"कुठे काही चुकते आहे का?"

  

             मनात किती वेळा हा विषय येऊन गेला.ह्या विषयावर लिहायचे म्हणजे कमीच आहे!पण लिहायचे आज मनात होते म्हणून हा प्रयत्न!कुठे काय चुकते आहे ते कळण्यास मार्ग नाही पण नक्कीच काहीतरी चुकत जाते.आणि ह्यावर सर्वांनी विचार करणे गरजेचे आहे.

           आजोबांचा प्रेमळ धाक आठवतो.त्यांनी शिकवलेली रामरक्षा,श्लोक,पाठांतर,एक प्रकारची शिस्त.घरातले वातावरण आजी आजोबांमुळे आमच्यासाठी खूप वेगळे होते.लहानपण त्यांच्या सोबत कसे उमलून आले आणि अनेक उत्तम संस्काराची बीजे कशी पेरली गेली आमच्यात ते आज जाणवते.त्यांचे घरातले महत्व अनन्यसाधारण होते हे नक्की.मी असा विचार करू शकत नाही कि आमचे घर आणि त्यात मी आई बाबा आणि आम्हीं बहिणी अर्थात,आता आजी आजोबा नाहीत पण ते असताना जो घरात ओलावा होता,त्यांच्यामुळे जे चैतन्य होते ते,आम्हां सर्वांमध्ये नक्कीच उतरले आहे.

          'वृद्धाश्रम,ह्या नावात सगळे आले का? 'घरात नको' म्हणून,'निरुपयोगी' म्हणून,असे अनेक शब्द असतील,ज्यांच्यासाठी सोय म्हणून वृद्धाश्रमाची निर्मिती झाली असावी.लहानपणी हेच आई बाबा सर्वांसाठी मनापासून झटले.मुलीला चांगली मोठी केली,शिक्षण दिले ,तिचे लग्न लावून दिले.मुलाला पण योग्य सर्व मिळावे म्हणून त्यांनी कष्ट केले,कर्ज काढली,investments केल्या पुढे जाऊन सर्वांसाठीच चांगले असावे हा उद्देश होता.वायोमानानुरूप निवृत्ती आणि मग प्रकृती साथ देत नसावी म्हणून घरात आराम....ह्यांनी मुलांसाठी बरच काही केले,आता ह्यांच्या मुलांना संधी आहे. 
पण मुले करतात का?

       काही मुलांना जाणीव असते,नुसती जाणीव असून काही उपयोग नाही.
काही मुले मात्र आई वडिलांना आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग समजत असतात,कुठे तरी वयाच्या कोणत्या तरी एका वळणावर त्यांना हि जाणीव झालेली असते,आणि मग त्यांच्या आयुष्यात कितीही बदल झाले तरी त्याचा राग वृद्ध आई वडिलांवर कधीच निघत नाही.आपल्या आयुष्यातल्या अनुभवांचे शहाणपण ह्या आजी आजोबांकडे नेहमीच असते.आपल्याहून जास्त उन्हाळे पावसाळे पाहिलेली हि मंडळी,आपली अशी मंडळी नक्कीच योग्य मार्गदर्शन करू शकतात वेळप्रसंगी हे कसे ध्यानात येत नाही तरुण मंडळींच्या?

           प्रत्येकाचे प्रश्न असतात.महागाई वाढते आहे हा एक विचार, जागा कमी पडते वगेरे असले सगळे अनेक विचार शोधून काढायला कारणे बरीच असतात जर एखादी गोष्ट मुळात नकोच असेल तर माणूस अगदी सहजपणे तिला आयुष्यातून बाहेर करू शकतो पण काहीही बदलताना त्याचे दूरगामी परिणाम मात्र लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

           इकडे कॅनडा अमेरिकेत 'sinors homes'पहिली. इकडचे विचार थोडे वेगळे जाणवले.स्वतःचे स्वातंत्र्य (Freedom) प्रत्येकाला प्रीय असते इकडे.त्यात तरुणांपासून वृद्धानपर्यंत सर्व मंडळी येतात.अद्ययावत अशी हि 'sinor homes' बाहेरून खूप सुंदर तशीच आतून पण छान स्वच्छ  ठेवलेली.एकदा मनात आले एखाद्या अश्या वृद्धाश्रमाला भेट द्यायची आणि तडक पोहोचले तिथे.वाटलेले कदाचित मला अडवतील पण माझे अगदी मोकळे ढाकळे स्वागतच झाले. त्यांच्या guest hall  मध्ये बसले जाऊन.काही प्रेमळ चेहेरे हसले पाहून माझ्याकडे. मग चौकशी झाली कि मी इकडे कोणाला भेटायला वगेरे आले आहे का,मी जेव्हां माझे येण्याचे कारण सांगितले तेव्हां सर्वांना गम्मत वाटली.प्रत्येकाने आपापली अनुभवांची पोटली उघडली आणि बघता बघता एका वेगळ्या जगात गेले मी.काहींना एकटेपण जाणवतच न्हवते,त्यांच्या दृष्टीने आजचे जग हे खूप धावपळीचे आणि त्यात त्यांना विश्रांतीसाठी हि जागा पसंत पडली,वर म्हणे 'मुले नातवंडे भेटायला  येतात'.

