभाळून स्वतःच्या भूतकाळासोबत परत एक सुरवात करणे कितपत योग्य असेल...सांगता येत नाही.तुमच्या मैत्रिणीबद्दल तुम्ही जे इथे सांगितलेत त्याकडे पाहता तुम्ही तिला योग्य मार्गदर्शन केलेच असेल असे जाणवते.

    उत्तर द्याहटवा
  11. श्रिया,हृदयस्पर्शी अप्रतिम लेख! हळव्या मनांस हुरहूर लावणारे शब्दचित्र!

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