गंधस्मृती
ह्या घरात रहायला आल्यापासून उंच इमारतीतून दिसणारे जग, एकदम जमिनीच्या पातळीवर आल्यासारखे भासू लागले आहे.दार उघडून पटकन बाहेर उडी मारली कि घरासमोरचा लहानगा रस्ता,दुतर्फा उंच झाडे असलेला.सदाहरित असे हे वृक्ष आणि सतत सावली आणि थंडावा जपून ठेवणारे.आता निसर्ग ‘एका दारापलिकडे’ असेच काहीसे वाटू लागले आणि त्यात वसंताने तर सगळे काही बहरवून टाकले आहे ह्या वर्षी.बघावे तिथे रंगबिरंगी फुले आणि फुलपाखरे.
अशीच कोपऱ्यावर नेहमीचा फेरफटका मारायला बाहेर पडलेले.माझे घर डोंगरावर असल्याने चढ उताराच्या रस्त्यांचे साम्राज्य सगळीकडे.नवा रस्ता दिसला आणि त्यावर पाऊल टाकले.बंगलीवजा घरांचे वेगवेगळ्या रंगाच्या छपरांचे,दरवाज्यांचे,सुंदर बागीच्यांचे निरीक्षण चालले असताना अचानक एक अतिशय मंद सुगंध आला.कुठून येत आहे ते कळेना.मोहक आणि स्वतःकडे खेचून घेणारा असा हा दरवळ मला बरीच वर्ष मागे घेऊन गेला.गंधांचे एक आगळे वेगळे जग,कुठे कसे अचानक भेटेल सांगता येत नाही.आणि भेटले कि मग आपली पाऊले जागच्या जागी खिळलेली आणि मन मात्र आठवांच्या असंख्य दऱ्या ओलांडून कुठल्या कुठे गेलेले असते.
मला भेटलेला तो गंध कुठून येत होता तो शोध घेऊ लागले पण,समोर असे काहीच नव्हते.मग विचार केला पाठी वळावे आणि उगम सापडेल,आज नाही तर उद्या,उद्या नाही तर परवा.असे तीन दिवस गेले रोज संध्याकाळी हा प्रश्न आणि तो सुगंध घेऊन मी आपली त्या रस्त्यावर उत्तराची वाट पाहत फेरी मारायचे.
एक माझी शेजारीण तिच्या श्वानाला घेऊन तिथून जात होती तिने माझ्या चेहेऱ्यावरचे प्रश्नचिन्ह पाहिले असावे.थोडा वेळ इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी तिलाच विचारून टाकले तर म्हणाली कि,हा सुगंध एका फुलाचा आहे नाव आहे 'ओरिएनटल लिली' आणि इकडेच कोणत्यातरी घरापाठ्च्या बागेत हे झाड बहरलेले असावे आणि कदाचित एकापेक्षा जास्त झाडे असतील म्हणून हा मध्येच येणारा सुवास मग आपले निरोपाचे भाषण करताना म्हणाली,"तुला आवड दिसते सुगंधाचीं!"तिला म्हंटले,"कोणाला नसते?"
हा सुगंध मनाच्या कोपऱ्यात साठून राहतो,अगदी खोल दडून राहतो,आपल्याला पाठ नसतो पण त्याच्या अस्तित्वाची मनात एक रेख उमटलेली असते कधीतरी.घरी येत येत अश्या अनेक मधुर सुवासांची आठवण आली
लहानपणी बंबाच्या धुराचा कोंडलेला वास,हा एक वेगळाच पहाटेचा अनुभव देऊन जाणारा.धुरात बसून केलेली लहानपणची दंगामस्ती चालणारी आंघोळ,अर्थात आई घालत असल्याने कितीही वाटले तिथेच रेंगाळावे तरी ते शक्य नसायचे.पाणी जपून वापरायचे कारण साठवलेले असायचे घंगाळात.वाडीत येणारा ओल्या सुपारीचा वास.फणसाचा गरयांचा वास.पोटात मग हळूच फणसाची भूक यायची.जिन्यावरून धावधावीचे जे खेळ चालत त्यात पावसामुळे सगळीकडे ओलसरपणा,ओली भिंत,लाकडी जिने ओले, त्यांना एक वास असायचा,तो जिन्यात अडकलेला आहे असेच वाटायचे अगदी खेळताना तो वास सोबत असायचा .