           काहींना एकटेपणा जाणवतो पण हि मंडळी तिकडे स्वतःचे मन रमवतात.पत्ते, कॅरम,बुद्धिबळ,गटागटाने एकत्र फिरायला जाणे,चित्रपट पाहणे,आवडीचे छंद जोपासणे,हलकेफुलके व्यायाम,एकत्र शोप्पिंग.इकडे बुधवारी सर्व मंडळी mall मध्ये दिसतात,तो दिवस त्यांचा ठरलेला.ह्यातल्या बरयाचश्यांनी आयुष्यात नोकरी केली असल्याने तसे थोडे बहुत गाठीला पैसे असतात.सगळे ऐकले त्यांचे. त्यांनी माझे भरभरून केलेले स्वागत,माझी केलेली चौकशी,मनमोकळ्या मारलेल्या गप्पा हे सगळे खूप आवडून गेले.
वाटले, ह्यांच्या नातवंडांना ह्यांची खरच गरज नाही का?
   
           भारतात आता हल्ली कित्येक ठिकाणी आई वडील आणि मुले असे चौकोनी कुटुंब दिसते...आजी आजोबा सोबत किंवा बरयाच वेळा वेगळे राहत असतात.आजीची माया हि तिच्या जवळ राहूनच कळू शकते! ती जे काही शिकवते न,ते कुठल्याच शाळेत,पाठ्यपुस्तकात सापडणार नाही! कोणाची काय कारणे,कोणाचे काय प्रश्न सर्व जण आपल्या मुद्द्यांवर कायम. मार्ग शोधणे, ह्या भानगडीत न पडता 'वृद्धाश्रम' हा सरळ सोपा मार्ग?? का बरे?आपण देखील कधी वृद्ध होणार आहोत.'चिरतारुण्याचे' वरदान नाहीये कोणालाच आणि 'तेव्हाचे तेव्हां' असे मात्र बोलता येत नाही आणि बोलू हि नये कारण ते अयोग्य आहे.
     
          माझ्या लहानपणी माझ्या घरात आजी आजोबा होते आम्हाला त्यांचे संस्कार मिळाले,प्रेम मिळाले .मला असे मनापासून वाटते कि आजी आजोबा जर असतील तर त्यांचा योग्य मान राखून त्यांना आपल्या मुलांसाठी,पुढच्या पिढीसाठी आणि त्यांच्या आपल्यावरील अनेक उपकारांसाठी ज्यांची परतफेड ह्या जन्मात तरी शक्य नाही,आपल्या जीवनाचा भाग ते बनून राहवते.प्रत्येक घरातले हे जुने संस्कार आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांवर व्हावेत.

           सुरवातीला जे मी म्हंटले कि 'काहीतरी चुकते आहे' हे जेव्हां, एक मुलगा आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायला जातो आणि तिकडे गेल्यावर त्याची फॉर्म भरताना होणारी 'चलबिचल' का बरे? कारण मनात 'हे' जे जाणवते, ते ,नक्की काय? आपले काहीतरी चुकते आहे का? तर 'हो' पुन्हा विचार करा, नक्कीच सांभाळून घ्या, चूक टाळता येते,जर वेळीच लक्षात आली तर!

टिप्पण्या

  1. श्रीया ताई...वृद्धांची समस्या सध्या खुपच गंभीर आहे केवळ शहरातच नाही तर गावाकडे पण सध्या हाच प्रश्न आहे.दोन दिवसांपुर्वी गावी गेलो होतो तेव्हा बहिणीकडे जाण झाल...तिच्या घराजवळच एक आजी-आजोबा भेटले..त्यांचा मुलगा मुंबई उच्च न्यायालयात आहे...सुन,नातवंड सगळॆ मुंबई मध्ये अन गावी हे दोघेच...ते ज्या अवस्थेत राहतात ते पाहुन मन खुप सुन्न झाल..ज्यांनी आपल्या आयुष्याला अर्थ दिला त्यांची परतफ़ॆड जर अशी करणार असु तर काय उपयोग?

