'शेवटास न गेलेली गोष्ट'

         
      

               'शेवटास न गेलेली गोष्ट' हि कल्पना आवडते सर्वांनाच.अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यन्त.आता मोठ्यांपर्यन्त येव्हढ्याचसाठी म्हणाले कारण आज कालच्या दूरदर्शनवरील मालिका जवळ जवळ न संपणारी गोष्टच असतात नाहीका! कारण मग जेव्हां त्या संपतात तेव्हां,तोवर उत्सुकता पण संपलेली असते सर्वांचीच....

             नक्की माणसाला हि 'शेवटास न गेलेली गोष्ट' का बरे आवडत असावी? दर वेळी नाविन्य असलेली, आजीने सांगितलेली गोष्ट आठवली. रामायणात शेवटी 'राम राज्यावर बसला' अस जेव्हां ती म्हणाली होती तेव्हां तितकेसे ते पटले न्हवते.इतक्यातच कसे रामायण संपेल?आणि त्यात 'राम राज्यावर कसा बसू शकेल?' आजीला शब्दात पकडून भंडावून सोडलेले आठवते आहे,आजीची मग तारांबळ उडायची.एक तर आधी तिला कोकणी यायचे आणि मराठी कोकणी अशी ती गोष्ट रंगायची..पण तरीही मग वेगळी गोष्ट हवी असायची अगदी झोपेपर्यंत,म्हणायला, ऐकता ऐकता झोप आली तर शेवट कळायचा नाही न! मग आजच्या शब्दात 'story to be continued' असे झोपून जात असू.

         ह्या बालपणीच्या गोष्टींमध्ये 'साता वारांची कहाणी'आठवते.'हिमगौरी आणि सात बुटके'ती गोष्ट तर अगदी चित्रमय डोळ्यांपुढे उभी रहायची.किती सारी मराठी गोष्टींची पुस्तके,आम्हीं नुसते कैरी मीठ तिखटा सोबत  आस्वाद घेऊन वाचून काढत असू.पुस्तक कधी संपायचे आणि दुसरे सुरु व्हायचे कळायचेच नाही.सिंदबाद,अली बाबा हजेरी लावून गेले.महाभारत रामायणापासून ते दशावतारांच्या गोष्टी. आणि मग आली,'अमर चित्र कथा',त्यातील रंगीत चित्र आणि उत्तम कथेचे सादरीकरण,त्यात  दुपार पूर्ण उलटून गेली तरी कळायचे नाही कधी कधी.समाधी लागलेली असायची, त्या पुस्तकांमध्ये आम्हीं बहिणी! मी वाचायचे आणि माझी मधली बहिण मन लावून ऐकायची असा कार्यक्रम,खरे सांगू? त्या लहान मुलांच्या दूरदर्शन कार्यक्रमाहूनही हा कार्यक्रम जास्त आवडीचा असावा आमचा.
 
            त्या वेळी दूरदर्शनवर किलबिल आणि काही मोजके लहानमुलांचे कार्यक्रम.मला वाटते ते उत्तम होते! वाचन घडायचे..'.डोळ्याला वाचून चष्मा लागला' असा सांगता येत होते, 'दूरदर्शनमुळे' नक्कीच नाही!

          चांदोबा,चंपक हे तर होतेच.हिंदी मराठी वाचन भरपूर..आणि मग मोठेपणी इंग्रजीची भर.'न संपणारी गोष्ट' शोधता शोधता कधी मोठे झालो कळलेच नाही! मोठ मोठ्या लेखकांची अप्रतीम पुस्तके खजिना बनून समोर आलेली आठवतात,नविन कोरया पुस्तकाच्या पानांचा वास घ्याला आवडतो आजही,बाबा सांगत लहानपणी,नविन कोरया पुस्तकाच्या पानांचा वास बघ किती नविन आहे! नविन पुस्तक अणि ती गोष्ट सुरु होण्यापूर्वीचे,कोण नाविन्य वाटायचे मनाला! पुढे वृत्तपत्रांची मजा कळली,रोजच्या ताज्या बातम्यांचा आस्वाद घेणे...आणि त्यातील उत्सुकता परत एक नवीन भर,ज्ञानात आणि वाचनात.
   
         खरेतर आपली सर्वांचीच न संपणारी गोष्टच आहे कि सुरु!आयुष्याची!तसे पाहायला गेले तर एक  प्रवास आता 'न संपणारा म्हणत नाही' कारण कोणालाच तसे वाटत नसते न जगताना कि;हे सगळे कधीतरी संपणार आहे,तो प्रवास नक्की संपतो कधी ते कोणालाच माहित नाही आणि त्यामुळे ह्या न संपलेल्या गोष्टीतल्या उद्याची वाट पाहत पाहत रोजचा दिवस पळत असतो.काही ठरवलेले अगदी पक्के उद्या घडणारच,ह्याची कोण खात्री असते सर्वांना!जणू आपणच हि मालिका लिहिली आहे.

