'जत्रा'


    बरेच काही हरवल्याची खंत मनात घेऊन आणि नवीन काही करण्याची जिद्द मनात ठेवून,नव्या वर्षाचे स्वागत करत पुढे जाताना,जमा खर्चाचा आढावा डोळ्यासमोर आला.प्रत्येक वर्ष अनेक क्षणांचे गुपित घेऊन दारावर येते.वर्षातील बारा महिन्यातला शेवटचा महिना लागला कि काय पटकन वर्ष सरले ह्याची जाणीव होऊ लागते.काय केले,काय नाही ह्याची उलाघाल सुरु होते.पटापट वर्षाच्या शेवटी उरकायची महत्वाची कामांची जमवाजमव करून हे वर्ष संपते आहे असे स्वतःला बजावत हळूच राहिलेल्या कामांची बांधाबांध करायची.
    
   आपले घर,नातेवाईक,शेजारी पाजारी,मित्रमंडळ,कामाच्या ठिकाणी जमवलेली माणसे हि आपली चाकोरी.ह्याबाहेरचे जग म्हणजे अनोळखी माणसांनी भरलेली एक जागा.एका माझ्या सखीचे एक वाक्य आठवले,ती म्हणालेली,'प्रत्येकाची एक विहीर असते,आपली अशी सुखदुःखाची',होय तशीच आपली विहीर आणि भोवतालचे जग.ह्या जगातल्या कडू गोड घडामोडी.ह्यांचा वर्षाचा अहवाल डोळ्यासमोर येतो.
          
  लहानपणी नवे वर्ष यायचे त्या सुमारला दत्त जयंती असायची,‘दत्ताची जत्रा'आणि गावात एक उत्साहाचे वातावरण.एका उंच टेकडीवर दत्ताचे देऊळ.त्या देवळापर्यंत पोहोचायला सुरवातीला कच्चा रस्ता मग पायऱ्या.येणारे नवे वर्ष ह्या जत्रेतल्या उत्साहात गर्दीत,मिसळून,नव्या खरेदीच्याआनंदात,गुलाबी थंडीत,दडीमारून बसल्यासारखे वाटायचे.गरम भज्यांचा वास,भाजलेली कणसे,शेंगदाणे,चणेफुटाणेमोगरा,अबोली,चमेलीच्या वेण्या विकणाऱ्या आयाबाया,बांगड्यांची दुकाने,काचेच्या रंगबिरंगी बांगड्याप्लास्टिकच्या बांगड्या,टिकल्यांची पाकिटे,आणि जाई काजळाच्या डब्या,गंधाच्या चिंचोळ्या बाटल्या,गुलाबी पावडरचे गोल डबे,सौंदर्य प्रसाधने हे सर्व विकत घेणाऱ्या महिलांचे चमकणारे डोळे,petromaxचा उजेड,आणि त्याची थोडीशी मिळणारी ऊब,लिहिताना जणू बाजूलाच आहे असे वाटते आहे.

      अजूनही,उसाच्या रसाच्या दुकानातला येणारा बैलांच्या घुंगुरांचा आवाज आठवतो.दुरून लागलेली वेगवेगळ्या दुकानातली चित्रपटाची गाणी,अद्भुत जादूचे प्रयोग,भविष्य सांगणाऱ्या बाबाचे असलेले दुकान त्यावर मोठा लागलेला भोंगा कंठशोष करून सर्वांना बोलावणारा,शिवाय कुत्र्याचा खेळ,माकडाचा खेळ,मौतका कुआ,लहान मुलांसाठी असणाऱ्या‘बंदुकीने भुगे फोडा',रिंग फेकून बक्षीस जिंका सारखे खेळ होतेच...

         गावात जत्रेच्या तयारीला लोक महिनाभर आधी लागत.देवळाभोवतालचा परिसर नवीन माणसांनी ,विक्रेत्यांनी गजबजून जायचा.एक उत्साहाचे,सोहळ्याचे वातावरण जन्माला यायचे.गावकरी,ग्रामपंचायत काही लहान गावांच्या होतकरू तरुण आणि वयोवृद्ध लोकांच्या मदतीने,कार्यक्रम आखला जात असे.कुठेही कोणताही अपघात होऊ नये,हाणामारी वगेरे सारखे प्रकार घडू नयेत म्हणून पोलीसही सज्ज असत.तो गावकऱ्यांचा एकोपा आणि आपलेपणा,गावातल्या मातीतच सापडू शकतो.अश्यावेळी सगळ्या पाहुण्यांचे गाव स्वागत करी.आणि हा सर्वांचा सोहळा बनून जात असे.येणाऱ्या नव्या वर्षापूर्वी,आपापसातले हेवे दावे,मानापमान विसरून सर्व गावकरी एकत्र येत.वेगवेगळ्या पक्षाचे,लोकही  येथे हजेरी लावत.

       आम्हां लहान मुलांना मात्र जत्रेची म्हणून जी सुटी मिळे त्यात अभ्यासाला बुट्टी हे तर ठरलेले!बाबांचे मित्र आणि त्यांच्या घरातली मंडळी आम्ही सगळे निघत असू जत्रेला..कधी बैलगाडीतून,कधी रिक्षातून तर काही अंतर पायी जात असू.पूर्ण चंद्राची रात्र,रस्त्यावर चंद्रप्रकाश पसरलेला,लवकर जेवण आटपून मंडळी रात्री बाहेर पडलेली,गप्पा रंगलेल्या,हास्याचे आणि बैलगाडीच्या चाकाचे,वाहनांचे आवाज,रिक्षा,टेम्पोच्या हॉर्नचे,पिपाणीचे आवाज, मध्येच येणारा दूरवर बसचा आवाज विसरता येणे शक्यच नाही.डोंगरावरील रोषणाई बघण्यात जी मजा रात्री यायची ती दिवसा यायची नाही.देवळाच्याकडे जाताना पायऱ्यांवर दोन्ही बाजुला बसलेले भिकारी पाहून मनात विचित्र कालवाकालव व्हायची.वाटायचे ह्या सर्वांना देता येतील इतके पैसे यावेत त्या क्षणाला आणि सर्वांना खूप खूप श्रीमंत करावे दत्त देवाने..पण अर्थात लहान मनातली कालवाकालव बाबांना बरोबर कळायची आणि हातात काही दानासाठीचे पैसे यायचे.ते दिल्यावर त्या गरीब अपंग व्यक्तींच्या तोंडून जे आशीर्वाद मिळत,ज्या दुवा मिळत त्या मनात घर करून राहिल्या.
   