    उत्तर द्याहटवा
  2. तुझे शेवटचे वाक्य योगेश मनावर परिणाम करून गेले.
    होय,ज्यांनी आयुष्याला अर्थ दिला त्यांच्यासाठी त्यांच्या उतारवयात त्यांची साथ सोडून देणे किती अयोग्य आहे.
    तुझ्या मनातले तू तुझ्या अभिप्रायात छान मांडले आहेस. धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. मानवी जीवनातील काही वास्तव हे भीषण पण सत्य असतात. जीवनात कोणाचा तरी आधार वाटणं साहजिक आहे पण आधार नसतांना केवळ जिवंत आहे म्हणून जगण अवघड आहे. पण यापेक्षा हि आधार असूनही नसन आणि तरीही वाटेला आलेल जगणं खरच भीषण आणि भयाव आहे. पण यातून हि मार्ग आहे पण तु आत चर्चेत नको... श्रिया... व्यक्त भावना या खरच विचाराभिमय आहेत.

    उत्तर द्याहटवा
  4. जाणिवांचे जग असते.भावना सुख,दुखः,वाटून घेणे आणि उतारवयात तर ह्या भावना जास्त जाणवतात.एक वेगळी मानसिकता असावी. अश्यावेळी ह्या मंडळींना खरी गरज असते एका खंबीर आधाराची,आणि हा आधार जर त्यांचा स्वतःचा मुलगा असेल किवा मुलगी तर मग जास्त उत्तम.प्रत्येक व्यक्तीवर आहे कि कोणती गोष्ट मनाला लावून घ्यायची आणि किती.
    पण खंत जर असेल तर ती माणसाला जाळते.एकटेपणा आणि तो पण सगळे असताना आलेला,आपण कोणाला नको आहोत हि भावना येणे उतारवयात अयोग्य आहे.
    तुषार तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद आणि आपले(Kalyan Samiti) माझ्या ह्या ब्लॉग वर स्वागत आहे!

    उत्तर द्याहटवा
  5. आजी आजोबांच्या सहवासात वाढलेली तुमच्या आमच्यासारखी काही जणं नशीबवानच. जी वाढत नाहीत त्यांना आपण काय गमावलं आहे तेच कळत नाही.
    वृद्धाश्रमाकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टीकोन अर्थातच वेगळा असणार. तसंच आजी आजोबांचा सहवास न मिळण्याची कारणंही बरीच.
    वृद्धाश्रमात मुलांमुळे जावं लागलं असेल तर ती वेदना शेवटपर्यंत राहते मनात. कुणाच्याही वाट्याला ते येऊ नये हेच खरं.
    हल्ली काय होतं की खूप जणांची मुलं परदेशात असतात किंवा बाहेरगावी. मला आठवतय माझे आजी आजोबाही आमच्याकडे पाच सहा महिने राहात मग पुन्हा दोन चार महिन्यासाठी गावी परतत. वडिलांना नोकरीसाठी बाहेरगावी राहावं लागलं आणि आजी आजोबांना गाव सोडावंसं वाटत नव्ह्तं. अशा गोष्टींना इलाज नसतो. परदेशात मुल असेल तर पालकांना तिथे खूप एकटेपणा वाटतो. त्यामुळे आपल्या घरीच राहणं हा एक पर्याय असतो. त्यात दोघांपैंकी एक गेलं की अगदीचं एकटं राहावं लागतं. मुलांकडे जाऊन राहायची तयारी नसते कारण जिथे आयुष्यं गेलेलं असतं ते सोडून दुसरीकडे अगदी मुलांकडेही जाणं नको वाटतं. मग अशा कुंटुंबातल्या मुलांना आजी आजोबाच्या सहवासाला मुकावं लागतं. ही काही कारणं....आणि अशी अनेक...

