दीपोत्सव...
दीपोत्सव! आपली सर्वांची अशी दिवाळी !
घराघरात उत्साहाचे सणासुदीचे वातावरण,गोडाधोडाचा जिन्नस,हसरे समाधानी चेहेरे,नवे कपडे,घराला नवा रंग,दारात रांगोळीचा थाट, सर्वत्र उदबत्यांचा घमघमाट. पाहुण्यांची वर्दळ आणि आपुलकीची लाट,सगळीकडे उसळणारे हास्य.
पणत्यांची भिंतीवर सुंदर रांग,हलक्या तेवणाऱ्या ज्योती,त्या पेटत्या ठेवणाऱ्या इकडे तिकडे धावत आपापले सुंदर कपडे सावरत फिरणाऱ्या ललना.
फटाक्यांचे दुरून येणारे आवाज, हवेत भरून राहिलेले,किती तरी वेळ दिवाळीची जणू साद घालणारे.
उंच इमारतींवर केलेली रोषणाई,प्रत्येक बाल्कनी आपापली दिवाळीची गोष्ट रंगवून सांगते आहे जणू!
शहरेच्या शहरे अश्या लक्ष दिव्यांनी झगमगत,मिठाईची दुकाने खास सजवलेली.
रस्ते गजबजलेले,नवे पाहुणे आलेले.दिवाळीच्या रूपाने सगळ्या वेदना,कष्ट विसरून लहान थोर,गरीब श्रीमंत सगळे एकाच आनंदात न्हाहून निघाले आहेत जणू !
गावाकडची दिवाळी वेगळीच ! थोडीशी मोकळी ढाकळी,शहराचा साज इकडे नाही पण साधेपणात साजरी केली जाणारी.तोच उत्साह पण लहानश्या कौलांतून डोकावणारा! पहाट इकडे जरा लवकर उमलते आणि कढत चुलीवर नाहीतर बंबावर गरम केलेल्या पाण्याने अभ्यंगस्नान घडते.पहिला फटाका,पहाटे पहाटे फुटतो.अंगण नवीन सारवलेले,स्वच्छ.ओटीवर रांगोळी घालून उदबत्ती दरवळत असते. गावातील देऊळ दिवाळीसाठी नटते.फराळ,घराघरात सगळे जिन्नस बनतात आणि त्यांची मुक्तहस्ते देवाणघेवाण घडते.साध्या आग्रही वातावरणांत,आलेल्या पैपाहुण्याची विचारपूस करण्यात येते,स्वागत होते.
इकडे परदेशात आल्यावर दिवाळीला आठवणीतून बाहेर काढून किती तरी वेळा अनुभवले आहे,तशीच्या तशी इकडे नाही दिसत ती ! अर्थात प्रयत्न असतो,दिवे असतात,फराळहि असतो पण तरीही ते दिवाळीतले वातावरण,आपल्या मायाभूमितले पुन्हा पुन्हा अनुभवावेसे वाटते हेच खरे !!
ही दिवाळी माझ्या ब्लॉगच्या सर्व वाचकांसाठी सुख समृद्धी यश आणि दीर्घायुष्य घेऊन येवो अशी सदिच्छा व्यक्त करते!!
- श्रिया (मोनिका रेगे )
- श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा