'TIME प्लीज'....
"Time please"……"अहं मी लेखाच्या सुरवातीलाच विश्रांती घेत नाहीये काही! लेख लिहून नक्कीच पूर्ण करणार आहे."खरेतर एखादी कथा आणि चित्रपटात,ती कथा जेंव्हा जिवंत होऊन समोर येते तेव्हाचे तिचे दृश्य स्वरूप,त्यातील व्यक्तिरेखा,संवाद,प्रसंगांची मांडणी,संगीत,सगळे सगळे किती किती महत्वाचे असते न तो चित्रपट आवडायला.आजकालच्या धावत्या जगात,रोजच्या दैनंदिन आयुष्यातून विरंगुळा म्हणून काहीतरी वेगळे पाहण्यासाठी, चित्रपट गृहात प्रवेश करणाऱ्यांची संख्या कमी नाही.काहीतरी हलके फुलके,स्ट्रेस विसरायला लावणारे,साधीच कथा, उगाच कंटाळवाणी न वाटणारी,आनंद देणारी आणि काहीतरी संदेश देणारी असेल,तर मग काय विचारता!
अमृता आणि ऋषिकेश एकमेकांना भेटतात.ऋषिकेश एकदाचा तिशीला येउन लग्नाला तयार होतो,आणि घरातल्या मावशीला कोण आनंद होतो ! नवीन संसार,नवे घर,एकमेकांना समजून घेण्याचे दिवस.'Arranged marriage'.अमृताचा स्वभाव मोकळा ढाकळा, धमाल गमत्या,आयुष्याला येईल तसे घेणारी अमृता.तर ऋषी त्याउलट,आईवडिलांशिवाय मोठा झालेला ऋषी,नात्यांना जपु पाहणारा, एकलकोंड्या आयुष्यात आलेल्या अमृतावर खूप प्रेम करणारा,तिच्या अल्लड स्वभावाला सामोरे जात,तिला समजुतीचे काही शब्द सांगणारा. ऋषिकेश ऑफिसमध्ये एक कष्टाळू आणि हुशार कर्मचारी.बॉस आणि सहकर्मचारी एकदम खुश अशी व्यक्ती! अमृताकडून काही अपेक्षा करत,घरातील कामांकडे योग्य लक्ष तिने द्यावे,तिच्या वयोगटातील मंडळींसारखे एकसारखे अंतर्जालावर न जाता आणखीनही काही करावे,असे त्याला वाटत असते.
अमृता खेळकर,लाघवी पण ऋषीला अगदी आपल्याच वयाचा जणू आपला मित्रच, म्हणून त्याच्याशी वागणारी.तिचा वेंधळेपणा काही प्रसंगांतून जाणवतो,ऋषीला तिथे त्याच्या रागावर बराच संयम ठेवावा लागतो असे वाटते.'हिम्मतराव',नाव आणि व्यक्तिमत्व एकदम जुळणारे! अमृताचा बालमित्र,तिच्याच्सारखा स्वभावाने. Oxford स्कॉलर,प्राध्यापक,पण त्याचे वागणे आणि इंग्रजी बोलणे हशा पिकवते.असे हे हिम्मतराव 'अम्रेच्या' लग्नाला येऊ शकत नाहीत पण तिच्या नव्या घरी मुक्कामाला मात्र येउन ठेपतात.त्यांचा अजब स्वभाव,वागण्याची पद्धत आणि अमृताशी केलेली सलगी ऋषीला खटकू लागते.त्यांचे मोकळे वागणे त्याच्या शिस्तीत बसत नाही. हिम्मत ऋषीला समजावून पाहतो,"अमृताला एकदम मोठी करायला जाऊ नकोस तिचा स्वभाव समजून घे" ह्या त्याच्या बोलण्याकडे ऋषी साफ दुर्लक्ष करतो.
त्यात ऋषीच्या ऑफिसात येते राधिका.तिचे येणे त्याला अर्थात सुखद आश्चर्याचा धक्का असते.राधिका त्याच्याच फिल्ड मधली्,हुशार कर्तबगार,ऋषीची कॉलेज मधील मैत्रीण.आता सुरु होते गुंतागुंत.ऋषी तिच्यासोबत एक प्रोजेक्ट करू लागतो. अमृताल त्याने हिम्मतला भेटण्यास किंवा त्याच्याशी बोलण्यास मनाई केलेली असते.एकेमेकांच्या एमैल्स चे पासवर्ड घेणे,हळू हळू शंका घेणे अश्या गोष्टी सुरु झालेल्या असताना राधिकाशी परत मूळ धरू लागलेली ऋषीची मैत्री आणि त्यातून निर्माण होते एक नवे वादळ.
