संजीवनी
एक अशीच संध्याकाळ.ढग दाटून आलेले.गार वारा सुटलेला,खिडकी हलत होती.अलगद येणाऱ्या वाऱ्यामुळे पडद्याची होणारी हालचाल.वाऱ्याचा झोत आला कि पडदा आतल्या दिशेने खोलीत लहरत होता.नाजूकसा पडदा,नावाला पडदा,त्याच्या आवडीचा रंग असलेला.पाऊस पडेलसं वाटत होते पण अचानक ढग कमी झाल्यासारखे,वाऱ्याचा वेग वाढल्यासारखा.खिडकी तशी जुनी पण अजूनही मजबूत.जुन्या लाकडाची तावदाने,काचा बसलेली,चौकोनी काचा.खिडकीवर कुठूनसे आलेले एक कबुतर हलकेच बसले येऊन.त्याचे पंख त्याने पिसारयासारखे फुलवून अलगद मिटले इकडे तिकडे पाहत आपल्या लुकलुक लाल डोळ्यांची हालचाल करत मानेवरची पिसे हलवत ते पण विसावले होते येऊन त्या खिडकीवर थोडा वेळ.
खिडकी जवळची खुर्ची त्याची नेहमीची जागा.त्याचे गिटार वाजवताना ती खेचून खिडकीजवळ घेऊन बसायचा.कधी खुर्ची समोरच्या टेबलावर अर्धवट बसून पण संगीतसाधना चालायची...मूड वर असायचे त्याच्या.आवाज इतका साथ देत नसला तरी संगीत मात्र होते जवळ.पण आज खुर्ची नेहमीच्या जागी होती व्यवस्थित.टेबलवर काही कागद वाऱ्यामुळे इकडे तिकडे झाल्यासारखे,त्याची वाट पाहत पडून राहिलेले.छान लिहायचा तो...काही लघुकथा प्रकाशित झालेल्या. वृत्तपत्रात पण त्याचे सदर असायचेच....
त्या खोलीत काय खास होते?..होते तर! ती खोली त्याची होती एका प्रतिभावंत लेखकाची,हास्यविनोद करणारा,मोकळ्या स्वभावाचा.त्याच्या लेखनात बरंच काही सापडायचे.उघड,खोल,अप्रतीम लेखन.त्या साध्याश्या खोलीत साध्याश्या कागदावर...लिहिणारा.शब्दांशी पेनाने खेळत अचानक सुचलेल्या ओळी अनेक कागदांवर सापडत त्याच्या टेबलवर.त्यालाच फक्त माहित त्याच्या कोणत्या कथेचा त्या भाग होत्या किंवा होणार होत्या..खोलीचा रंग शांत त्याच्या स्वभावाच्या उलट.एक कोपऱ्यातला पलंग तो पण एकदम व्यवस्थित पण अबोल...त्याला भाषा कुठे येणार पण ह्या खोलीतल्या निर्जीव वस्तूंचा संवाद त्याच्याशी मात्र होता.कोपरयात केरसुणी पण नेटकी ठेवलेली...भिंतीवर एक जुने घड्याळ सुरेख पक्ष्यांचे ठराविक वाजता त्यातला एक पक्षी बोलायचा त्याच्या भाषेत चीवाचीवायचा.त्याच्या आईला ते घड्याळ विशेष कधी आवडले नाही.पण त्याची आवड त्याच्या खोलीत दिसायची.कपाटाचा रंग तपकिरी,जुन्या जड लाकडाचा वास,त्याच्या चार पायांखाली जमीन अनेक वर्ष तीच...कसलीच जागा बदलली न्हवती एक खुर्ची सोडली तर....भिंतीवर खुंटीवर कपडे नवे....बास्केट मध्ये जुने....
रोजचा फेरफटका मारणे न चुकता,,,आले कि हातपाय धुवून संध्याकाळचा चहा घेऊन देवाला नमस्कार करून लिहायला बसण्याचा क्रम.नोकरी सांभाळून लेखन कि लेखन सांभाळून नोकरी सांगणे कठीण होते.त्याच्या संगीतसाधनेत कधी कधी पंडित जसराज,भीमसेन ह्यांसारखे मान्यवर आपल्या संगीताचे स्वर आळवून खोलीतल्या शांततेला छेडून टाकत.दरवेळी लावलेली वेगळी उदबत्ती....आणि नवीन विषयाला सुरवात...मनातल्या शब्दांना कागदावर अलगद उतरवत,कधी त्या शब्दांना एकदम सांडून टाकून मग एका विचारात गुंफत अनेक सुंदर लेख लिहित गेला तो....
