माझी मी


कधी कधी असा विचार करते कि 'मी कशी आहे?'प्रत्येक व्यक्तीला मी वेगळी वाटते....सर्वांना जाणवणारे असे काही स्वभाव गुणधर्म आहेत ....पण खरी मी कशी आहे हे कोणाला माहित?आहे,पण फक्त मला.

कारण ते असे शब्दात सांगता येते का,किती सारया गोष्टी असतात स्वतःला माहित,वाटते पण त्या सांगता येत नाहीत,का येत नाहीत तर वाटून गेले ते सगळे मनातले उघड नसते.किती सारे अनुभव गाठीशी असतात....आणि ते जिवंत अनुभव खूप काही शिकवून जातात.काय महत्वाचे असते जगण्यासाठी,रोजच्या आपल्या उठण्या बसण्यात लहान मोठ्या अनेक गोष्टी घडत असतात. आपल्यासाठी एखादी खूप महत्वाची वाटणारी गोष्ट सगळ्यांसाठी महत्वाची असेलच असे नाही.सगळे मनासारखेच होते असे नाही आणि ह्यात पण एक गम्मत आहे.मग आपण विचार करतो,आपल्या मेंदूला खाद्य मिळते.असं नक्की का झाले असेल,माझे काही चुकले असेल का,कि हा पण एक अनुभव असं समजून राहावे,शांत राहावे,जे घडून गेले ते घडून गेले,त्यावर विचार करून काहीच मिळत नाही.
तसेच आनंदाचे क्षण येतात आणि मग स्वतःचा विसर पडतो,एखाद्या वेळी अचानक स्नो पडू लागला कि जसे वाटते एकदम गार आणि नवीन,जिवंत झाल्यासारखे,परत एकदा नवीन उभारी आल्यासारखे असे काहीसे हे आनंदाचे क्षण देऊन जातात.

मी स्वतःला नेहमीच समजून घेण्याचा प्रयत्न करत असते, कोणीच कधी १००% नसते पण प्रयत्न मात्र करत असते.मला मी खूप आवडते.
किती सारया गोष्टी आवडतात मला,शांत एकांत आवडतो,उगवतीचा सूर्य आणि मावळतीला आकाशातले असंख्य रंग,पावसाळ्यातली हिरवळ आणि लाटांचा आवाज.उंच इमारतीच्या गच्चीतून दिसणारे लहान लहान लोक आणि गाड्या,विमानाच्या पंखांवरून उडत जातानाचे कापसासारखे दिसणारे ढग आणि त्यामधून डोकावणारी पृथ्वी, थंडीची सुरवात,शिशिरातली पानगळ,पायाखाली केशरी,लाल सांडलेली मेपल झाडाची पाने,आणि पानांमध्ये उड्या मारणारी लहान मंडळी....बाबा गाडीतून फिरायला जाणारे बाळ आणि फुगा बघून डोळ्यात आलेली आशेची किरणे झेलणारे त्याचे आई बाबा, कामाची गडबडीची वेळ आणि अंडरग्राउंड ट्रेन चा गजबजलेला प्लाटफॉर्म,काही आठवणीतले चित्रपट,आवडीचे खाद्यपदार्थ,संगीताचा आस्वाद घेत फुलवलेली एक सकाळ,माझ्या घरातली साफसफाई आणि कुठे बाहेर जाताना मी करत असलेली तयारी....माझे कपडे,माझे perfumes ,माझी बेडरूम,फोटो अल्बम्स,घरातल्या सगळ्या स्मृती आणि आपली माणसे................किती आणि काय काय जोडले आहे मी....कशालाच तोड नाही! सगळे सगळे असेच राहावे नेहमी असे वाटते,सुटून जाणारे क्षण घट्ट धरून ठेवता आले असते तर! प्रत्येक वेगळा अनुभव साठवून ठेवता आला असता तर!

