क्षणभर विश्रांती

 ह्या वर्षी उन्हाळा आलाय खरा,पण सगळेच स्तब्ध होते,रस्ते,शांत.

थंडीचे महिने, बाहेर बराच वेळ घालवता येत नसल्याने,इकडे उन्हाळ्याची सगळे आतुरतेने वाट पाहत असतात.

पण करोना साहेबानी यंदा सर्वाना घरी राहण्याची शिक्षा फर्मावलेली.आता कुठे जरा उसंत दिली;तेंव्हा हळू हळू थोडी वर्दळ दिसू लागली आहे.

         इकडे उन्हाळा जेमतेम 4 महिने टिकतो,तसा सप्टेंबर शेवटी शेवटी गार होऊ लागतो...संध्याकाळचे गार वारे सुटते.त्या पूर्वी लोक भरपूर उन्हाळ्याचा आस्वाद घेऊन टाकतात...तसाच एक आमचा आजचा दिवस होता..घराजवळील पार्क मध्ये चटई घेऊन पोहोचलो,मी आणि माझी लेक..

       निसर्गाच्या सानिध्यात आम्हा दोघींना भलतेच आवडते! झाडांचा,फुलांचा वास, फुलपाखरे, आणि गवतावर फिरणाऱ्या लहान मंडळींची लगबग बघायला आवडते.आज ज्या वृक्षाखाली आमच्या गप्पा रंगलेल्या त्याचे नाव weeping willow tree .ह्या वृक्षाखाली झोपून त्याचा प्रचंड विस्तार पाहायला खूप छान वाटत होते...त्याची पाने आणि फांद्या खालच्या दिशेने झुकलेल्या असतात, आणि वाऱ्यावर झुलताना पाहायला मस्तच वाटते.हा वृक्ष गूढ वाटतो. बुंधा बराच विस्तीर्ण. 

          आपल्या ह्या धावपळीच्या जगात,हे वृक्ष सावली देतात,क्षणभर विसावा देतात.न बोलता पक्ष्यांचे,कीटकांचे आवाज,कानावर घेत, ह्या वृक्षातून दिसणारी आभाळाची निळाई अंगावर पांघरून दोघी विसावलो होतो. काही क्षणचित्रे घेतली.किती काही बोललो पण समाधान होईना.आमचे असे होतेच....एक विषयातून दुसरा विषय धावत पळत येतो,किती हसलो, मस्त वाटत होते! पण संध्याकाळ हळू हळू हलक्या पावलांनी उतरू लागली बागेत तसे घराचे वेध लागले...

        झाड थोडे नाराज झाले,आम्हाला निघताना पाहून पण त्याचा निरोप घेणे भाग होते.ह्या वृक्षांना आपल्या भावना कळतात म्हणे! त्याला पुन्हा लवकरच भेटीचे वचन देऊन निघालो...घराकडे...

-श्रिया 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