चिन्मयचा 'किल्ला'
त्याच्या
लहानग्या विश्वात एक खूप मोठे वादळ आलेले असते.त्याचे बाबा जातात.आईची
बदलीची नोकरी.पुणे सोडून,पुण्यातील मामा,मामेभाऊ खूप जवळचा,सोडून
कोकणातील समुद्राकाठी वसलेल्या एका गावात तो आलेला असतो.जागा नवीन,कोकणचा
खारा वारा,कौलारू लहानगे घर,घराच्या
आजूबाजूला नारळीची झाडे,वाडीतले ओहोळ आणि कोकणी पोरे काही उनाड मस्तीखोर.शब्दातली गम्मत त्यातल्या एकाच्या तोंडी 'यक्कु'शब्द घर करून बसलेला.
त्याला वेगळे
वाटते हे सगळे पाहून……….
आपण इकडे का आलो आहोत अशी विचारणा आईकडे होते.त्यात मुसळधार
कोसळणारा पाऊस.चिंब भिजवणारा.ढगांचा गडगडाट आणि खवळलेला सागर,किनाऱ्यावर आदळणाऱ्या उसळलेल्या लाटा.आभाळ पावसाळी ढगांनी माजलेले आणि काळोख दाटलेलं
आसमंत.दूरपर्यंत राखाडी रंगाचे वाटणारे क्षितीज,त्याच्या मनाची घालमेल.पावसामुळे जाणारी वीज आणि कंदिलाच्या प्रकाशात मावळती,पावसाळलेली संध्याकाळ. नवीन शाळा नवीन जग बदललेले ओलेचिंब,एकटे भासणारे.
त्याची आई मोठी धीराची.बाबांच्या पाठीमागे चढाओढीच्या ह्या जगात आपली नाव एकटीने तारलेली. गावात एका दामले आजींचा आधार,काही गोड शब्द आणि मायेची
धीराची भाषा.तिच्या आयुष्यातली खंत कुठे बोलणार आणि आनंद शोधताना किती
कष्ट उपसणार!पण तिचे मनोधैर्य मात्र कायम राखलेले तिने. कामाच्या ठिकाणी
काही चढ उतार ते सुद्धा झेलत,आपल्या मनाचा तोल ढळू न देत प्रयत्न करणारी
खंबीर आई हा लहानगा पाहत असतो.तिचा 'किल्ला' ती एकटीने लढवत असते.
हुशारी आणि शिष्यवृत्ती जवळ असल्याने अर्थात शाळेत दणक्यात स्वागत आणि
स्वभाव मिळून मिसळून वागण्याचा त्यामुळे त्याचे नवे मित्र आणि नवे जग
बनायला वेळ लागत नाही.मित्रांसोबत
समुद्रावरच्या किल्ल्याची सैर आणि पावसाळ्यातले चित्र,त्याची गट्टी जमते
ह्या ४ मित्रांशी,त्या किल्ल्यावरील मजबूत भिंती तशी ती मैत्री हळू हळू
मजबूत होत जाते.आईसोबत पाहिलेला दीपस्तंभ.वादळ वाऱ्यात सापडलेल्या बोटींचा आधार.त्याचे मन हळू हळू रमू लागते नवीन ठिकाणी.
त्याचे नाव 'चिन्मय',आणि चिन्मयने जमवलेले मित्र त्यांची लागलेली सायकलची शर्यत,बघण्यासारखी.