'Alice In Wonderland'हा चित्रपट मध्ये पहिला,Alice च्या कल्पना विश्वात तरंगून आले.स्वप्नात पण ती खरे खुरे जगली.किती सारया कल्पना एकत्र करून तिने तिचे एक विश्व बनवले.विचित्र वाटणाऱ्या गोष्टी सगळ्या एका ठिकाणी! ते तिचे 'Wonderland '.
खरेतर आपल्या प्रत्येकात एक Alice दडलेली आहे असे वाटले.आपण कित्येक गोष्टी समजून घेतो असे दाखवत असतो,हे असे नाही आणि असे झाले असते तर काय झाले असते असे प्रश्न पण आपल्याला पडतात.
कित्येक वेळा आपण अशी आव्हाने स्वीकारत पण असतो Alice सारखी,आणि मग आपल्या आयुष्यात पण बदल होतात, नवीन गोष्टी घडतात,आपल्याला आपली नव्यानेच ओळख पटते,आपले अनुभवविश्व रुंदावते.

अनेक लेखकांनी आपले अनुभव त्यांच्या लेखणीतून शब्दबद्ध केले आणि आपल्यापर्यंत आणले. पु ल देशपांडे ह्यांचे लेखन विनोद निर्मितीतून आपल्याला अनुभवाचे शहाणपण पण देते.जयवंत दळवी,व पु काळे हे असेच आणखीन काही विनोदी लेखक.कवितांमधून आपले अनुभव मांडणारे कवी पण एखाद वेळी आपल्याला डोळ्यात पाणी येईल इतकी सुंदर कविता देऊन
जातात .संगीताची जादू काही औरच! लता दीदींचा आवाज अंतर्मनाचा ठाव घेत रसिकाच्या मनाला तजेला देऊन जातो....हे सगळी मंडळी कलावंत ह्या क्षेत्रातली दर्दी मंडळी,आपले अनुभव वाटल्याशिवाय त्यांना चैन कशी ती पडलीच नाही! त्यांचे माध्यम त्यांची कला आहे

रोज सकाळी उठते तेव्हा असा विचार करते एक नवा दिवस,माझी एक नवी सुरवात आहे आज.परत एकदा स्वतःला नव्याने जाणून घ्याचा आणखीन एक दिवस!आपण सगळेच 'लंबी रेस के घोडे' आहोत,हि शर्यत कधीच संपणार नाही,कारण आपणच सुरु केली आहे आणि आपणच निवड समिती असल्याने जिंकणार हरणार ते आपणच ठरवतो आहोत न.

मोकळेपणी स्वतःशी गप्पा मारता आल्या पाहिजेत.मनात सगळेच बोलतात स्वतःशी,असाच संवाद साधला कि मग प्रश्न सोपे होऊ लागतात.पांघरायचा प्रत्येक दिवस शाल पांघरतात तसा आणि जपायचा मनात कारण जे काही देतो तो आपल्याला ते सुख असो व दुख असो शेवटी मानण्यावर आहे झाले!


आरशासमोर उभी राहून स्वतःला पाहते तेव्हां लहानपणापासून आता पर्यंतचा बदल आणि विचारांमधला बदल देखील लक्षात येतो.अनुभव घेताना ह्या प्रवासात वेळ कसा पटकन जातो नाही! छान वाटते पण मागे पाने परत उलटताना,एक धावता चित्रपट जणू,एखाद्या बाबतीतले माझे जुने विचार आणि आताचे विचार ह्यात देखील फरक पडला आहे
.काही व्याख्या जुन्याच आहेत काही नवीन आहेत आणि नवीन दृष्टीकोनातून हि बघू लागले आहे गोष्टींकडे.

किती बदलले आहे कोण जाणे. लहानपणापासून मला ओळखणारे सांगू शकतील,माझ्यातले लहानपण जपून ठेवण्याचा निरंतर प्रयत्न करते....ती कोवळीक खरेतर प्रत्येकाने जपली पाहिजे नाहीका!


लिहिता लिहिता एक कविता आठवते एका कवीची...राष्ट्रभाषेतली कविता आहे पण खूप आवडली...म्हणून इकडे देते आहे ब्लोग च्या सुरवातीला ...आवडते का पहा...
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