        ह्या उत्सुकतेचे जग सर्वांच्याच वाट्याला आले आहे.लहानपणापासून आवडलेली हि न संपणारी गोष्ट अशीच पुढे वाढवत जाऊ....प्रत्येकाचे वेगळे अनुभव,प्रत्येकाची वेगळी गोष्ट!

टिप्पण्या

  1. Great Post as always...u made me travel through the lost times...the greatest ones of my life...love ur writing!!

    उत्तर द्याहटवा
  2. तुझा छान छान अभिप्राय आवडला....दिपाली तुझ्या मनातले मी ह्या post मध्ये लिहिले आहे का ग? :) काही आपल्या आठवणी लहानपणच्या...:)

    उत्तर द्याहटवा
  3. मस्तच ..
    जुन्या आठवणी जाग्या झाल्या ..

    उत्तर द्याहटवा
  4. जे वास्तव आहे ते संपाव आणि जे कल्पनेतल आहे ते संपू नये अशी माणसाची मनोवस्था आहे नेहमीच .. तेच एक रहस्य आहे मोठ - सृष्टीइतकच!

    उत्तर द्याहटवा
  5. सविता ताई तुझे अगदी खरे आहे.पण वास्तव आणि कल्पना ह्यातला फरक कळला पाहिजे,आणि त्यानुसार वागता आले पाहिजे.
    न संपणारी गोष्ट,पण वास्तवातली..
    जगताना आनंद वेचणे आणि तितकाच वाटणे महत्वाचे!

    उत्तर द्याहटवा
  6. ताई सध्या मला आणि माझ्या बहिणीला सुट्टी आहे आम्ही नुकतेच आमचे जुने पुस्तकांचे कपात उघडले त्यातल्या इसापनीती पंचतंत्र आणि बिरबल बादशहा यांच्या गोष्टी वाचायला घेतल्या (पुन्हा ....लहान असताना वाचल्याच आहेत ) पण तू म्हणतेस तसं या गोष्टी संपूच नयेत वाटत ....एक वाचली कि पुन्हा नवीन वाचावी वाटत राहते .....या गोष्टीच्या गोष्टीवरून तू किती एक सार सांगितलस ....."उद्या येणारा उद्या तसाच राहतो अपूर्ण ....आणि आजची गोष्ट ती हि अपूर्ण ....खरचं गोडी अपूर्णतेची मनास ओढ लावी ......आवडली तुझी लेखनशैली ......उद्देश्पूर्ण आणि मुद्देसूद तर आहेच पण चटकन आपलास करते ....तू साधलेला मनाचा संवाद पोहचतो आहे नक्की .....धन्यवाद

    कविता

    उत्तर द्याहटवा
  7. कवि तू म्हणतेस ते बरोबर आहे.लहानपणी आपले एक वेगळे विश्व असता,खेळकर,आनंदाचे अनेक अनुभव,थोडा बहुत धाक,शिस्त,हट्ट,लाड,अभ्यास,मैत्रिणीचे जग,आणि मग आपले छंद.तुझे लेखन बघता तुझे वाचन पण तितकेच चांगले आहे ह्यात शंकाच नाही!आणि तू आणि तुझी बहिण जुनी गोष्टीची पुस्तके वाचता आहात हे ऐकून छान वाटले.
    अग मी आता घरी गेले होते आईकडे,तेव्हां माझी लहानपणची गोष्टीची पुस्तके कपाटातून काढून वाचत बसले,एक एक पुस्तक काही वेगळं सांगत.एक संवाद त्या पुस्तकाशी.किती पण वाटले तरी जुनी पुस्तके शेवटी पहिला नंबर लावून जातात.एकातून दुसरया पुस्तकाकडे वळताना किती सहज पाने उलटत किती सारे ज्ञान मिळवत जात असतो लक्षात येत नाही कारण आवडीच्या गोष्टी असतात न!
    माझे लेखन तुला आवडले आणि तू त्याबद्दल इकडे इतका सुंदर अभिप्राय दिलास त्याबद्दल तुझी मी आभारी आहे!

    उत्तर द्याहटवा
  8. किलबिल,बालचित्रवाणी....हे कार्यक्रम जाम फ़ेवरीट होते.

    ठकठक,चाचा चौधरी...हे पण भारी असायचे.

    श्रिया ताई...सर्व जुन्या आठवणी ताज्या झाल्या....ही पोस्ट खुप आवडली :)

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