हे वर्णन ऐकून नक्की हा 'चिन्मय' कोण असे वाटू लागले असणारच तुम्हां
सर्वांना एव्हाना,तर हा आहे आपल्या कथेचा नायक,हि कथा चित्रपट 'किल्ला' ह्याची.आईच्या
भूमिकेत अमृता सुभाष.चिन्मयच्या भूमिकेत अर्चित देवधर, आणि त्याच्या
मित्रांच्या भूमिकेत गौरीश गावडे, पार्थ भालेराव आणि इतर…
चिन्मयची भूमिका ह्या लहानग्याने काय वठवली आहे ! चिन्मयचे सुरवातीचे हरवलेले जग त्याची जाणीव त्याच्या मंदावलेल्या हास्यातून जाणवते,किल्ल्यात हरवल्यानंतर मित्रांवर रागावणे,आईने दुचाकी भेट म्हणून दिल्यानंतर दाखवलेला चेहेऱ्यावरील आनंद,सगळे आपल्या अभिनयातून जिवंत केले आहे ह्या ११ वर्षाच्या चिमुरड्याने.अमृता सुभाष ह्यांचा अभिनय नेहमीसारखा,सहज सुंदर !इतर लहान कलाकारांनी पण खूप छान अभिनय केला आहे. ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक अविनाश अरुण ह्यांनी खरच प्रत्येकाची
मनोभूमिका सुरेख मांडली आहे. तुषार परांजपे आणि उपेंद्र सिंधये ह्यांनी
लिहिलेले संवाद अप्रतीम … मनाचा ठाव घेणारे !
'किल्ला' खरेतर मला वाटते एक रूपक आहे.माणसाच्या
' मनाचा किल्ला'.त्याच्या आजूबाजूला कितीही बदल घडले तरी तसाच न भंग होता,त्याच्या भक्कम भिंतींना सावरत,आले गेलेल्यांचे स्वागत करत,त्याच्या
आरपार शब्द न जाऊ देता,भेगा जरी पडल्या तरी त्याबद्दल चकार शब्द न काढता,
इतरांचे मनोबल वाढवणारा!
चिन्मय त्याच्या लहानग्या विश्वात.बाबांच्या अचानक जाण्यामुळे त्याच्या किल्ल्याला पडलेला तडा,ते दुखः जेंव्हा त्याच्या चार मित्रांपैकी एकाला सांगतो,मित्र सहजपणे बोलून जातो कि त्याचे आईबाबा जे त्याला आठवतही नाहीत,एका बस अपघातात दोघेही गेले तो लहान असताना आणि आता तो आजीकडे असतो.स्वतःच्या लहान वयातील एव्हड्या मोठ्या आघाताबद्दल हा त्याचा मित्र सहज सांगतो पण चिन्मय अवाक होतो,त्याच्या आयुष्यात आई आहे,आणि मित्र पोरका असून,मित्राच्या आनंदी वृत्तीकडे तो पाहू लागतो.
ह्या चित्रपटातील प्रसंग खूप काही शिकवून जातात.अर्थात चित्रपट
पाहण्यासारखा आहे त्यामुळे सोडू नकाच !प्रसंगांची मांडणी,सादरीकरण,कोकणचा
सुंदर परिसर,हिरवळ,किल्ला आणि त्याचे ते पावसाळ्यातले धुंद करून टाकणारे
दर्शन,शर्यतीसाठी मोकळ्या काळ्याभोर रस्त्याला एकाबाजूने निळ्याशार सागराने साथ दिली आहे आणि दुसऱ्याबाजूला चित्रपट पाहणारे आपण आणि सोबत कॅमेऱ्याची कमाल!! लॉंग शॉट सुंदर!
आता आणखीन जास्त सांगत नाही कारण संपूर्ण चित्रपट पाहणेच योग्य ठरेल!
मला मुळात कोकण भूमीवर छायांकन केलेले,कोकणच्या पार्श्वभूमीवर घेतलेले चित्रपट नेहमीच आवडले !
हा
चित्रपट सर्वांनी पाहण्यासारखा वाटला.चित्रपटाला मिळालेले बक्षीस खरच
सार्थ वाटते.नेहमीचा मसाला चित्रपट नाही तर उत्तम कथा आणि थोडक्या वेळेत
पण सुरेख संवाद आणि प्रसंगांची मांडणी करून उभा केलेला हा 'किल्ला' नक्कीच
पाहण्यासारखा आहे !ह्या चित्रपटाची एक झलक इकडे पहा…
-श्रिया (मोनिका रेगे )

खरंच छान आहे चित्रपट, छान लिहिलय चित्रपटाबद्दल...
उत्तर द्याहटवाआपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद इंद्रधनू . :)
उत्तर द्याहटवा