चुरमुरा
आज चुरमुर्यांचा चिवडा बनवताना परत एकदा मला एक परकरातली चिमुरडी दिसू लागली.तिच्या इवल्याश्या चिमटीत एक एक चुरमुरा पकडून वाटीत टाकून,मग परत सगळी वाटी उलटी पाडून सांडलेले चुरमुरे...एक एक चिमटीत धरून उचलून खाणारी.दोन लहान शेंड्या बांधलेली,आठवू लागली.छानसा परकर पोलका तिचा,मळलेला साफ कारण,दिवसभर जमिनीवर खेळ,आणि स्वयंपाक,तो पण भातुकलीची बोळखी घेऊन आणि प्रत्येक लहानग्या वाटणाऱ्या पातेल्यात,जे तिचे 'मोठे भांडे'..तिच्या शब्दात "मोत्थे पातेले" सगळ्यात काही न काही बनत असायचे.सतत शिजत असायचे.
चुरमुर्यांचा भात,इवलूसे पाणी घालून इतका छान मऊ शिजायचा तर कधी एकदम गुरगुटला होऊन पानात यायचा.'वनन डाळीचे' अगदी गरम..गरम हं! ..हळुवार,भुरके न मारता,आवाज न करता प्यावे लागायचे.डाळ अलगद जर वेचू लागले कोणी,तर दटावणी यायची "दाल खायची अश्ते..वेचायची नाही."आईने दिलेल्या पीठाचे चिकट पोळे,लहानग्या पोळपाटापेक्षा हातावर,बोटांवर आणि परकरावरच जास्त चिटकून बसत,पण कधी म्हणून कधी चिडचिड नाही तिची! उत्साह दांडगा..कोण म्हणते पुरे कर? "आता तर कुठे माझ्या शाम्पाकाला शुलवात झाली आहे" मग,आईच काय आजी तरी काय बोलणार?
"होऊन जाऊंदेत ग बाई तुझा शाम्पाक!"
चुरमुर्यांचा भात,इवलूसे पाणी घालून इतका छान मऊ शिजायचा तर कधी एकदम गुरगुटला होऊन पानात यायचा.'वनन डाळीचे' अगदी गरम..गरम हं! ..हळुवार,भुरके न मारता,आवाज न करता प्यावे लागायचे.डाळ अलगद जर वेचू लागले कोणी,तर दटावणी यायची "दाल खायची अश्ते..वेचायची नाही."आईने दिलेल्या पीठाचे चिकट पोळे,लहानग्या पोळपाटापेक्षा हातावर,बोटांवर आणि परकरावरच जास्त चिटकून बसत,पण कधी म्हणून कधी चिडचिड नाही तिची! उत्साह दांडगा..कोण म्हणते पुरे कर? "आता तर कुठे माझ्या शाम्पाकाला शुलवात झाली आहे" मग,आईच काय आजी तरी काय बोलणार?
"होऊन जाऊंदेत ग बाई तुझा शाम्पाक!"
चिमुरडीने उभे राहू लागल्यावर तिच्या लहानग्या चवड्यांवर येउन स्वयंपाक घराच्या ओट्यावर काय चालते ते पाहायला सुरवात केली.हाताचे लहानसे बचकुल,त्याने प्रयत्नपूर्वक ओटा घट्ट धरून हनुवटी ओट्यावर टेकवून,जितके दिसेल ओट्यावरचे आणि समजेल ते पाहण्याचा जीवापाड प्रयत्न असायचा तिचा. अनेक प्रश्नांची सरबत्ती सुरु केली.त्यात काही नवे शब्द शिकून घेतले,आणि मग त्याचा वापर सर्वांवर होऊ लागला.