चित्रपट कुठेही पकड सोडत नाही.कथा गुंतागुंत निर्माण करते पण तितक्याच सहजपणे ती सोडवली जाते.चित्रपटातील अमृताच्या बोली मराठीत येणारे काही फंडू शब्द आपल्या सर्वांच्या ओळखीचे.अमृताच्या भूमिकेत पूर्ण न्याय देणारी प्रिया बापट,तिचा सुंदर अभिनय.
राधिका म्हणून समोर येते सई ताम्हणकर,राधिकाच्या भूतकाळातील वाईट अनुभवाचे तिच्या मनावर झालेले परिणाम आणि त्यामुळे तिचा बदललेला स्वभाव,तिचे तिच्या आईशी आणि बहिणीशी होणारे वाद,सिगरेट ओढणे आणि चेहेऱ्यावरचा गंभीरपणा ह्यावरून तिच्या आयुष्यात काही घडले असावे,जे दिग्दर्शकाने शेवटी आपल्यासमोर आणले आहे.
ऋषिकेश म्हणून उमेश कामत अप्रतीम भूमिका करतात,डोळ्यातून अवखळपंणा,संताप,उद्विग्नता,पश् चाताप अश्या अनेक भावना ते लीलया व्यक्त करतात आणि अतिशय मनापासून दिलेले स्माईल हा एक plus point त्यांच्या अभिनयाला साथ करतो. अमृतावर मनापासून प्रेम करणारा ऋषी,स्वतःच्या अहंकाराला महत्व देणारा आणि त्यासाठी अतिशय कठोर होऊ पाहणारा ऋषी, तर उलट स्वतःची चूक मान्य करू शकणारा ऋषी म्हणून हि भूमिका छानच केली आहे.
एक वेगळा परिच्छेद द्यावा ह्या लेखात अश्या व्यक्तिचित्राला उभे करणारे सिद्धार्थ जाधव.ह्या चित्रपटातील अमृताच्या घरी लहानपणापासून ज्याचा वावर आहे असा तिचा बालमित्र,'मैत्रीपेक्षा आमच्यात काहीतरी जास्त आहे',असे निर्भीडपणे ऋषिकेशला सांगणारा,आणि तितक्याच शांतपणे त्याच्या आयुष्यातील गुंतागुंत सोडवण्यास मदत करू पाहणारा हिम्मत उर्फ हिंमतराव धोंडे पाटील.ऋषीने केलेला अपमान,अमृताने केलेला अपमान,विसरून दोघांना सावरणारा,गमत्या स्वभावाचा,सर्वांना हसवू पाहणारा,असा अमृताचा बालमित्र म्हणून सिद्धार्थ हि भूमिका यशस्वी करून दाखवतात.
सर्वच कलाकारांचे अभिनय लहानश्या संवादांतून,प्रसंगांतून येत असले तरीही नात्यातील नाजूक धागा,मैत्रीच्या पिसासारख्या हलक्या निरपेक्ष बंधातील गुंतागुंत आणि वैवाहिक जीवनातील उभे केलेले प्रसंग,प्रेक्षकाला विचार करायला लावतात.चित्रपट मस्त जमला आहे! इतर कलाकारांमध्ये सीमा देशमुख अमृताच्या आईच्या,तर माधव अभ्यंकर वडिलांच्या भूमिकेत.वंदना गुप्ते ऋषीची मावशी म्हणून लहानशी भूमिका असली तरी धमाल उडवून देतात.'किती महत्वाचे असते नाते जपणे.सर्वांनाच खुश नाही ठेवता येत हे जरी खरे असले,तरी कधी कधी संसार करताना मुलांच्यासाठी मनाविरुद्ध काही करावे लागते',हे अमृताला शिकवणारी तिची आई,विचार करायला भाग पाडते.
समीर विद्वांस ह्यांचे दिग्दर्शन.'नवा गडी राज्य नवे' ह्या नाटकावर आधारित हा चित्रपट,"Time please love story लग्नानंतरची" नक्कीच पाहण्यासारखा आहे." ह्यातील गाणी पण एकदम क्लास!" < (अमृताच्या शब्दात)
गड्यांनो चित्रपट बघता आला तर सोडू नका !!!
-श्रिया (मोनिका रेगे )
-श्रिया (मोनिका रेगे )

वा काय योगायोग आहे पहा .आजच हा सिनेमा पाहायला आणला आणि त्या आधीच त्याची समीक्षा वाचायला मिळाली म्हणून विशेष आनंद ,दुधात साखर ,धन्यवाद मोनिका
उत्तर द्याहटवाबोलक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रवीण…
हटवा