Second last Date


       

            अलगद वाऱ्याने उडून तरंगत येणारे पान तिच्या जवळ येऊन पडले.गार वाऱ्याची झुळूक येऊन गेली आणि परत एक दोन पाने त्या वाऱ्याने सावकाश खाली आणली.आजूबाजूची झाडे रंग बदलणारी पाने आणि शिशिर ऋतूचे ते रूप तिला आवडायचे..आठवड्यातला हा एक दिवस बरच काही घेऊन यायचा दोघांसाठी आणि देऊनही जायचा दोघांना.हवेतला गारवा,शब्दांची देवघेव,मस्त काहीतरी खादडायला आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एक जपलेले असे नाते.गेली अनेक वर्ष उनपावसाळे बघत एकत्र प्रश्न सोडवत उत्तरांना सापडली नाहीत तर शोधून काढून एकमेकांना सोबत करत आली होती दोघे.
        ' ह्या पानांचे आयुष्य संपले असावे' असा स्वतःशीच विचार करत तिने ती सगळी पाने एकत्र  केली.बसल्या बसल्या झाडाच्या सावलीत शांत एकांत.स्वतःशीच मनातल्या मनात संवाद.त्याची येण्याची वेळ ठरलेली पण कधीच वेळेत यायचे नाही असा त्याचा नियम.आणि त्यावर काहीच बोलायचे नाही असा तिचा नियम..तेव्हढ्या वेळेत तिला नेहमीच आधी येण्याचा आणि वेळ भरपूर मिळण्याचा एक फायदा म्हणजे काहीतरी मनात ठरवून ठेवता यायचे.कधी तिच्या कॅमेर्याने छान मदत केली आहे तिला तिच्या डोळ्यांना आवडलेले टिपायला.कधी पटकन एखादा स्केच काढले आहे तिने त्या वेळेत.
नाहीतर आवडीचे गाणे पण गुणगुणली आहे अनेकदा. 
     
       तिचे आवडीचे रंग,अंगावर पांघरून कित्येक जण समोरून जात होते.आजूबाजूला खूप सारी लहान मोठी झाडे,वेगवेगळ्या वयोगटातली मंडळी ह्या शांततेचा भाग होती.फिरायला आलेले लोक,आपल्या विश्वात,गप्पांमध्ये रंगून गेले होते.काही जण पिकनिकसाठी आल्यासारखे.लहान मुले खेळण्यात दंग.काहींना पतंग उडवायला मिळत होते,आणि मग भेळ,आईस्क्रीम आणि इतर लहान मोठ्या गाड्यांवर खाण्याच्या पदार्थांची रेलचेल.....एक उत्साह वाटत होता तिला.

      त्याचे उशिरा येणे आणि तिचे वेळेत येणे ह्याचा तिला होणारा फायदा मजबूत होता.नेहमीच्या ४ वाक्यांना सोडले तर खूप सारे नवीन असायचे बोलायला तिला.काही नवीन वाचलेले,आणि नवीन लिहिलेले.त्याच्यापुढे तिचे ओपनबुक व्हायचे.अनेक गोष्टींवर विचार चर्चा करताना नेहमी नवीन असे काही सापडायचे.'सगळ्याला एक सुरवात आणि शेवट हवा अस अट्टाहास का हे तिला कळायचे नाही,सगळ्या गोष्टी कुठेतरी सुरु होऊन मग संपतील आणि जर तो शेवट गोड असेल तरच त्याला काही अर्थ आहे अस बऱ्याचवेळा समजले जाते.अपेक्षित पण असते',पण त्या दोघांना तसे वाटत न्हवते.त्यांचे नाते बहरत गेले निरपेक्ष आणि अंतहीन....

       आज त्याचे येणे जरा नेहमीपेक्षा लांबले.काय असावे कारण,आणि त्याच्याकडून नेहमी सारखे येणारे sms पण आले नाहीत...ती तशीच रेंगाळली वाटले त्याला कॉल करावा पण मग वाटले नको गाडी चालवत असेल.थोड्या वेळात तो आला.आज वेगळाच वाटला.आल्या आल्या तिला म्हणाला,"आज हि जागा बदलू इकडे नको बोलूया",तिला नवल वाटले.तशी हि त्याची आवडती जागा होती....आज तो अचानकपणे तिला कुठे न्हेणार होता.पण तिला सरप्राइझेस आवडायची.ती काही बोलली नाही त्याच्या गाडीचा वेग मात्र नेहमीपेक्षा कमी वाटला तिला.पहिल्यांदा जिथे भेटले होते तिथे गाडी गेली आज.हि त्यांची आवडीची जागा आणि वर्षातून एकदा त्यांच्या भेटीच्या वाढदिवशी तिकडे जायचे असं ठरलेले.आज अचानक परत इकडे का,तिने काहीच विचारले नाही पण मन थोडे भांबावले होते .
            
