! पाऊस असा हा रुणझुणता !





आज सकाळी नेहमीसारखी उठले,बाहेर सूर्यनारायणाने दडी मारलेली दिसली,आणि 'नभ मेघांनी आक्रमिले' चा अनुभव आला.काळोख दाटून आलेला आणि पावसाची सर नुकतीच येऊन गेलेली...परत येण्याची चिन्ह होती.हा इकडचा,कॅनडा चा पाऊस पाहिला कि खरच गम्मत वाटते.कधीतरी अगदी एखाद दुसरी सर आली तरीही,इथल्या लोकांची तारांबळ उडते.रेन बूट्स,छत्र्या,रेन कोटस घेण्यासाठी shopping centers,mall मध्ये थोडीशी गर्दी दिसते इतकंच त्या पावसाचे कौतुक!छत्री उघडे उघडे पर्यंत म्हणता म्हणता पाऊस गायब होतो,आणि मग घरी येई पर्यंत पाऊस नाही..कधी कधी अचानक येऊन भिजवून जातो खरा पण जाणवत पण नाही इतके कारण,घरी येईपर्यंत तुमचे कपडे बरयापैकी सुकलेले असतात ,पण इकडच्या लोकांना एकाद दिवस जर थोडा जास्त पाऊस पडला तर कोण कौतुक वाटते त्याचे !' rainy day ' म्हणून त्या दिवसाचे नामकरण केले जाते.मग घरात बसून कंटाळा येतो अश्या दिवशी म्हणून shopping centers मध्ये गर्दी वाढते.सिनेमागृह,होटल्स गजबजतात.
मला इकडे सुरवातीला ह्या अचानक येणाऱ्या पावसाबद्दल लोकांना काय वाटते जाणून घायची उत्सुकता होती..इकडचा पाऊस हा इकडच्या वसंत ऋतूचे मुख्य आकर्षण आहे ... वसंतात पाऊस असतो आणि आपल्याबरोबर तो हिरवळ घेऊन येतो..सगळीकडे झाडांना पालवी फुटते,वेगवेगळ्या रंगांची फुले फुलू लागतात,ह्या पावसाने एक नाजूक लकेर छेडली कि हवेत गारवा येतो आणि ओलेते झालेल्या रस्त्यांवर ओल्या मातीचा सुगंध दरवळू लागतो कि मग मन उडत उडत आठवणींच्या राज्यात जाऊन पोहोचते...
पावसाचे आगमन हे लहानपणापासूनच मला एक आवडीचा विषय होते.दरवर्षीचा पावसावरचा निबंध नवीन गोष्टी सांगायचा.लहानपण कोकणात गेले आणि तिकडे तर पावसाळा मुख्य ऋतू ... नुकतीच पावसाची सुरवात झालेली असायची,लहानपणी छत्री घेऊन जायचो खरे;पण पावसात भिजण्याकडेच जास्त कल होता..पाणी साचलेले असायचे त्या डबक्यात उड्या मारणे,धो धो वाहणाऱ्या पावसाच्यामुळे तयार झालेल्या ओहोळात पाय बुडवून उभे राहणे, पायांच्या दोन्ही बाजूने पाणी जोरात वाहू लागायचे आणि मग थंड, कधी उबदार पाण्याच्या त्या लहरी मनाला पण आनंदाचा स्पर्श करून जात..वाहत्या पाण्यात मग कागदाच्या बोटी करून सोडणे..लहानलहान बेडकांच्या मागे जाऊन खेळणे,असे उद्योग चालत.... कधी गुडघाभर पाणी पण असायचे मग त्यातून शाळेत जायचे... दप्तर सांभाळत,कपडे तर पूर्ण ओले होत...पण कशाची परवा नसायची कारण गप्पा आणि पावसाच्या त्या आवाजाने मनाला एक प्रकारची उभारी यायची माझ्या. माझ्या काही मैत्रिणींना,घरातल्या मंडळींना पाऊस म्हणजे कधी कधी अचानक आलेला असला तर आवडायचा नाही,"नको तेव्हां कडमडतो!"असे पण कानावर यायचे,किंवा "ह्या पावसाला न आताच यायचे होते!" हे तर ठरलेले वाक्य होते ....पण मला मात्र आवडायचा तो अचानक आलेला! शाळेत वर्गात कधी कधी कौलांमधून टपटप आवाज करत पण साहेब आमच्या वर्गात हजेरी लावत,मग अर्थात जागा बदलायचा कार्यक्रम होई ....शिक्षिका आमच्या जागा बदलत आणि पावसाचे काही न बोलता स्वागत करत.