संध्याकाळची देवळातील आरती सुरु झाली.चाळीतील प्रत्येक खोलीच्या आपल्या संध्याकाळीला सुरवात.दूरदर्शनचे आवाज,भांड्यांचे आवाज,मार्केट मधले दिवे दुकानांमध्ये नेहमीची गर्दी,कोपऱ्यावरचे पोरांचे टोळके ठरलेल्या वेळी जमलेले.चाळीच्या संध्याकाळी सगळ्या खोल्या सारख्याच गजबजलेल्या,घरातून दिवेलागणीची नांदी...सगळे सगळे नेहमीचेच...पण आज काहीतरी वेगळे घडते आहे कुठेतरी......त्याची पावले परतली नाहीयेत अजूनही उंबरठ्यावरून आत "आलो ग"असे आईला तो म्हणालेला नाही.....चहा पण तसाच थंड होतोय.आज चपला न घालता कसा गेला बाहेर ते मात्र आईला कळत नाहीये.....विचार करत खोलीच्या खिडकीत येऊन खिडकी आज किती दिवसांनी तिने बंद केली .खोलीत वारा कोंडला कि वारयाला खोलीत येता येत नाहीये?तो परत येईपर्यंत सगळे असेच थांबेल का त्याच्यासाठी,त्याच्या शब्दांसाठी आतुर??? ......
शेजारचा गिरीश दारात उभा होता पाकीट आणि घड्याळ हातात घेऊन....पायरीवर सापडलं म्हणाला ...
बाहेरच्या जगासाठी तो किती खेळकर,कामाच्या ठिकाणी अत्यंत नियमित,घरी सर्वांचा लाडका,मित्रांमध्ये प्रसिद्ध....त्याने हा विचार कधीच केला न्हवता.स्वतःची प्रौढी मिरवणाऱ्या मधला तो नव्हताच मुळी!एक एक ट्रेन येत होती आणि दुसरी पळत होती बाजूने.बाजूबाजूने जाताना आतली माणसे,तो वेग ती धावपट्टी रेल्वे रूळ,फलाटावरचे नेहमीचे वातावरण...त्याच्या अंगवळणी पडलेले.रोज ऑफिसला जाताना येताना असलेली ठराविक माणसे मात्र ह्या वेळी भेटली नाहीत.सगळेच अनोळखी चेहेरे दिसत होते.इतके सारे एकाच भाषेचे लोक तरीही साधे एकमेकांकडे बघून हसत पण नाहीत असे त्याला वाटले...किती परकेपणा आला आहे समृद्धी करून देखील.त्याच्या विचारांना भरकटायचे होते आज. चिकार विचार करून घ्यायचे ठरवले होते त्याने.नेहमी तो विचारांना थांबवायचा आज नाही. स्वतःची नवी ओळख आज.एरवी लिखाणातून संवाद साधणारा तो आज मात्र कागद,पेन काहीच न घेता आला होता.काय लिहिणार?कशावर?आणि का?त्याने लिहून काय फरक पडला?कोणात?कितीसा?समाजासाठी लिहित आला तो...हसवले,रडवले लोकांनी डोक्यावर घेतले चार दिवस आणि परत नाव विसरून गेले ते,त्याला कसलीच हरकत न्हवती...कारण नावासाठी लिहिणे कधी जमलेच नाही त्याला. ...
आज बाबांची आठवण येत होती खूप त्याला.त्याचे बाबा,त्याच्या आयुष्यातला एक मोठा आधारस्थंभ.जातानाचे त्यांचे डोळे आठवले त्याला,ते लक्षात राहिले होते.कधी त्याला वाटायचे त्याच्या मनाला एक हार्डड्राईव आहे आणि सगळ्या स्मृती ह्याच्या फ्रीस्पेस मध्ये साठवल्या आहेत.किती वेळा त्याला बाबा,त्यांनी वेळोवेळी दिलेला आधार,ताई तिचे घर,आजी आणि मग आई आठवत राहिले......मग त्याची खोली,त्याचे लेखन,वाटले कुठे काय बिनसते आहे?काय कमी आहे?त्याच्या मनात नेहमी चुकांची उजळणी चालायाची...आजही सुरु झाली होती.
किती वाजले असतील?आईने नेहमीसारखा चहा ठेवला असेल.....आज संध्याकाळी शेजारचा गिरीश येणार होता त्याला निबंधलेखानात कसली मदत हवी होती त्याला एकदम आठवले.....त्याने परत एकदा विचार केला जे आज करायचे ठरवून तो फलाटावर आला होता,'त्या गोष्टीचा'. जवळच एक भिकारी दिसला त्याला पाय नव्हते,भिक मागणे ह्या व्यतिरिक्त तो काही करत नसे गाणे म्हणायचे आणि भीक मागायची,नेहमीचा चेहेरा दिसल्यावर भिकाऱ्याने सवयीचा हात पुढे केला....लेखकाचा हात सवयीने खिशात गेला पण आज त्याच्याकडे पाकीट नव्हते.कोणाचे काही अडणार आहे का एक माणूस नसला तर!...सहज एक विचार मनात आला त्याच्या....हो ह्या भिकाऱ्याला भीक घालणारा एक हात कमी होईल....ऑफिस मध्ये नियमित काम करणारा एक कर्मचारी नसेल....एरवी बातमी न बनलेला एक लेखक त्याची बातमी बनेल.....सगळे विचार येत राहिले....
