'वाढदिवस'

        एक दिवस,एका आई बाबांच्या घरी एक लहानगी येते,आणि मग त्यांच्या आयुष्याला खरा अर्थ येऊ लागतो.हा दिवस,त्यांच्या लेकीचा जन्मदिन त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आणि अमुल्य! मग त्या लहानगीचे कोडकौतुक आणि तिच्या बालमनावर संस्कार करत करत तिच्या व्यक्तिमत्वाला आकार देत,हे आई बाबा आपले आयुष्य त्या बाळाच्या आयुष्याभोवती गुंफत जातात. 
ती हळू हळू मोठी होते आणि मग सगळ्या भोवतालच्या जगाची आणि तिची ओळख होते. तिच्या इवलुश्या जगाला आईबाबा अनेक नवे शब्द देतात.शब्दांना अर्थ येतो आणि तिच्या धावपळीला सगळे 'खेळ' म्हणू लागतात. 

       बोबड गीते,रंगीत चित्रांची पुस्तके,गोष्टींची पुस्तके,भातुकलीचे खेळ,चिऊ,काऊ,कुतू आणि माऊ तिच्या लहानग्या विश्वाचे नेहमीचे सोबती बनतात.आजीची माया, आजोबांची शिस्त आणि लहानगे सवंगडी तिला साथ देऊ लागतात. आई बाबांना त्यांचे पिल्लू नेहमी 'गुड गर्ल' असावे असे वाटते. मग येते शाळा.अभ्यासाचे धडे आणि दप्तर पुस्तक पाढे !लहानगी आता हळूच शाळेच्या जगात पाऊल टाकते.भांबावलेले तिचे डोळे आणि इवलुशे हात आईच्या हाताला घट्ट आवळून धरणारे, पाठीवर दप्तर आणि शाळेच्या पहिल्या दिवसाचे आमंत्रण.तिचे स्वप्नाळू, आईच्या कुशीतले जग आता अलगद पंख धरू लागते. 

      नवीन शाळेत नव्या दप्तरात नवी पुस्तके वह्या,डब्यातली भाजी पोळी,मधल्या सुटीतली धमाल आणि गृहपाठाची सुरवात.रोजचा दिवस तिला नवेच नवे काही शिकवतो,शाळेत न रडता आई बाबांच्या शिवाय राहणे,हळू हळू तिची धिटाई वाढवतो.शाळा आत नेहमीची.सुटी,म्हणजे नक्की काय ते तिला समजू लागते.अभ्यास हा पण जो काही सुरु झाला आहे तो, नेहमीचाच सोबतीला राहणार आहे, हे पण तिला समजून येते.परिक्षा,क्लासेस आणि वाढत्या वयाचे वाढते स्ट्रेस. 

      सगळे काही बदलते,हळू हळू मोठ्या जगाची ओळख होत जाते.लहानगीचे शैशव मागे पडून तारुण्यात पदार्पण होते.शिक्षण पूर्ण करणे,ध्येय साध्य करणे,मनासारखी नोकरी आणि उन्नतीच्या वाटा नव्या,नवे स्वप्न उरी बाळगून लहानगी पुढे पुढे जाताना आई बाबा घरातली सगळी वडील मंडळी तिला पाहत असतात. 

      मग एक दिवस येतो,तिच्या भावी आयुष्याचा जोडीदार तिला मिळतो.आई बाबांचे घर मागे सोडून सासरी,नव्या आयुष्याची सुरवात करते लहानगी.आई बाबांना त्या दिवशी खूप एकटे वाटते.त्यांचे बाळ आज खरच पंख फुटून लांब उडून गेलेले असते,स्वतःचे घरटे बनवायला.त्यांच्या सोबत उरलेले असतात,तिच्या आठवणींचे फोटो अल्बम,तिच्या सोबत घालविलेल्या क्षणांचे चित्र डोळ्यात अधून मधून उभे राहत असते. त्यांच्यासाठी तिचा आनंद हाच महत्वाचा असतो. 

     किती मोठे मन असते अश्या सगळ्या आई बाबांचे! त्यांच्या लेकीला,लहानग्या पिल्लाला इतकी वर्ष सांभाळून वाढवताना,पुढे येणाऱ्या ह्या एका दिवसाची तमा न बाळगता,मन घट्ट करून पुढे जाताना कधीही आनंदच ते तिच्या साठी साठवत राहतात. 
नाहीका? 

    त्यात जर हि लहानगी आता परदेशात जाऊन बसली असेल तर मग मात्र त्यांना तिच्याशी बोलण्यासाठी,प्रत्यक्षात भेटण्यासाठी तिच्या मायदेशी परत येण्याची वाट पहावी लागते.तिचा आवाज दूरध्वनीवर ऐकून त्यांचा आवाज कातर झालेला जाणवला आहे तिला. 
लहानगी आज हा लेख लिहिताना खूप हळवी होते आहे कारण तिला ह्या वाढदिवशी तिच्या आई बाबांची खूपच आठवण येते आहे.मन कधीतरी त्यांनी जपलेल्या तिच्या पहिल्या वाढदिवसाचा फोटो अल्बम आठवते आहे तर कधी तिचे साजरे केलेले,काही वाढदिवस डोळ्यापुढे येत आहेत. 

    आईबाबांनी तिला वाढदिवसाचे छानसे भेटकार्ड पाठविले आहे,ज्यातून नुसते शब्दच नाहीत तर भावना देखील तिज पर्यंत येउन पोहोचल्या.त्यांच्यासाठी हा दिवस किती महत्वाचा आहे हे तिला शब्दात सांगणे कठीण होते आहे . 
घरात सर्वांनी भेटवस्तू दिल्या,खूप आवडल्या पण सर्वात काय आवडले तर आई बाबांनी प्रेमाने पाठविलेले हे वाढदिवसाचे 'भेटकार्ड'.घेऊन आले माझ्या मायदेशातून, त्यांचे अनेक आशीर्वाद आणि शुभेच्छा,माझ्यासाठी,त्यांच्या लहानगीसाठी !
 -- श्रिया (मोनिका रेगे)
           
                                                                                                                                     

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

एक लोभस संध्याकाळ

पहिला हिमवर्षाव ..