गुलमोहर


बाल्कनीत बसून,निवांत कॉफीचा घोट घेत,समोरच्या गुलमोहराकडे पाहत तिचा वेळ जात होता.आज रस्ता,तिच्याच सारखा निवांत होता.गुलमोहराचा बहर ह्या वर्षी पण नेहमीसारखाच! गच्च सोनेरी तांबूस बहरलेला तो,तिच्याकडे पाहत होता जणू! त्यांची ओळख ४ वर्षांची,पण तरीही दर वर्षी,तो तिला तितकाच बहारदार दिसतो.आधीच्या जागेत असाच गुलमोहर होता पण मागील दारी,तिला आठवले.
आज रस्त्यात ठरलेली मंडळी walk घेताना दिसत होती.कंटक आजी आजोबा नेहमीसारखेच बाकावर बसून गप्पा मारत.कोपऱ्यावरची टपरी आज मात्र बंद दिसत होती.शाळेची वेळ टळून गेल्याने पोरांची गर्दी नव्हती पण काही महाविद्यालयातील मंडळी आपली उगाचच इकडे तिकडे भरकटलेली.

कुकरची शिटी झाली,ती पण ठरलेल्या वेळीच होते.सगळे काही घड्याळावर धावते,आणि तिलाही खेचते सोबत.आज तिने कधी नाही ती गर्द गुलाबी साडी नेसलेली.तो सकाळी ऑफिसला जाताना पाहून गेला होता.तिचे नटणे त्याला आवडायचे तसे,पण काहीसे सवयीचे.तिला मात्र रोज काही नवे घडावे अशी उर्मी.
तसे तिच्या आयुष्यात घर संसार,काही जिवलग मैत्रिणी,आणि नातेवाईक.तिची चित्रकला कुठेतरी अडगळीत गेल्यासारखी.शाळेत स्पर्धेत अनेक बक्षिसे मिळालेली,नुसतीच कपाटात पडून.जे जे ची डिग्री असूनही,बरच काही करायचे राहून गेले असे वाटले तिला.

बाल्कनीत दोन कबुतरे आली उडून.जोडीने कशी फिरतात न ही मंडळी! नेहमीचे उडणे आणि भुर्रकन कुठेतरी विसावणे आणि मग तासंतास इकडे तिकडे लुक लुक बघत मान वेळावत,पंखांची हालचाल करत,हळू हळू आणि मग अचानक जलद धावणे.ह्यांना भीती अशी तिची कधी वाटलीच नाही.तिला ओळखू लागलेली दोघे.त्यांचे तिथे येणे सुरवातीला तिला नकोसे वाटले,उगाचच घाण करून ठेवतात! पण मग तिचे अनेक वेळा फटकारून सुद्धा जणू त्या बाल्कनीवर त्यांचा देखील तिच्याच इतका अधिकार आहे असे काहीसे दाखवत तिच्या विरोधाला नाकारत,जेंव्हा ही मंडळी ठराविक वेळेला उगवू लागली तेंव्हा तिनेही मग जरा मांडवली केल्यासारखे केले होते.

भाजीवाली आणि धोबी येउन गेले.अगदी न चुकता घासाघीस करणारी भाजीवाली आज जरा शांत होती.तिला भाजीवालीचे नवल वाटले,का असेल आज ही शांत? काहीच चौकश्या नाहीत,शेजारच्या टेंभेबाईंच्या चुगल्या नाहीत,स्वतःच्या घरची हालहवाल नाही,कमालच झाली! ही आपली नेहमीची भाजीवाली आहे न? असा प्रश्न देखील पडला तिला.मग असेल काही कारण म्हणून,तिने दिले ते पैसे घेऊन जेंव्हा ती चालती झाली,तिला थांबवले नाही. लखन धोबी नेहमीसारखा पान खात आला. हा मात्र अगदी तसाच,त्याच्या पानाचा कपड्यांच्या रंगावर कधी परिणाम झाला नाही ह्याचे नवल तिला नेहमी वाटायचे.एक हरवलेला जुना शर्ट ह्याचा,धोबीच्या अंगावर दिसला तिला.तरीच! किती दिवस घरी सापडत नव्हता,तिने,"नवा शर्ट का रे?"असे विचारताच' साहेब चरकले,जाऊदे,एक वेळ सोडून देते,तिने स्वतःच्या मनाला समजावले.