         नेहमीची कॉफी ऑर्डर करून तो शांतपणे तिच्याकडे पाहत राहिला.आज तो नेहमीचा हसरा'तो' वाटत न्हवता.त्याच्या जवळचे एक मोठे एन्व्हलप त्याने तिला दिले.वर कोण डॉक्टरचा पत्ता होता.तिने प्रश्नार्थक पहिले पण,"आत पहा "असंच तो म्हणाला.कसले रिपोर्ट्स?.मनात ती धास्तावली,एक शंका एक भय पटकन....आणि त्याने तिचा हात धरला त्या क्षणाला!तिच्या डोळ्यात पाहता पाहता त्याचे डोळे भरून आले पण दुसरयाच मिनिटाला तो शांत झाला.त्यांची मौनाची भाषा असावी आज.ती ते कागद परत परत पाहत राहिली,मागे पुढे उलट सुलट करून,कि कुठे ते चुकीचे आहेत,असतील असे काही दिसते का."retest?....तो म्हणाला झाली.आणि"confirm"तिला काय बोलावे ते सुचत नव्हते.


      समोरचे सगळे सगळे अचानक बदलल्यासारखे वाटू लागले.त्याचा चेहेरा आता तिला डोळ्यातल्या पाण्यामुळे धूसर दिसू लागला,समोरची कॉफी नको वाटली,पोटात एक गोळा आल्यासारखे आणि छातीत विचित्र धडधड.खूप वेळ डोळे वाहत होते,आणि तिने ते अडवले नाहीत.तो पण काहीच बोलला नाही सांत्वन कोणाचे करणार? त्या दोघांना आज पर्यंत कधीच दिवस कमी वाटले न्हवते.कारण उद्याची आशा असायची.रोज भेट नसली तरीही."किती दिवस आहेत आता?त्याचे उत्तर," काहीच सांगता येत नाही."आपण उपाय करू,मोठ्यात मोठ्या स्पेशालिस्टकडे जाऊ न!"असे शब्द तिच्या ओठापर्यंत आले आणि थांबले.तिला तिकडे बसवेना.

        "निघूया का?"असे नेहेमीचे विचारले तिने.तो पण काहीच बोलला नाही.निशब्द वातावरण.त्यांच्यात कधी कधी असे असायचे,एकमेकांशी एकही शब्द न बोलता एकमेकांसोबत असत दोघे पण तो दिवस शब्दांशिवाय असला तरीही एकमेकांच्या सोबतीने जायचा.पण आजचा हा सक्तीचा,काय बोलावे ते न कळल्यामुळे आलेला एक अबोलपणा.त्यात मनात विचारांचे वादळ.इतके दिवस तो तिच्या सोबत तिचा म्हणून नाही हि गोष्ट तिला कधी चुकुनही जाणवली न्हवती कारण तो आठवड्यातला एक दिवस,त्याचे काही तास,त्यांच्या मैत्रीचे असे फक्त त्यांचे उरायचे.आज तिला जे वाटत राहिले ते तिला आधी कधी अश्या तर्हेने झोंबले न्हवते.तो आता इतका महत्वाचा का झाला होता?त्याचे हसणे,बोलणे,तिच्याशी होणारे वाद,सगळे सगळे अचानक इतके महत्वाचे का झाले तिच्यासाठी?आता मात्र तिला तो दिवस ती वेळ लहान वाटू लागली. "चलायचे?तुला घरी सोडू न?"असे त्याचे नेहमीचे सहज विचारले.तिला मात्र आज एकटे जावेसे वाटू लागले."नको मी एकटी जाईन अरे,असे बोलून गेली सहज ती.ती काय बोलत होती आणि का ते तिलाच कळत नव्हते.इतके भरकटलेले कधीच तिला वाटले नव्हते.
             
          ते कागद त्याच्या हातात परत देताना परत एकदा तिने पहिले.तो तिच्याकडे शांतपणे पाहत होता."आता परत कधी भेटायचे?"हा प्रश्न तिचा नेहमीचा तिला विचारावसं वाटेना.
त्याने सहज उत्तर दिले तिच्या प्रश्नाचे वाट न पाहता"'किमो ट्रीटमेंट' चा काही उपयोग नाही,मी घेत नाहीये.तू काळजी घे.मी आहे.इतका सहज तुला न भेटता कसा जाईन!".
तिला आता थांबवेना नेहमीचे 'बाय' न करता तिने पावले उचलायला सुरवात केलीही.