एक मुलगी जवळ येत होती हातात एक वही घेऊन,त्याच्या जवळ आली त्याच्या विचारांच्या ओघात येऊन उभी राहिली विचार इतके दाट होते कि तिला तो पाहत होता तरीही शब्द मात्र अडखळले आणि तिनेच नमस्कार केला...."ओळखलत का?"असा तिचा प्रश्न आला.त्याने पटापट आठवणींच्या फाईल्स मागे पुढे चाळायला सुरवात केली.तशी ती देखणी होती...मग लक्षात कशी नाही राहिली आपल्याला हा विचार करतानाच....ती म्हणाली"तुमच्या एका कार्यक्रमाला आले होते मी....तुमचे लेखन आवडते....तुमचे सदर नेहमी वाचते मी....तुम्हाला नेहमी पाहते",असे म्हणताना पटकन तिने इकडे तिकडे पहिले..त्याच्या ते लक्षात आले.....खिशात पाकीट नसल्याचे आणि पायात चपला नसल्याचे पण लक्षात आले,आणि मग त्याने केसांवरून नकळत पटकन एकदा हात फिरवला....कपडे,स्वतःचे,त्याला आज भान नव्हते पण अचानक कोणीतरी सांगावे तसे त्याने चुरगळलेला शर्ट इन करायाल सुरवात केली...तिला कुठे बस सांगणार,म्हणून तो तिकडेच एक बाक होता त्याकडे तिला हात दाखवून"बसुया का?"असच कायकी म्हणाला...ती पण बसली..तिने सांगितले तो फलाटावर आल्या आल्या तिने त्याला ओळखले होते.पण तिला वाटले कि तो कोणाची तरी वाट पाहतो आहे,कोणाला तरी घ्यायला आला आहे म्हणून ती इतका वेळ थांबली...शेवटी तिला वाटले कि आता बोलावे बराच वेळ झाला म्हणून ती आली होती...ती एक सारखी लाजत होती का कोण जाणे,त्याला वाटले,कि उगाच तिची बट पुढे येत होती बोलताना..त्याला २ ओळी सुचल्या पण छे!कागद,पेन नव्हतं...ती म्हणाली,"तुमच्या नवीन लेखाबद्दल सांगाल का?""काय नवीन लिहिता आहात?"त्याला अचानक आठवले त्याचा नवीन लेख,"अरे हो",तो तिला ओघवत्या शब्दात सांगत सुटला..ती ऐकत राहिली होती..आता फलाट,ट्रेन ह्याचे भान नव्हते त्याला,किती वेळ झाला ते पण लक्षात येईना.ती म्हणाली,"तुमच्या पायात चपला?"तो म्हणाला"हं तुटली एक,शिवायला दिल्या दोन्ही".. चांभाराकडे बोट दाखवले नकळत त्याने..ती हसली.म्हणाली,"मी निघेन आता उद्या लवकर जायचे आहे न कॉलेज ला".तो उगाचच म्हणाला"आपण इकडेच बसलो बोलत कॉफ्फी घेतली असती"..ती परत हसली"परत कधी" म्हणाली..तिने त्याच्या हातावर आपला फोननंबर लिहिला."परत भेटलो तर,म्हणून जेव्हां तुम्हाला वेळ असेल अजून ऐकेन तुमचे लेखन सर"..अस म्हणून ती निघून पण गेली होती...तिच्या त्या शब्दातून बरच काही सुचवून गेली का?असे त्याला वाटत राहिले..तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत,अजून २ ओळी सुचल्या तो आठवत राहिला,त्या ओळी कि तिचे स्मित,नक्की काय आठवत राहिला?आणि परत चालू लागला घराकडे त्यालाच कळत न्हवते..रात्रीचे ८ वाजून गेले असावेत.....
तो हातावरचा नंबर पुसला जाऊ नये म्हणून भराभर चालत घरी येताना गिरीश भेटला रस्त्यात"दादा तुमचे पाकीट आणि घड्याळ तुम्हीं जिन्यात" ....त्याचे विशेष लक्षच नव्हते गिरीशच्या बोलण्याकडे,"उद्या नक्की ये गिरीश निबंधावर बोलू अस मोठ्याने सांगत"घराकडे धाव घेतली त्याने आई काळजी करत असेल.... त्या सुचलेल्या ४ ओळी मनात गर्दी करत होत्या....आणि तिचे ते स्मित हास्य......
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे)
अप्रतिम... अतिशय सुन्दर लिहिले आहे .. जीवंत वर्णन हे या कथेचे वैशिष्ट्य
उत्तर द्याहटवाधन्यवाद संकेत....
उत्तर द्याहटवाkhup oghavati ahe katha.... chhan tipalas.. aani mandalas...!! :)
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर...मनापासून आवडले... स्वामी म्हणतोय त्याप्रमाणेच छान वर्णन केल आहे सगळ चित्र उभ राहत डोळ्यासमोर....
उत्तर द्याहटवाधन्यवाद दवबिंदू.... :)
उत्तर द्याहटवाधन्यवाद चैताली....:)
उत्तर द्याहटवा