स्वयंपाक आवरला होता,दुपार झाली म्हणून एकटीनेच जेवण करून घेतले.हे दुपारचे जेवण जीवावर यायचे तिच्या! नंतरचा कार्यक्रम म्हणजे पुस्तक वाचन,आज त्याचा कंटाळा आला.आता बाल्कनीत बसण्याचेही नको वाटत होते,घर आवरायला घ्यायचे का असा विचार मनात येत होता.तिला आता कोपरान्‌ कोपरा पाठ झालेला.घर नीटनेटके ठेवणे तिला आवडायचे,ती अगदी मन लावून ते करू लागली.घरातली एक खोली, पाहुण्यांसाठीची,त्यातले कपाट जरा छान लावावे म्हणून एक खण उघडला,हा अनोळखी का वाटतो आहे?कारण ह्या कपाटात जुन्या आठवणी दबा धरून बसलेल्या असतात आणि ती त्यांच्यापासून काहीशी लांब पळते,म्हणून हा खण तिने नव्यानेच आज उघडला,एक एक वस्तू बाहेर येऊ लागल्या.जणू आठवणी सांडू लागल्या! त्यात एक वही आली,तिच्या हातात.

हिचे प्रत्येक पान म्हणजे तिची एक आठवण,तिने ती वही घट्ट मिटून टाकली आणि,आणि पटकन  कपाटाकडे पाठ केली.तो यायला अजून २ तास अवकाश होता."काय हरकत आहे जरा जुनी पाने उघडून बघायला?"तिने स्वतःलाच विचारले.किती लांब निघून आलेली ती!आत्मविश्वास कमी झाला आहे का? त्याच्या धावत्या जगाची साथ करत करत स्वतःला हरपून बसलेली.तो नोकरी करत,बदलीची नोकरी,एक ठिकाण नाही,नवीन जागा नवे शेजारी नवे शहर,पण तिचा दिनक्रम काही बदललेला नाही.संध्याकाळी मुले घरी आली कि मग तिच्या विश्वात असलेला दिवसभराचा संथपणा एकदम गायब होणार पण,तो तेव्हढ्याच पुरता.

तिची पाऊले अलगद परत कपाटाकडे वळली कधी,लक्षातच आले नाही तिला! जुने फोटो सापडले,काही पत्र,काही चित्र, अन त्यांच्या सोबत हळू हळू उलगडत जाणारा भूतकाळ,किती लांब पळणार त्याच्यापासून,असे तिला वाटले! किती छान कविता करायची ती! शाळेत असताना बाईंनी कौतुक केलेले आठवले तिला.त्या वहीत तिच्या त्या हरवलेल्या कविता,तिच्या हरवलेल्या दिवसांची आठवण घेऊन बसलेल्या.एक एक कविता डोळ्याखालून घालू लागली ती.प्रत्येक तारीख,दिवस,तिचे दिवस,फक्त तिचे,धावपळीच्या जगासोबत धावताना मागे राहिलेले.पुन्हा एकदा कविता लिहिण्याची इच्छा होऊ लागली तिला,शब्द सुचू लागल्यासारखे वाटू लागले,डोळे एकसारखे भरून येऊ लागले.

आवरले पाहिजे आता,चार वाजत आले,तिच्या मनात येउन गेले.तो यायची वेळ झाली काहीतरी छान खायला बनवूया,त्याचे आवडते असे! ही साडी नको,गेल्या वर्षी लग्नाच्या वाढदिवसाला दिलेली नेसते असा विचार करत ती उठली देखील.पटकन केस विंचरले,साडी बदलून,त्याची आवडती चंदनाची उदबत्ती लावताना एक वेगळाच उत्साह तिला वाटू लागला.किती दिवसांनी तिने नक्षत्रांचे देणे ची cd लावली.आज तिची कविता परत एकदा तिला भेटणार होती,असे काहीसे शब्द मनात गर्दी करू लागलेले. त्या कपटाने,त्या वहीने केलेली जादूच आहे जणू! परत बाहेर बाल्कनीत आली.त्याची वाट बघणे आणि मग तो गाडी लावताना तिच्याकडे हात करत हलकेसे हसून जेंव्हा पाहतो,ते तिला भारीच आवडते!आता रस्ता परत एकदा उत्साहाने धावू लागलेला.तिला एकदम तिची वही हवी झाली,पळत जाऊन पटकन घेऊन हातात स्फुरलेली एक कवितेची ओळ तिने वहीत सांडली! गुलमोहर अजूनच बहरला!
-श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