         हे नाकारता येईल का? काही होऊ शकेल का?असा कसा शक्य आहे?हे आयुष्य इतके कसे क्षणभंगुर?अजून किती काही करायचे राहून गेले आहे. किती बोलायचे पाहायचे राहून गेले आहे.असा शेवट अमान्य होता तिला.'शेवटच नको' तो आठवड्याचा एक दिवस ठरवून भेटला नसता तर! इतके बोललो नसतो तर! इतके जवळ आलो नसतो तर! आज हि जवळीक तिला खायला उठली.तिचे दिवस तिला नको वाटू लागले.हे असे का? इतकाच वाटत राहिले.त्या दिवसानंतर भेट झालीच नाही.त्यानेही फोन केला नाही तिला.तिने आपली रोजनिशी उघडली रोज आणि काहीबाही लिहित राहिली त्यात.सवयीचा भाग आणि काय!राग आला तिचा तिला.ती काहीच करू शकत न्हवती त्याच्यासाठी आयुष्य मागून घेऊ शकली असती तर!
स्वतःचे  आयुष्य त्याला देऊ शकली असती तर! छे!! हे विचार आणि वर्तन इतकी शक्ती नव्हती  तिच्याकडे.त्याला पूर्ण विसरून जाण्याचीही नव्हती आणि त्याला पूर्ण बरे करण्याची पण नाही. 
इतकी कमी पडली होती ती.            
                
          काही दिवस गेले आणि एक पत्र आले.उघडून पाहिले तर त्याचे अक्षर.एक लहानशी कविता होती त्यात.आणि त्यांचा दोघांचा एक फोटो.
    ती त्या पत्राकडे पाहताच राहिली.सुरवातीला तिला,ज्या नावाने तो हाक मारायचा ती नेहमीची हाक होती,

माझ्या 'फुलपाखरासाठी' एक लहानशी कविता .....

"माझ्या मनात असलेली निशब्द तू 
माझ्या शांत क्षणातली तू, 
तू माझी नीरवता आहेस,,,,,
माझ्याबरोबर नेहमी आहेत,
 तुझे शब्द,तुझे हास्य,तुझे स्पर्श ,
   स्मित तुझे,गीते तुझी तुझा श्वास तुझा आभास...माझ्या शांततेचा एक भाग बनले आहेत.
'आपण',तू आणि मी एक आहोत ह्या शांततेत.....

 शेवटी असे लिहिले होते,

"आपला संवाद हा आता खरया अर्थाने सुरु झाला आहे. तुझ्यातल्या मला जिवंत ठेव.कधी हरू नकोस कारण आयुष्य हे हरण्यासाठी नाही."
- लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

  1. विषण्ण :(:(:(

    पण लिखाण आवडलं ! तिची चलबिचल, तिची रिअ‍ॅक्शन कुठेतरी पटतेय... का माहित का??
    दु:खाशिवाय प्रेमाची वृद्धी होतच नाही का गं ?

    उत्तर द्याहटवा
  2. तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद दीपक...

    तिच्या मनातले चाललेले वादळ त्याने बरोबर ओळखले आणि म्हणूनच ती कविता आणि ते पत्र तिला पाठवले.तिच्या नकळत त्याच्याशी जोडलेले नाते किती खोल होते हे तिच्या लक्षात येईपर्यंत सावल्याच संपल्या....
    त्याच्या आणि तिच्या नात्याचा शेवट त्याच्या निघून जाण्याने झालेला नाही हे त्याच्या पत्रातली शेवटची दोन वाक्य सांगतात तिला...तिची प्रतिक्रिया खूप वेगळी पण तिची हतबलता जाणवते.

    उत्तर द्याहटवा
  3. अप्रतिम लिहिलय ... टचड..!
    लिंकसाठी धन्स दीपक.

    उत्तर द्याहटवा
  4. काही नाती आहेत अस वाटत असताना वास्तविक संपलेली असतात .. आणि काही संपली आहेत अस वाटत पण ती रसरशीत असतात .. आयुष्याच हे एक गूढच आहे ..

    उत्तर द्याहटवा
  5. तुझे अगदी खरे आहे सविता ताई काही नाती अंतहीन असतात.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