एक कप चाय हो जाये!



                                        
      मला चहा कधी पासून आवडतो,नीटसे आठवत नाही.आई सांगते,मी लहान वर्षाची असताना,
एक किंवा दोन चहाचे थेंब दुधाच्या मगात घालून,आजी चहाचा भास निर्माण करायची अन मला चकवायची.मला तो चहा वाटायचा आणि आवडीने त्यात बिक्की बुडवून स्वाहा व्हायचे.घरात लहानपणी दुध पिणे अगदी आपल्या चार चौघांच्या घरात नियम म्हणून असते तसे होतेच! मला तरीही चहाच आवडला.

        मी लहानपणापासून चहाशी जी मैत्री केली ती आजतागायत टिकली आहे.अजुन ही काही 'चायमय' झालेले प्रसंग आठवतात.बाबांच्या मित्रमंडळाचे 'संगीताचे कार्यक्रम'.आपापली कामे आवरून,साधारण सात वाजेपर्यंत सगळी मंडळी घराच्या खालच्या खोलीत जमत.मेहेफील मध्ये तबला,पेटी,तंबोरा,इत्यादी वाद्यांचा समावेश असे.साधारण सहा ते सात संगीतप्रेमी ठरलेल्या दिवशी एकत्र जमत.माझ्या शालेय जीवनात अभ्यास,खेळ आणि इतर गोष्टी ह्या एक दिवसीय,दर आठवड्यात हजेरी लावणाऱ्या कार्यक्रमामुळे  संगीतमय होऊन गेले होते.ह्या सर्व गायक गायिका,हौशी कलावंत,कार्यक्रमामध्ये जो ब्रेक घेत,त्यामध्ये 'चहापानाचा' लहानसा,हसत खेळत कार्यक्रम जोडीला होत असे.आल्याचा चहा,किंवा मसालाचाय ची फरमाइश असायची आणि त्या चवीला तोड नाही! बाबांनी ही खालची खोली खास संगीत मेहेफील वाटावी अशी ठेवली होती.गीत गायनाचा आस्वाद कान घेत आणि चहाचे गरम घोट एकदम तजेला निर्माण करत.
       
      आमच्या महाविद्यालाचे कॅण्टीन,तिकडे मिळणारी गरम भजी आणि कटिंग कशी विसरता येईल!तिकडे गप्पांचा कट्टा आणि चाय ह्याचे मस्त गणित जमले होते.चहाला,'चाय','चा',अशी ऐकीवातली  नावे आणि हल्लीच एका मराठी मालिकेत नवा शब्द समानार्थी कानावर आला, "कशाय पेय".
     
      आपल्या इतकाच किंबहुना जास्त आवडीने चीन मध्ये चहा घेतात.माझी एक चायनीज मैत्रीण त्यांच्या चहापानाबद्दल आणि चहा वरील प्रेमाबद्दल सांगत होती.जगभरातली चहा ह्या पेयाची प्रसिद्धी आणि वेगवेगळे चहाचे प्रकार पाहता मी देखील काही घरी बनवून पाहिले.'ग्रीनटी' तब्येतीसाठी चांगला हे तर आज बऱ्याच लोकांना माहित आहे.काही हर्बल टी पण चव घेऊन पाहिले.कॅमोमील,पेपरमिंट शिवाय,आयरिश ब्रेकफास्ट टी,इंग्लिश ब्रेकफास्ट टी,अर्ल ग्रे टी ह्या सगळ्यांची चव त्यांच्या त्यांच्या जागी असेल चांगली पण, आपला भारतीय चहाच जास्त भावला ती चव अशी मनात आणि जिभेवर रुळली आहे कि काय बोलता!टाटा चाय,ग्रीन लेबल,इंडिया टी,लिपटन चहा,इकडे भारताबाहेर येउन देखील सुटला नाही.नेस कॉफी,चायच्या खालोखाल पटली पण';मद्रासी काफी' जास्त आवडली.
       
      मुसळधार कोसळणारा पाऊस अन गरम वाफाळणारा चहा आणि भजी हा योग जुळवून बघा.कॉलेज मधून येताना पावसाच्या माऱ्याने चिंब झालेल्या मनमोराला एक कप चहा रेडीमेड मातोश्रींकडून मिळाल्याचा आठवतो,त्या गरमागरम चहाने ओल्याचिंब  थंडीला पळवून लावलेले असायचे.मग माझ्या एका मैत्रिणीचे बघुन चहा बशीतून पिऊ लागले,गरम बशीतून भुरभुरत,निवणारा चहा घेण्यात आणखीन एक मजा आहे!
       
     मला सुंदर,सुंदर 'टी सेट'जमवायला आवडू लागले.पण जागेचा अभाव आणि उगाच पसारा,अश्या काही टिका ऐकल्यावर खरेदी करता आपले सहजच एक फेरी क्रोकरी स्टोरकडे असते..चहाच्या कपांचे सुंदर आकार आणि विविध रंग,त्यावरील  नक्षीकाम,फुले आणि फुलपाखरांची चित्रे नुसतीच पाहून मन प्रसन्न होऊन जाते.
      
    सकाळी गरम चहाचा घोट घेत वर्तमानपत्र वाचणे असो,किंवा इराण्याच्या हॉटेल मधला कटिंग असो,
"चाय तो चाय है बाबा,क्या एक कप हो जाये ??"

- श्रिया (मोनिका रेगे )

छायाचित्र साभार जालावरून
             
                 
   
                                                                                                                                                               

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