घरासमोरची शेते पाण्याने तुडूंब भरलेली असत .पावसात आपली बैलजोडी सांभाळत, नांगर चालवणारा शेतकरी आठवतो..आणि पेरणी पण आठवते.खूप पाऊस पडला तरीपण का पडला? हा सूर,आणि कमी पडला तरी बिचाऱ्याला नावे ठेवतात शेतकरी, ह्याची मला गम्मत वाटायची. आणि आपले हवामान खाते तर आज निरभ्र आकाश म्हंटले तर नेमका पाऊस लागायचा,,आणि आज पाऊस पडेल असे अनुमान केले तर ढगांचे चिन्ह नाही अशी अवस्था असायची माझ्या लहानपणी.पण आम्हां लहान मुलांना मात्र पाऊस हवा असायचा. घराला जो जिना होता तो लाकडी होता आणि पावसाच्या जोरदार आक्रमणामुळे जिन्याला शाकारणी करावी लागायची झापांची, नाहीतर बिचारा जिना साफ ओलाचिंब होऊन जायचा आणि मग घसरून पडण्याचे कार्यक्रम घडत..घरापाठी मोठी वाडी होती आमच्या घरमालकांची, आणि त्यात पाणी साठायचे.जेंव्हा भरदिवसा ढग दाटून येऊन काळोख व्हायचा तेव्हां आकाश अक्षरश खाली आले आहे कि काय असा वाटायचं! विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट...अर्थात मग' ये रे ये रे पावसा ची', सुचत....
नंतर थोडी मोठी झाले,मग कधीतरी अचानक ह्या ओलसर हवेत,गरम गरम चहा आणि गरम भजी ह्यांचा आस्वाद घेत,गप्पा रंगू लागल्या... पावसाला त्याच्या गारव्याला कधीच मावळू दिले नाही मनातून.... घराच्या कौलारू छपरावर पावसाच्या थेंबांचा आवाज आजही आठवतो.पाठच्या वाडीतल्या ओल्याचिंब हिरव्याग़ार नारळाच्या झाडाकडे पाहताना असा वाटायचे कि निसर्ग आनंदित होत असावा,केळीची पाने वारयावर हलत आणि त्यावरचे पाणी चकाकत असे असे वाटे कि जणू ती नाचताहेत त्या पावसाच्या सरींनी निर्माण केलेल्या नादावर.....आणि मग सुजाता चित्रपटातले,"काली घटा छाए मोरा जिया तरसाए!" गाणे आठवायचे.
जरा थोडा जोराचा पाऊस आला कि मग light जात घरात, काळोख होत असे पण मग लगेच कंदील, petromax लावला जात असे,समोरच्या पडवीत बसलो असलो कि अश्या ह्या मंद दिव्यात नुसताच पावसाचा जोरदार आवाज ऐकत वेळ कसा जायचा कळायचा नाही....मधूनच येणारा वारा आणि चमकणारी वीज, दुरून येणारी एखादी बस गाडी, तिचा आवाज आणि त्या बस गाडीच्या दिव्यांच्या प्रकाशात पटकन चमकणारी एखादी रस्त्यावरची बैलगाडी.... त्या दिव्यात पावसाची सर दिसायची इतका पाऊस असे कधी कि रस्ता पण दिसायचा नाही.अश्या पावसात रेन कोट घालून बाबांच्या पाठी सायकल वर बसून येताना छान वाटायचे ...आणि पुढे मोठी झाले तेंव्हा पावसात सायकल चालवत कॉलेज मध्ये जायचे ते पण दिवस आठवतात.....
