आगंतुक



              खिडकीला टेकून आतल्या भिंतीला ती बसली होती.चुन्याचा लेप दिलेली भिंत.पाठीला चुना लागला असेल कोणास ठावूक!खिडकीच्या गजांमधून थोडासा प्रकाश डोकावत होता.समोर सारवलेल्या जमिनीवर दिवा ठेवेलेला पाहत बसली होती एकटीच.मास्तरांची पाऊले,त्यांची चाहूल लागल्यासारखी बाहेर.उठावेसे पण वाटत नव्हते तिला. मास्तर खरच झोपळ्यावर बसले असतील नेहमीसारखे?

            झोपळ्यावर कोणीतरी बसले आहे खास,कड्यांची करकर...कानात जाते आहे.खिडकी अचानक एका बाजूची बंद झाली उजेड खोलीत कमी वाटला एकदमच."कोण?" तिने विचारले."मी रवींद्र,आत येऊ का?"तिला नाव ओळखीचे वाटले नाही.कशाला उठायचे.तशीच बसून राहिली.पुन्हा एक प्रश्न," हे महेंद्रकरांचे घर ना ?"तिला हुंदका दाटून आला...तिने आवंढा गिळला.कशी तरी उठली.एकदम भोवळ आल्यासारखे वाटले म्हणून खिडकीच्या लाकडी पट्टीचा आधार घेत टेकून उभी राहिली."कोणी आहे का?"परत एक प्रश्न.तिला राग आला होता कि रडू येत होते ह्या प्रश्नांचे ?तिलाच कळेना.प्रश्न विचारणारी व्यक्ती ओळखीची नसावी...
                
            काही दिवस स्वतःचे भानच हरवलेले.तिचे केस,कपडे,जेवण सगळे सगळे बदलले होते.कशाचे वेळापत्रक उरलेच नव्हते.मास्तरांचे अचानक आजारी पडणे आणि काही दिवसात असे निघून जाणे..आई नंतर मास्तरांनी तिला मोठे केले होते.स्वतःच्या मुलीला आईची कमतरता भासू दिली नाही कधी.ती स्वतःच्या बाबांना'मास्तर' म्हणायची ह्याचे शाळेतल्या सगळ्या शिक्षकांना आणि तिच्या वर्गातल्या मंडळींना आश्चर्य पण वाटायचे आणि हसू पण यायचे.पण मग जसजशी ती मोठी होत गेली सर्वांना तिच्या मास्तर ह्या हाकेची सवय झाली.घरात 'मास्तर' अशीच हाक लहानपणापासून तिच्या कानावर आली होती.तिच्या बाबांना घरी येणारे जाणारे 'मास्तरच' संबोधत.मास्तर आई नंतर तिचे आयुष्य घडवत गेले.आई आणि वडील ह्या दोघांच्या भूमिकेत मास्तरांनी शर्थ केली,आणि आज ती जे काही आहे त्याचे पूर्ण श्रेय ती मास्तरांना देते.शाळेतली नोकरी,घर काही मित्र,नियमित घरी येणारे शेजारी आणि ती,
 हे मास्तरांचे विश्व होते.
             
              तिला आता थोडे स्वतःचे आश्चर्य वाटले,एरवी मास्तर असते तर ओरडलेच असते तिला,बाहेर कोणी आले आहे आणि इतका वेळ ती नुसती घरात बसून विचार करत राहिली;पटकन ती दारात गेली.पाहते,तर तिच्याच साधारण वयाचे असे कोणी समोर उभे होते.हातात काही सामान आणि छत्री..काहीतरी होते त्या व्यक्तीत जे तिला अचानक काहीतरी सापडल्यासारखे वाटू लागले.सामान खाली ठेवून त्या व्यक्तीने हात जोडून नमस्कार केला तिनेही यांत्रिकपणे केला पण डोळे मात्र तिचे त्या व्यक्तीवर खिळले होते.तिला त्याचे नाव आठवले.'रवींद्र'.ती म्हणाली "मी शमा,या न आत या,हे महेंद्रकरांचेच घर आहे."