नव्या साबणाचा नवा वास,जरी साबण कितीही ओळखीचा असला तरी दर वेळी त्याचे नवे वेष्टन काढले कि नवा कोरा आणि नव्याच सुगंधाचा! उटण्याचा गंध,त्यातून आली दिवाळीची आठवण.ती पहाट वेगळीच कारण एक चंदनाचा दरवळ,मोती साबण घेऊन यायचा.गोडूस फराळाचा वास.फटाक्यांचा धूर आणि त्याचा एक फटाकडी सुगंध,पण खूप धूर करणारे फटाके नसत तरी सगळीकडे तो वास दिवाळीचे अस्तित्व दाखवत दिवाळीचे सगळे दिवस साठलेला असायचा .
चाफ्याचा वास हा लहानपणी खूपच आवडायचा मला.शाळेजवळ चाफा खूप.शिवाय मधल्या सुटीत चिंचांचे,बोरांचे,गरम तळलेल्या भजी,वड्याचे,शेंगदाणे,चण्या फुटण्याचे असे खूप सारे ओळखीतले गंध होते.माझी एक मैत्रीण केसात मोगऱ्याची वेणी घालायची.आमच्या लहान विश्वात असलेला तो सुवास आता कधीही मला आला कि,शाळेचे ते दिवस परत घेऊन येतो.घरामागील रातराणी आणि तिचा तो मंद गंध…तो विसरून कसा चालेल!
शेजारी आंबट गोड वरण,कधी माश्याचे कालवण,कधी मटण त्या कौलारू घरातील मागल्या बैठ्या स्वयंपाकघरातून चुलीच्या धुरासोबत हे गंध अलगद तरंगत तरंगत आम्हां मुलांच्या नाकापर्यंत येत आणि पोटात कोण भूक लागायची, मग आपापल्या घराकडे पळापळ असायची.रविवार दुपारची सुटीची,कललेली उन्हे आणि घरात उदबत्तीचा सुगंध.घराचा जिना चढताना मनात आज आईने काय खास बनवले असेल आणि त्याचा येणारा हलकासा गंध, स्वयंपाकघराकडे आम्हाला खेचून न्हेणारा…
देवळातली एक वेगळीच उदबत्ती. मुख्य म्हणजे इतक्या साऱ्या एकाच वेळी लावलेल्या असत. सगळे देऊळ सुवासाने भरलेले शिवाय त्यात फुलांचा सुवास तो वेगळा!मन शांत आणि प्रसन्न होऊन जायचे.दिवेलागणीची वेळ आणि मालकांच्या घरात ओटीवर दरवळणारा धूप…असे अनेक सुगंध भेटले ह्या प्रवासात,अजूनही सापडतात. मनात कदाचित जे खूप सारे कप्पे आहेत त्यातला एक खास कप्पा ह्या 'गंध संहितेसाठी' असावा. मोठे होता होता मागे अनेक गोष्टी सुटून गेल्या,राहून गेल्या,'हरवून' नाही म्हणणार कारण, तश्या त्या ह्या अनेक गंधातून अचानक येउन भेटत राहतात मनात.
नव्या कोऱ्या पुस्तकाचा एक वास असतो,शाळेच्या पहिल्या दिवसालाच एक वास असतो.शाळेच्या स्नेहसंमेलनाचा,धमाल वातावरणाचा,सुगंध वेगळा.जत्रेत सापडणारा,गोलगोल उंच मेरी गो राउंडवर सापडणारा गंध वेगळा.लग्नात,पंगतीत येणारा एक नवा नवखा,उत्साहाचा गंध.मुंबईला सुट्टीत काकांकडे गेलो असताना बालनाट्य पाहायला जायचो तेंव्हा त्या वातानुकुलीत थंड गार,लाल लाल गालीचा अंथरलेल्या नाट्यगृहाचा सुगंध वेगळाच!