'भलवने' बाहुलीला आवडता उद्योग! एकदा बाहुलीला हिने चहा देखील पाजलेला.बाहुलीच्या डोळ्यात पाहून ओठांचा चंबू करून "आवल्ला ता तुला ह्म्म ?"असा प्रश्न आला अन मग उत्तर पण आले,"आवल्ला ग तिला तहा "..समाधानाचे ते हसू ह्या बाहुलीच्या आईच्या चेहेर्यावर आलेले स्मरते.अश्यावेळी ही बाहुलीची आई कोण अभिमानाने लेकीने तिच्या चहाचे कौतुक केले म्हणून हुरळून जायची आणि आजूबाजूला केलेला पसारा विसरून जायची.
रोजचा माझा स्वयंपाक आणि तेंव्हांच चाललेला ह्या चिमुरडीचा स्वयंपाक..कसा विसरून चालेल?
चिवड्याला फोडणी टाकली आणि पटकन चिमुरडी बाजूला हजर झाली..आता ती तिच्या आईच्याच उंचीची झाली आहे..आणि आजही तिला स्वयंपाक घरात घुटमळायला तितकेच आवडते.पटकन थोडा चिवडा मुठीत घेऊन,अभ्यासाला पळताना,"माझी आई ग ती! चिवडा मस्तच!",असे म्हणत माझी हि चिमुरडी तिच्या विश्वात हरवली परत...मला मात्र नेहमी चुरमुरे पाहिले कि तिचे ते लहानगे विश्व परत जवळ बोलावते..खुणावते!
-श्रिया (मोनिका रेगे)
-श्रिया (मोनिका रेगे)

खुपच सुंदर लिहीले आहेस गं. सध्या जुईली अशीच वाटीमधे चुरमुरे खाते. थोडेच दिवसांत ती त्यात पाणी घालून तिच्याजवळ असलेल्या घर-संसाराच्या छोट्याशा खेळात भात शिजवेल बघ.
उत्तर द्याहटवाअशीच लिहीत रहा. मस्तं लिहीतेस नेहमीच..
संध्या ताई तुझी जुई माझ्या चिमुरडी सारखेच वाटीत दिलेले चुरमुरे गट्टम करते,हे ऐकून छान वाटले.हेच वय असते बाहुलीशी खेळायचे आणि तिच्यासाठी खास स्वयंपाक करायचे.पुढे मोठे झाल्यावर जो स्वयंपाक आपण करतो त्याला ह्या लहानपणच्या स्वयंपाकाची सर येईल काय!
उत्तर द्याहटवातुझ्या अभिप्रायाबद्दल मनापासून आभार!
so beautiful !!
उत्तर द्याहटवाThank you Deepali.
हटवाkhup chan
उत्तर द्याहटवाDhanyawad!
हटवाकित्ती छान…. चित्र उभं राहिलं डोळ्यांपुढे… :)
उत्तर द्याहटवाडोळ्यापुढे, चुरमुरे हाताच्या ओल्या मुठीत धरून माझी धिटुकली उभी राहिली होती.ते चित्र शब्दरूपात आणण्याचा प्रयत्न केला आहे.इंद्रधनू अभिप्रायाबद्दल धन्यवाद ! :)
हटवाKharach balapan nehami hava-havasach vatta... pan shokantika hi aste ki te magun milat nahi
उत्तर द्याहटवाखरेतर सुटून गेलेले सगळेच क्षण परत येत नाहीत हे सत्य आहे! पण कित्येकांचे बालपण हा आयुष्यातला सर्वात आनंददायी काळ असतो.बालपणावर अनेकांनी लिहिले आहे.कारण अनेक धडे मनावर कोरले जातात आणि आपले संस्कार ह्याच वयात अंगी बाणले जातात.होय परत मिळणे अशक्य! तरीही कडू गोड स्मृती नेहमीच जिवंत राहतात.
हटवाश्रीराज मोरेजी आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार !
आवल्ला! :)
उत्तर द्याहटवाकिती गोड अभिप्राय हा!...आम्हाला " आवल्ला! :)"
हटवा