जर तरची गोष्ट


बऱ्याच दिवसांनी ब्लॉग वर काही पोस्ट करते आहे.

सध्या भारतात आहे.खूप वर्षांनी आले आणि खूप राहते आहे! ह्या भारत भेटी बद्दल जितके लिहावे कमीच आहे! आई बाबा बहिणी,सर्व नातेवाईक,आप्त सर्वांसोबत निवांत वेळ मिळाला,नेहमीसारखे धावपळीचे दिवस नाहीत त्यामुळे,भारतात नवीन अनुभव,भटकंती,अनेक उत्तम उपाहारगृहात घेतलेला पाहुणचार,नवीन ओळखी,काही सहली आणि ह्या सर्वाची खूप सारी छायाचित्रं साठवत जाते आहे. ही भारत भेट,माझ्यासाठी अनेक सुंदर अनुभव,आनंदाचे उत्साहाचे,उत्सवाचे वातावरण घेऊन आली.बाप्पाने दिलेली ही अमूल्य भेट आहे! महत्त्वाची जबाबदारीची कामे चालू आहेत.पण त्याच बरोबर क्षणभर विश्रांती मिळते,अशा उत्तम नाट्य कलाकृतीतून !

    मध्ये एका शनिवारी ' जर तर ची गोष्ट ' २ अंकी मराठी नाटक पाहिले.

खूप दिवस मी वाट पाहत होते की उमेश कामत,आणि प्रिया बापट ह्यांचे हे नाटक पुण्यात येते, आणि सगळे व्यवस्थित जुळून आले ते शनिवारी.

 नाटकाचा विषय गंभीर असला तरी तो एका वेगळ्याच पद्धतीने सादर केला गेला आहे.२ अंकात हा विषय मांडणे तसे अवघड असूनही बऱ्यापैकी प्रेक्षकांपर्यंत त्यातला संदेश पोहोचला आहे.मला ह्या कलाकारांचे नेहमीच एक विलक्षण कुतूहल वाटते,आपल्यासमोर बसलेले प्रेक्षक हे त्यांच्या किती जाणिवेत असतात, आणि अंगात गेलेले कॅरेक्टर जिवंत करताना ह्या समोर बसून आपल्याला पाहणाऱ्या लोकांपर्यंत आपण पोहोचतो आहोत का, ही भावना अभिनयाच्या जादुई दुनियेत त्यांना जाणवत असते का...ते चित्र जसे कथेत उभे केले आहे,ते संवाद,नेपथ्य आणि अभिनय कला ह्या द्वारे प्रस्तुत करताना,असंख्य टाळ्या आणि खुललेले हास्य,तसेच एखादा हृदयद्रावक प्रसंग रंगला,असताना नाट्यगृहात पसरलेली शांतता,ही प्रेक्षकांकडून पोहोचलेली दाद असते.


  नक्की पहावे असे नाटक ! विषय नाजूक पण कथा आपल्याला प्रत्येक पात्राच्या जवळ न्हेते.एखाद्याची चूक का कशी आणि खरंच चुकलय की बरोबर आहे,ह्या वर आपल्याला विचार करायला भाग पाडते.

मध्येच उमेश कामत आणि आशुतोष गोखले ह्यांनी पिकविलेला हशा, प्रिया बापट ह्यांनी गायलेले सुंदर चित्रपट गीत.माझी ओळख पल्लवी अजय ह्या अभिनेत्रीशी ह्या नाटकातून झाली.छान वाटले तिला भेटून! तिची भूमिका आगळीवेगळी वाटली..मस्त मौला अशी ही सती छान रंगवली आहे तिने! 

  ४ कलाकार,मनाची पकड घेतात.नाट्यगृह भरलेले,आणि टाळ्या मजबूत,माझ्याकडून ही हां!!👏🏻👏🏻ह्यावरून नाटक कसे वाटले असेल ह्याचा अंदाज तुम्हाला आलाच असेल.रंगमंच उत्तम सेट ने सजलेला,संगीत छानच! सगळे उत्तम असे सांगताना एक गोष्ट जाणवली,विषयाला अजूनही सुंदर मांडता आले असते,पण वेळेचे बंधन हे कधी कधी अश्या वेळी आड येते,मला अजून थोडा वेळ ह्या चौघांसोबत त्या नाटकात रंगायला आवडले असते,अजून हसायला आवडले असते!! 

  कधी कधी जसे एखादी मेहेफिल रंगते,आणि मग जेंव्हा संपते,मागे सुरेल असे काही तरंगत ठेवून जाते,!तसेच काहीसे , 'जर तर ची गोष्ट' पाहून वाटले !

पाहण्यासारखे,विचार करायला लावणारे नाटक!


- श्रिया

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

एक लोभस संध्याकाळ

पहिला हिमवर्षाव ..