पहिला हिमवर्षाव ..

त्याचे शुभ्र कण सगळीकडे पसरले.वाऱ्याचा झोत आकाशातून येताना घेऊन आला थंडावा! आज त्याच्या आगमनाचा पहिला दिवस !
आकाश झाकोळून आपण येण्याची आगामी सूचना पाठवून,सूर्यनारायणाचा सुटीचा दिवस म्हणायचा !
काळोख जायलाच तयार नव्हता,जेमतेम सकाळ झाल्यासारखी.
हिवाळा !!! थंडीची जोरदार सुरवात ...किती पटकन थंडी येते इकडे !
उन्हाळा थोडा येऊन जातो,आणि मग आपले वर्चस्व सिद्ध करायला हिवाळा हजर होतो.
रात्र लांबलचक,काळोख 5 वाजता संध्याकाळी,आणि दिवस तसा रजईत दडी मारून बसण्यासारखा! पण थंडी हा इकडचा मुख्य ऋतू,आणि त्याच्या येण्याने फक्त जॅकेट,थंडीचे कपडे,बूट आणि गाडीला स्नो टायर हा बदल अंगवळणी पडल्यागत !
लहान मुलांना स्नोचे विशेष कौतुक! मलाही हा आवडतो,कारण ह्याला ह्याचे एक स्वतंत्र महत्व आहे.रस्त्यात गाड्यांची सगळी मस्ती हा सहज उतरवतो..शिस्त आणि गाड्यांचे कमी झालेले वेग पाहून बेट्याची कमाल वाटते! निसरड्या रस्त्यांमुळे सगळे आपापली वाहने जपून चालवू लागतात,ऑटो ट्राफिक कंट्रोल दिसतो.
थंडीचे वेगवेगळ्या रंगांचे स्वेटर,जॅकेट,हॅट्स,स्कार्फ...लहान गोंडयांच्या स्नो हॅट्स शाळा सुटली कि पाठीवर बॅग घेऊन स्नो मध्ये मनमुराद खेळताना दिसतात.
सकाळची कॉफी भलतीच स्पेशल वाटते,आणि अर्थात गरम कडकडीत पाणी खूप हवेहवेसे वाटते! थंडीतली सकाळ जितकी मस्त तितकीच संध्याकाळ, आळसावलेली! पण मग तिच्यात उत्साह ओतायचा! घरात रंगीत दिवे,संगीत लावून! संध्याकाळ हवीहवीशी वाटेल असे प्रयोग!
थंडी अंगवळणी पडेस्तोवर, मग काय, ख्रिसमसचा नाद आणि खरेदीचे वारे सगळीकडे दिसू लागतील...
-श्रिया (मोना )

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

एक लोभस संध्याकाळ