    उत्तर द्याहटवा
  6. मोसम ह्या नावाने संबोधते आहे तुम्हाला.तुमच्या अभिप्रायाबद्दल सर्वप्रथम आभारी आहे.मला तुमचे म्हणणे पूर्ण पटते.माझ्या नात्यात आणि ओळखीमध्ये अशी तरुण मंडळी आहेत ज्यांचे आई वडील भारताबाहेर यायला फारसे तयार नाहीत जरी मुले घेऊन जायला तयार असतील तरीही,पण त्या जोडप्याचे सुद्धा चूक नाही त्यांचे सर्व आयुष्य भारतात गेले असल्याने,नातेवाईक,मित्रमंडळी ह्या सर्वांना सोडून पूर्ण नवीन जागी जाणे नकोसे होणे साहजिक आहे.भारतात देखील गावात राहणारी वृद्ध मंडळी आणि शहरात नोकरीनिमित्त असणारी मुले आई वडिलांना शहरातील धावपळ गजबज नको वाटत असावी मुलांना गावात राहणे शक्य नसावे ह्यामुळे देखील नातवंडांना मात्र आजी आजोबा मिळत नाहीत.हे सगळे बदलत्या काळातले प्रश्न आहेत हे मात्र खरे..
    --

    उत्तर द्याहटवा
  7. मोसम म्हणजे मी मोहना. माझंच सांगते. माझी आई नुकतीच गेली, अगदी अचानक ह्र्दयविकाराच्या झटक्याने. आम्ही तिघी बहिणी. वडिल कुणाकडेही रहायला यायला तयार नाहीत. एकटेच राहातात. पण आई गेल्यावर मी पाहिलं की दुसरीकडे गेलं की त्यांचा जीव काही रमत नाही. काही उद्योगच नसतो ना. रत्नागिरीत इतकी वर्ष गेलेली. रमतात ते तिथे. मग आम्ही बहिणींनी एका पर्यायाचा विचार केलाय, अगदी जवळ वृद्धश्रम निघाला आहे नुकताच. ओळखींच्यानीच काढला आहे. रात्री फक्त तिथे झोपायला जायचं. दिवसा घरी परत असं काहीतरी. पण हा विचार नुसता वडिलांपुढे मांडांयलाही अवघड वाटतं. आता लोकं म्हणतील की त्यांनी कुठल्यातरी मुलीकडे जाऊन राहावं. पण इतकं सोपं नाही हे. माझी मुलं मोठी झाली की मी जाऊन राहीन का ती जिथे असतील तिथे, मला निदान आत्तातरी तसं वाटत नाही.
    आमच्या इथे एक कुटुंब आहे. अधूनमधून पुण्यातल्या अथश्रीत जाऊन राहातात. ती दोघंच आहेत इथे अमेरिकेत. मुलगी आणखी दुसर्‍या देशात. ते अथश्रीतून आले की म्हणतात सगळीच म्हातारी त्यामुळे विषय दुखणं खुपणं हेच असतात. स्वत:हून तिथे जातात, त्यांना नाईलाजाने आलेल्यांचं तेच दु:ख रडगाणं वाटावं इतकं ऐकावं लागतं. न सुटणारे त्यामुळेच मनाची शांती ढवळून टाकणारे हे प्रश्न पुढच्या काळात आणखी बिकट होत जाणार असंच वाटतं.

    उत्तर द्याहटवा
  8. 'मोहना'तुमचे नाव फार छान आहे :)... आणि तुमचे विचार ते स्वानुभवातून आलेले आहेत.
    खरे आहे कि आपला देश,आपला गाव आपले घर ह्याबद्दल प्रत्येकाला एक प्रकारचा लगाव असतो.सहजासहजी जागा बदलणे आणि ते पण वृधत्वात आणि पार्टनर नसताना सोपी गोष्ट नाही,शिवाय त्यांना वृद्धाश्रमात पण आवडेल असे सांगता येणार नाही.
    पण मनात येते कि मग हा तिढा सोडवणार कसा? हे प्रश्न असेच राहणर का? समजुतीने काही मार्ग निघू शकेल का? जसेकी तुम्हीं बहिणींनी मिळून मार्ग काढण्याचा प्रयत्न केलात.
    आपणच आपल्या आई बाबांचे,आई बाबांसाठी आहोत,हे नक्की.....आणि ते मनात ठेवून प्रत्येकाने निर्णय घेणे महत्वाचे.
    लहान बाळ जसे हळवे असते,असे म्हणतात जसजसे आपण मोठे होतो आपला हळवेपणा वाढत जातो....काही जण हट्टी पण होतात.....मग तर अश्यावेळी कठीण असले तरी मार्ग काढावाच लागतो.आपल्या सर्वांमध्ये एक गोष्ट मात्र आहे 'जिव्हाळा' आणि त्यामुळे नक्कीच आपल्याला मदत होते आपले विचार पक्के करायला काही निर्णय घ्यायला ते पण 'योग्य निर्णय'..

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