आई बाबांच्या कपाटात येणारा डांबराच्या गोळ्यांचा गंध.लहानपणी कपाटात शिरून मस्ती करणे हे आम्हां मुलांचे खेळ झालेले. कपाटाचे एक दार उघडे ठेवून दुसऱ्या दारापलीकडे लपणे, त्या लपंडावात त्या कपाटाचा तो गंध नाकात शिरला आणि आज जेव्हां कपडे धुताना डीटरजंटचा गंध येतो तेंव्हा पुन्हा एकदा स्मृती जाग्या करतो!
इकडे सापडतात ते परफ्युम,सुंदर आकाराच्या काचेमागे दडलेले सुगंध.पॅरिसला एकदा,भारतदौऱ्या दरम्यान विमानतळावर जो काही थोडा वेळ हातात होता तो सत्कारणी लावला,एका परफ्युम स्टोर मध्ये गेले होते.अनेक वेगवेगळ्या सुंदर प्रदर्शनीय काचेच्या कपाटात बसलेले गंध ह्या वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या सुरेख काचेच्या बाटल्या,त्यांची तितकीच सुंदर चित्रकारी केलेली रंगीत वेष्टने मनाला मोहवून टाकणारी.मी काही ट्राय करून पहिले, माझ्या इतक्याच हौंशी मंडळींनी ते दुकान गजबजलेले होते. कोणी किमतीचे आकडे पाहून कुजबुजत होते तर कोणी खरेदी पूर्ण करण्यासाठी काउंटरकडे प्रस्थान करते झालेले, मी मात्र त्या सुवासाच्या दुनियेत थोडा वेळासाठी हरवून गेले होते, अर्थात हळूच काळाचे वेळेचे भान आपल्याला परत आपल्या जगात घेऊन येतेच! पण हे सर्वत्र दरवळणारे सुगंध त्या नुसत्याच प्रदर्शनातल्या परफ्युमच्या बाटल्याहून अधिक त्या दुकानाची शोभा अजूनच वाढवत होते असे वाटले….
माणसाला ही 'गंध स्मृती' नसती तर! किती साऱ्या आठवणी पुन्हा एकदा समोर आल्या नसत्या.आजकालच्या धावपळीच्या ह्या जगात,किती काही घडत असते प्रत्येकाच्या आयुष्यात.काही स्मृती डोळे पाणावून सोडणाऱ्या तर काही आनंद निर्माण करणाऱ्या! पुढे पुढे जाताना जर कधी एखादा सुगंध,थोडा विसावा देऊन गेला तर। थोडे मागे घेऊन गेला तर! क्षणभर विश्रांती नक्कीच घेत येते न !
-श्रिया (मोनिका रेगे )
chhan lekh ! mast ramleli distes,,
उत्तर द्याहटवारोहिणी ताई तुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
उत्तर द्याहटवाखूपच छान लिहालायेस मोनिका ,आणि तुझ्या लिखाणावरून तुला तुझे नवीन घर खूप आवडलेले दिसतंय छान ,या लेखामुळे माझ्याही गाताकालींच्या आठवणीना उजाळा मिळाला ,तो प्राजक्ताचा सडा ,अबोलीच्या माळा आणि हो आईसाठी खास बकुळीची माळ करण्यासाठी सर्व मित्रांची घाई असावयाची सकाळी सकाळी
उत्तर द्याहटवाआपल्या विविध रंगानी ,अदभुत सुगंधानी आणि अद्वितीय रूपांनी भाहारलेला आपला गाव आठवला ,खूपच आभारी आहे मी या लेखासाठी तुझा
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद प्रवीण.
हटवा