             तो पायावर पाणी घालून हात पुसत ओटीवर येऊन झोपाळ्यावर बसला.त्याची चाल,कुठेतरी पहिली आहे ही..आधी.त्याने सामान कुठे ठेवू विचारले."आपण कुठून आलात आणि मास्तरांना कसे ओळखता?"हा प्रश्न तिच्या ओठांवर आला होता.त्याने स्वतःहून सांगितले," जरा लांबून आलो आहे मी.नातेवाईक आहे महेंद्रकरांचा.थोडा विश्राम करून मग बोलू चालेल का?"तिला हरकत नव्हती.दुपारी आत्याबाई आल्या कपडे धुवायला.त्यांनी रवींद्रला पाहिले आणि एकदम गप्प झाल्या.शमाला आश्चर्य वाटले.आत्याबाई बोलत का नाही आज."अग काही नाही,हे कोण?"  "हे आले आहेत परगावहून ..नातेवाईक आहे लांबचे" असे आत्याबाईंना शमाने सांगितले.रवींद्र खूप मोकळ्या स्वभावाचा असल्याने आणि शांत असल्याने तसा सभ्य वाटला असावा.पण रात्री आत्याबाई झोपायला येईन म्हणाल्या सोबत म्हणून ...
            
           मग मास्तरांबदल बोलणे सुरु झाले...त्याचे डोळे अचानक पाणावले.तिने ते पहिले तो गहिवरून त्यांच्याबद्दल बरच काही बोलत होता.ते त्याला लहानपणापासून ओळखतात असेही म्हणाला.मास्तरांबदल तिला जे माहीत होते तितकंच त्यालाही हे पाहून शमा गोंधळली.रात्री जेवणं आटपून तो म्हणाला," मी १३ दिवस करून जाईन." "हे सगळे इतकं अचानक घडले ना शमा ताई की,मला सुटी काढून येईपर्यंत सगळेच आटपले होते." "त्यांना शेवटचे पाहता पण आले नाही"..अस म्हणून तो अचानक रडू लागला..आणि तिला ते पाहून परत एकदा गहिवरून आले.ती सावरली जणू मोठीच झाली त्याच्याहून आणि त्याला म्हणाली," या तुम्हाला बिछाना घालून देते.काका उद्या येतील.काका काकू मुंबईला असतात.मी पण पुण्याहून आले जेव्हा मास्तरांच्या आजारी पडण्याचे कळले तेव्हा..सुटी  काढली आणि लगोलग आले.मास्तरांना पुण्याला नेणार होतो पण जमले नाही."
               
         रवींद्र सकाळी लवकर उठून ओटीवर झोपाळ्यावर बसला ...शमा बाहेर आली तर म्हणाला,"ताई आज मला काही सांगायचे आहे तुम्हाला.""मला माहीत आहे की ही गोष्ट तुम्हाला कदाचित खूप वेगळी वाटेल." " मला तुम्हीं शांत राहून ऐकून घेणे महत्वाचे वाटते." "कधी कधी अचानक अश्या काही गोष्टी समोर येतात की त्या समजून घेण्याच्या पलीकडे असतात."

         तिने नाश्ता केला होता साधा पण अंगात थोडे बळ आलेले.ती त्याला रवीदादा म्हणू लागलेली तिच्या नकळत. २ दिवसात रवी घरातलाच एक झाला होता.त्याने आपल्या सामानामधून एक तस्वीर काढली.लाकडी फ्रेम  जुना फोटो...तिच्याकडे देत म्हणाला "पहा" ..तिने तो हातात घेतला.तिचे डोळे तीन चेह‍र्‍यांवरून फिरले.पाहिले २ चेहेरे ओळखीचे नव्हते,पण एक मात्र एकदम ओळखीचा,'तिचे बाबा' आज पहिल्यांदा तिच्या मनात तिने'बाबा'अशी हाक मारली होती.पटकन डोळ्यात पाणी आले.मास्तरांचा तरुणपणाचा फोटो,पण त्यात ह्या दोन व्क्ती कोण? एक बाई तश्या देखण्या आणि त्यांच्या जवळ मांडीत बसलेला एक मुलगा.फोटोवर तारीख साधारण १५ वर्षांपूर्वीची होती म्हणजे आज हा मुलगा साधारण तिच्याच  वयाचा असेल एक विचार मनात आला तिच्या...