अनेक कवींनी पावसाला आपला गुरु मानला आणि त्यांच्या पावसावरच्या असंख्य कविता जन्मल्या. त्या कवितांमधून एकाहून एक सुरेख गाणी निर्माण झाली आणि मोठमोठ्या गायकांनी ती आपल्याला दिली. असेच एखादे गाणे पाऊस सुरु असताना radio वर लागलेले आठवते..मन मोहरवून टाकणारे सुरेल आवाजातले गीत घरात पण पाऊस घेऊन यायचे! संगीताची जादू आणि आकाशीच्या शिल्पकाराने निसर्गाला दिलेले वरदान,हा पुन्हा पुन्हा येणारा आपला मित्र 'पावसाळा',खरच ह्या दोघांची सांगड घातली कि मी नेहमीच खुश असायचे. माझ्याबाबांची संगीत साधना आठवते,ह्या अश्याच एका ढगाळ दिवसाची संध्याकाळ,आणि त्यांच्या संगीत साधनेत साथकरायला आलेल्या मित्रपरिवाराचे चहापान,गप्पा आणि मग सुरेल गीतांचा रंगलेला तो कार्यक्रम!
असे अनेक पावसाळे,बरंच काही देऊन गेले मला. मग एक कवितेची ओळ सुचली,आठवणींचा पाऊस येतो कशी सावरू सांग आवरू, घन हे भिजवुनी जाती,तूच खरा सांगाती......
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
छान लिहिले आहे....पावसाळा झक्कास अनुभवला आम्ही काही क्षणात ...
उत्तर द्याहटवाबैलगाडीचे ते अचानक दिसणे... कोणाच्या डोक्यातही येणार नाही.. एक उत्कृष्ठ लेखिकाच इतका बारकाईने विचार करू शकते
कुवैत च्या वाळवंटात पावसाच्या मजेला मुकले आहे. तुझ्या ह्या लेखणीतुन असा पाऊस आला की चिंब भिजले.. अप्रतिम लेखिका आहेस ह्यात शंकाच नाही. अगदी सगळे सगळे डोळ्यापुढून गेले... जुन्या आठवणी जाग्या झाल्याच....
उत्तर द्याहटवातुझीच संध्या
धन्यवाद संध्या ....तुझी टिप्पणी वाचून छान वाटले... खरे तर पावसाळा दर वर्षी यायचा पण दर वर्षीचा माझा अनुभव वेगळा होता, आणि हे सगळे अनुभव एकत्र करणे खूप कठीण आहे पण तरीही जमेल तितके मी एकत्र करून हे पोस्ट तयार केले ,काही छायाचित्र पण त्यात सुरवातीला आहेत , हिरवळ जी पावसाळ्यात असते ती खरच मनाला किती चैतन्य देते नाही!
उत्तर द्याहटवाधन्यवाद प्रशांत ,
खरेतर हा एक संवाद आहे असे म्हणायला हवे कारण लिहिणारा हा आपल्या मनातले विचार कागदावर उतरवत असतो वाचणाऱ्याशी केलेला हा एक निखळ संवाद आहे.......माझे लेखन तुमच्यापर्यंत पोहोचते हे खूप काही देऊन जाते. मला लिहिण्याची संधी मिळाली आहे आणि मी प्रयत्न करते आहे ......आपल्याला माझ्या लेखनात काही तृटी आढळल्या तर नक्कीच सुचवावे किंव्हा जर काही आणखीन सुधारणा करायच्या असतील तर सांगावे....