      देवळापर्यंत वर खूप पायऱ्या होत्या.सगळेच दिवस वरपर्यंत जाऊन दर्शन घेणे शक्य नसे पण जत्रेत जवळ जवळ रोज जाण्याची पण जिद्द असायची,पण शक्य नव्हते कारण तसे घरापासून देऊळ लांब होते.आणि देवळापर्यंत जायला १५०० पायऱ्या.आम्हीं लहान असताना गावात दूरदर्शनचे प्रस्थ बोकाळले नव्हते आणि केबलचे भूत सर्वांवर बसलेले नव्हते त्यामुळे लोकांना मनमुरादपणे ह्या अश्या सोहळ्यांचा खराखुरा आनंद मिळे .

       बाबांच्या खांद्यावर बसून उंच उंच वाटायचे......खूपच उंच असे वाटायचे कि आकाशीच्या चंद्राला हात लागतील! आणि त्या उंचीवरून जेव्हां बाबा खाली गावातील दिवे आणि रोषणाई दाखवत..काय सुंदर देखावा वाटे! अहाहा! आजही आता ह्या क्षणी ते डोळ्यासमोर उभे असंख्य चमचमणारे लुकलुकणारे जमिनीवर उतरलेले तारेच जणू! ह्या आनंदाची तुलना कशाशीच नाही  होऊ शकणार! जत्रेत मैत्रिणी भेटत असू,गलका व्हायचा.आपापली लहानगी खरेदी अभिमानाने दाखवताना आणि हातातील बताशे,चणे ,फुटणे खाताना कोण आनंद व्हायचा! ह्या जत्रेतून जे काही आणत असू ते आज पर्यंत इतकी वर्ष दर 'दत्त जयंतीला' आठवणीतून परत परत भेटायला येते.नवीन वर्षाचे स्वागत आणि हा असा आनंद ऋतू!

     कधी वाटते कि गेले ते दिन गेले!परत त्या बालपणीच्या नवीन वर्षाच्या आधी येणारी 'दत्ताची जत्रा' त्या लहानग्या विश्वात जशी अनुभवली तशी परत अनुभवता येणार नाही,ते नवे वर्ष जितके खास ह्या जत्रेमुळे वाटायचे ते तसे जाणवणार नाही.आता मोठ्यांच्या मोठ्या जगातली,भारताबाहेर 'गेट टूगेदर न्यू इयर पार्टी',आणि नेहमीचा गोंधळ...आनंदाचा,हास्य विनोदाचा! तो निखळ आनंद ह्या आठवणीतून जपते आहे जो त्या जत्रेत मिळत होता.आताचे बदललेले जग,विस्तारलेले,अनुभवसंपन्न,पण तरीही जेव्हां हे नवे वर्ष साद घालते,दत्ताची जत्रा पुन्हा एकदा तिचे थडीचे दिवस,आणि खूप सारी गम्मत जम्मत घेऊन भेटायला येतेच!

       मनात आले,’आयुष्य देखील जत्रे सारखेच.नवे अनुभव घेऊन येणारे,'नवेवर्ष' ह्या आयुष्याच्या जत्रेतला जणू नवा दिवस!’वर्ष २०१२ ने मनात खूप उलथापालथ केली,काही बदल घडले,पण सुख आणि दुःख  हातात हात घालून असते.ह्या वर्षी दत्त जयंती घरीच साजरी केली.नव्या वर्षाचे आगमन नेहमीसारखेच झाले पण आठवणींनी हळूच दुःख पुसून टाकले आणि उत्साहाचा नवा अंकुर निर्माण केला.

    २०१३, नवे वर्ष श्रुतीसंवेदना ह्या माझ्या ब्लॉग च्या सर्व वाचकांना सुख,शांती आणि समृद्धी घेऊन येवो प्रभूचरणी प्रार्थना!

-श्रिया (मोनिका रेगे ) --

टिप्पण्या

  1. मोनिका..खुपच सुंदर लिहीले आहेस नेहमीप्रमाणे...
    अगदी खरं म्हणतेस..वर्ष सरायला आले की काय राहून गेले करायचे ह्याचा विचार येतोच मनांत.. जत्रेच्या आठवणी मस्तंच...
    अशीच लिहीत रहा...

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद संध्या..:) तुझे आणि काकांचे आशीर्वाद असुदे नेहमी सोबत.

    उत्तर द्याहटवा
  3. खूप छान आठवणी आहेत जत्रेच्या.... मला आमच्या गावाकडची जत्रा आठवली.... :)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद इंद्रधनू..जत्रा जशीच्या तशी शब्दात उभी करण्याचा प्रयत्न केला आहे,पण तरीही कुठेतरी शब्द कमी पडले आहेत असे वाटते.तुम्हाला तुमच्या गावातली जत्रा आठवली हे ऐकून आनंद वाटला.

      हटवा
  4. लहानपणी आजीकडे गेलो की जत्रेची मजा असायची. :)

    छान झालीये पोस्ट.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