          "हे तर मास्तर आहेत आणि सोबत ह्या कोण?"असे तिने विचारले..रवी तिच्या जवळ आला आणि तिच्या कडून तो फोटो जवळ घेत म्हणाला,"ताई ही आई माझी आणि हा मी"..तिला काही कळेना..त्याच्याकडे मनातली शंका मनातल्या मनात विचारात ती पाहू लागली..."म्हणजे?नाही आले लक्षात अजून मला...सांगशील का?"तिने एक आवंढा गिळत प्रश्न केला.रवी समोर जाऊन बसला म्हणाला,"ताई महेंद्रकर माझे बाबा ..आणि ही माझी आई जी गावाला असते."

        शमा मटकन खालीच बसली.काय! अशक्य! केवळ अशक्य! तिने अश्या नजरेने रवीकडे पहिले जे तिने आधी कधी कोणाकडे पहिले नव्हते.एक जबरदस्त अविश्वास!ती उठली त्याच्याजवळ तरातरा गेली आणि हातातून तो फोटो हिसकावून घेत परत परत पाहू लागली.मास्तर? तुम्ही? का??खरच? मग मी कोण? शमा महेंद्रकर ?

       प्रश्न.. प्रश्न !! ती आत गेली,स्वयंपाकघराचे दार तिने बंद केले.रवी अजूनही झोपाळ्यावर  होता शांत बसून...पण आता तिला कड्यांची करकर जास्तच ऐकू येऊ लागली. 
                   
          "बाबा,तुम्हीं आणि आई आणि मग रवी आणि त्याची आई असे कसे?"छे सगळे सगळे मनात एकदम नाचू लागले,..इतके वाईट विचार मनात डोकावले.डोके फिरल्यासारखे वाटू लागले.'रवी तू का आलास?आणि नेमका आता? जेव्हा महेंद्रकर नाहीत.''मी त्यांना खडसावून विचारले असते रे तुझ्यापुढे,मला काहीच वाटले नसते.''पण तू उशीर केलास खूप.माझ्या अस्तित्वाला आता मला प्रश्न विचारावासा वाटू लागला आहे.माझे बाबा फक्त माझे असे वाटायचे न मला...शून्यात गेला अभिमान.' 'सगळे एका क्षणात.काय उरले?मी एकटी..रोज सकाळ संध्याकाळ बाबांना पाहत आले मी.' 'मास्तर ..तुम्हाला माझे बाबा समजत होते नं..मग हे काय नवीन? का?शिक्षा की आयुष्यभरासाठी एक विचार जो केला की त्रास होणार मला नि तुला ..रवी तू आला नसतास  तर चालले असते रे'.....

           अचानक दार उघडले तिने आणि बाहेर आली.चेहेरा लालबुंद आणि रडून म्लान झालेला,तशीच त्याच्या जवळ गेली समोर उभी राहिली तो मात्र एकदम शांत.मास्तरांचीच दुसरी प्रतिकृती जणू! तिच्याकडे पाहत होता.आता तिला कळले का तो आला तेव्हा तिला,काहीतरी गवसल्यासारखे वाटले,वेगळेपण जाणवत राहिले होते ते.'काहीतरी मिळाले परत असे वाटून गेले'..तो म्हणाला "ताई" त्या एका  शब्दात  बरच काही होते..ती जमिनीवर बसली,म्हणाली "का आलास तू रवी? मी अंधारातच बरी होते रे..इतका उजेड डोळ्यांना नको वाटतो." "सगळे प्रश्न उलगडावेसे पण वाटतात,पण नको पण वाटते आहे.एकदम शीण आल्यासारखे थकल्यासारखे वाटते आहे".तो म्हणाला "ताई तुम्हाला पाणी देऊ का?...नाही तर  असे करतो मी साधा स्वयंपाक  बनवतो दोघांसाठी." तिला काहीच सुचले नाही.तो उठला आणि स्वयंपाकघरात गेला.

