आमची गच्ची!

गच्ची.....................घराला असली कि उंचावरून बरच काही अनुभवता येते.
लहानपणी गच्चीवर खेळायला जायचो,धमाल यायची! सुटीत गच्चीचा वापर खेळण्यासाठी....आणि परीक्षेच्या काळात
अभ्यासासाठी करत असे मी.

गच्चीवरून
रात्री चांदण्यांनी गच्च भरलेले आकाश बघताना,चटईवर उताणे झोपून गप्पा मारत आम्हीं बहिणी आणि आईबाबांबरोबर ती आकाशगंगा दुर्बिणीतून पाहताना,थंड वाऱ्याच्या झुळ्कीला अंगावर झेलत मस्त पडून राहायचो, डोळे भरून चांदण्या पाहताना थोड्या वेळासाठी शांतपणे एकही शब्द न बोलता ते आकाश अनुभवायचो, मध्येच येणारा रातकिड्यांचा आवाज, एखाद्या पक्ष्याचा आवाज आणि शेजाऱ्यांच्या घरातून येणाऱ्या TV चे आवाज सोडले तर अगदी मध्येच गाड्यांचे व रस्त्यावरच्या तुरळक लोकांचे बोलण्याचे आवाज येत असत.हि गच्चीसहल कधी कधी उकडलेल्या किंवा भाजलेल्या शेंगांची मेजवानी पण घेऊन यायची.कधी कधी तेव्हा बाबा गाणे म्हणत त्यांचा सूर इतका छान लागायचा कि ती संध्याकाळ खरच गच्चीत संगीतमय होऊन डोलू लागायची.

शेजाऱ्यांच्या
गच्चीचे होणारे दर्शन, वाळत घातलेले कपडे, काहींच्या गच्चीत तर पापड आणि मिरच्या पण वाळत असत.
पतंग उडवणे आणि ते पण गच्चीतून ...ह्याचा अनुभव मुंबईला काकांकडे गेले असताना खूप आला.गच्चीत कधीकधी सामान असायचे मग गच्चीत लपंडाव खेळ रंगायचा आम्हां मुलांचा.अगदी लहानपणी आजोळी होते तिथे तर मध्यप्रदेशात रंगपंचमीला खूप महत्व. गच्चीत आम्हीं सगळे, लहान मंडळी जमायचो, बाद्ल्यान मध्ये रंग आणि पिचकारी घेऊन एकमेकांवर रंग उडवणे चालायचे, कोण आनंद वाटायचा ह्या खेळात! आता आठवले कि गम्मत वाटते.

आजची
तरुणाई गच्चीत वेगळ्याच कारणाने असते.रस्त्यावरून जातायेता आवडत्या व्यक्तीला नीट पाहता येत नसेल तर मग गच्चीचा ह्यांना चांगला उपयोग होतो....असे आजूबाजूच्या गच्च्यांवर पाहता दिसते.

गच्ची
जर मोठी असेल तर morning walk , व्यायाम ह्यासाठी देखील वापर होतो, काही गच्च्यांवर गृहिणी एकत्र जमून लहान मोठे कार्यक्रम पण करतात.
मला आठवते एका मैत्रिणीच्या घरी कोजागिरी पौर्णिमेला गेले होते, त्यांच्या society मध्ये सर्वांनी वर्गणी काढून एक प्रोजेक्टर मागवून सर्वांना एक गच्चीत चित्रपट दाखवला होता.लहानपणी असे कार्यक्रम असले कि गंमत वाटायची.एका मोठ्या गच्चीत तर लहान मुलांना सायकल शिकवण्याचा कार्यक्रम पण केला होता काही हौंशी पालकांनी.

मग
मोठी झाले तेव्हां गप्पांसाठी एका मैत्रिणीच्या घराच्या गच्चीत जमत असू, तेव्हां वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगत, अगदी जुन्या आठवणींपासून ते सध्या चाललेल्या विषयांवर; गप्पा रंगत .दिवाळीच्या सुटीत घरी नातेवाईक जमत, मग आम्ही सर्व लहान मंडळी फटाके उडवण्यासाठी गच्चीत जात असू.
कित्येक group फोटो गच्चीत घेतले गेले.कित्येक आठवणी गच्चीत सामावल्या आहेत.

कधी
कधी वाटायचे एकटे गच्चीत बसून मस्त चित्र काढावे, कविता पण केल्या आहेत गच्चीत बसून. मस्त वारा खात एखादे आवडीचे पुस्तक वाचन करणे, कधी कधी गायनाची हुक्की यायची मग गच्चीत येऊन आपला सूर लावायचा. ह्या गच्चीने आम्हां मैत्रिणींची secrets आपल्या जवळ दडवली आहेत.तिने माझे गाणे सहन केले आहेआणि माझ्या कविता आवडीने ऐकल्या आहेत. माझ्या वाचनाला साथ दिली आहे आणि सर्व आठवणीना जपलेआहे.
जेव्हां आज मी परत एकदा गच्चीचे दार उघडते तेव्हां तोच निसर्ग माझे मुक्तपणे स्वागत करतो, न बदलेली गच्ची हसते आणि परत एकदा सगळे सगळे गच्चीमय होऊन जाते !!!

-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