            आत्याबाई आल्या होत्या त्या तिच्या जवळ गेल्या पण तिला कोणीच नको होते ..कोणी कोणी नाही..अगदी एकटे राहायचं होते तिला.ती माडीवर गेली आणि बळेच पडून राहिली.डोळे उघडे आणि आठवणी सगळ्या फेर धरून नाचू लागल्या तिच्या भोवती.मास्तर लहानपणी कसे लाड करायचे,मास्तरांची शिस्त,त्यांचे गाणे,त्यांच्याकडून ऐकलेल्या कथा,त्यांनी तिला आई नंतर सगळे सगळे दिले, तिचे सगळे संस्कार आज तिला जिथून मिळाले होते ते तिचे 'पूजास्थान' आज ते अपवित्र का बरे वाटू लागले तिला?इतकी शिकलेली शमा,इतकी डोळस शमा,आज तिला तिच्या विद्यापीठात सगळे विद्यार्थी विचारतात,इतर प्राध्यापक देखील तिच्या डोळसपणाकडे,सुधारीत विचारांकडे पाहत आले.तिला अचानक वाटले आज तिला शांत का वाटत नाही?मन इतके कलुषित होणे बरोबर आहे? 
                 
        रवी हाक मारत होता त्याने विचारांची शृंखला तुटली.ती खाली गेली.लाकडी पायऱ्या करकरत होत्या..ताट वाटी मांडून रवी तिची वाट पाहत होता."ताई दोन घास जेवून घ्या...मी उद्या संध्याकाळी निघेन..तुम्हाला एकदाच पाहायचे होते मला." "बाबांकडून खूप ऐकले होते तुमच्याबद्दल ."मला त्यांचा सहवास खूप कमी मिळाला..कारण त्यांना शमा ताई महत्वाची होती,कारण ती एकटी होती तिला फक्त बाबा होते." "आईने किती वेळा बाबांना सांगितले,की शमाला इकडे आणा,सगळे मिळून राहू,पण बाबांनी नेहमी ह्या घरातल्या त्यांच्या स्मृतींना मान दिला." "शमा ह्या घरात जन्मली"..ते म्हणत.गोदावरीआईबद्दल पण सांगत आम्हाला.शमा ताई मास्तर वाईट नव्हते..तुम्हाला त्यांचा राग येणे साहजिक आहे;पण मास्तरांनी ह्या गावात आपले जग कधीच उध्वस्त होऊ दिले नाही." "जे गोदावरीआईनंतर त्यांचे नुकसान झाले ते त्यांनी तुम्हाला कधीच भासू दिले नाही." "सावत्रपणाची झळ तुम्हाला जाणवू नये हा प्रयत्न होता त्यांचा.आईला ह्याची कल्पना होती.आईचे पहिले लग्न झाले,आणि नवरा अचानक अपघातात गेला..ती लहान होती,घरची परिस्थिती गरीब पण थोड्या शिक्षणावर तिने शाळेत नोकरी पत्करली..'पुनर्विवाह' ह्या कल्पनेचा दोघांनी समजुतीने स्वीकार केला,मास्तरांचा शमा ताई तुम्हाला मोठे करण्यात जे पहिले ध्येय होते ते त्यांनी आईला नीट समजावले होते." " मास्तर कदाचित तुम्हालाही  योग्य वेळ पाहून हे सांगणार होते पण खूप उशीर झाला."इतके बोलून रवी थांबला....पुढे काहीच बोलण्यासारखे नव्हते.
                
         तिला कल्पना आली..भावना किती कटू असतात.हसवतात,रडवतात,मनात सगळे भाव एकदम दाटून आले कि मग काय करावे कळत नाही.तिला महेंद्रकरांचा मनापासून राग येत होता.चीड आणि नंतर आता ती रवीचे बोलणे ऐकून विचार करू लागली..तिला खरच वाटले कि;तिला आई गेली तेव्हां छे,काहीच आठवत नाही. नंतर देखील जाणवले नाही इतके प्रेम बाबांनी दिले.आज तिला त्यांचा राग आला,का तर त्यांनी दुसरे लग्न केले होते हे तिला कळले..तिच्या भावना दुखावल्या पण तिने जेव्हा रवीकडे पहिले तेव्हां तिला आश्चर्य वाटले.रवी,त्याला कधीच तिच्याबद्दल असूया वाटली नसेल? इतकी वर्ष रवीला बाबा असूनहीन फक्त आई ...'आई आणि बाबा' नाहीत जितके मिळायला हवेत तितके नाहीत,हे असे आजपर्यंत..आणि आज मास्तर गेले ते पण त्याचा निरोप न घेता.

          तिला परत एकदा रडू आले...मनाचे खेळ कसे असतात न? मगाशी माडीवर असताना तिला रवीचा राग येत होता आणि आता तिला त्याची अवस्था तिच्याहून कमी नाही असे वाटले.मास्तरांचा राग आला पण मग वाटले कि त्यांनी जे केले ते माणुसकीला धरून होते..त्यांनी तिच्यासाठी बरच काही केले.रवी आणि आईसाठी केले होते का? कोणास ठावूक!असावे नक्कीच,नाहीतर आज रवी इकडे आला नसता! मास्तरांनी रवीच्या मनात तिच्याबद्दल नक्की काय निर्माण केले की ज्यामुळे आज त्याने 'ताई' अशी हाक मारताच,तिला इतके बरं वाटले होते..आज मास्तर नाहीत पण त्यांनी जे'संस्कार' दिले ते रवीतही दिसत आहेत.तिला जाणवले की रवी स्वतःबद्दल  न बोलता तिच्याबद्दल बोलत होता,मास्तरांबदल सांगत होता,आणि तो उद्या निघणार आहे..आपण एकदाही त्याला  त्याच्याबद्दल काहीच विचारले नाही..त्याच्या आईबद्दल तिच्या मनात अचानक  आदर दाटून आला आणि वाटले त्या आल्या असत्या तर!तिच्या त्या विचारांच्या वेगाला आवरत ती उठली आणि परत एकदा शांत झाली मास्तरांच्या स्वभावातला शांतपणा तिला देखील आला होताच नं !
-श्रिया (मोनिका रेगे )



टिप्पण्या

  1. माणसाच्या मनाचे खेळ किती विचित्र असतात ना... या क्षणी जी गोष्ट चूक वाटते ती थोडा वेगळा विचार केला की दुसऱ्याच क्षणी बरोबर वाटू लागते. जगात बहुतेक चूक आणि बरोबर असं काही नसतच. सगळे असतात ते आपल्याच मनाचे खेळ.... खूप सुंदर मांडलं आहे तुम्ही हे सगळं...

    उत्तर द्याहटवा
  2. इंद्रधनू तुझे अगदी बरोबर आहे.'मनाचे खेळ' हा शब्द रास्त आहे.
    म्हणतात ना 'शेवटी मानण्यावर आहे सगळे!'.........अनपेक्षित असे बरेच काही घडत असते आपल्या जगात,आणि मग त्यातून आनंद तरी जन्मतो नाहीतर वेदना तरी प्रसवते..एखादा आघात झाल्यावर त्यातून सावरून योग्य विचार अनुसरून बाहेर पडणे सोपे नसते...पण ह्या कथेत शमा जे काही अनपेक्षित घडते त्याला जे नीट समजून घेते ते मला महत्वाचे वाटले.
    तुझ्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा
  3. मस्त.. वैचारिक आणि भावनिक द्वंद्वं छान रंगवली आहेत! :)

    उत्तर द्याहटवा
  4. आवडली कथा. अनपेक्षिताला सामोर जाण अवघड असत - विशेषत: आपण हळव्या मनस्थितीत असतो तेव्हा!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. होय सविता ताई तुमचे बरोबर आहे. मनाची तयारी नसते आणि हे असे अनुभव मला वाटते माणसाचे मन खंबीर बनवत असावेत.
      आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

      हटवा
  5. chhan lihilas ga... ase "agantuk prashn" vadaL aanatat manat,aayushyat... samora jana soppa kadhi asata..?? avadli katha.. mast...!

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. धन्यवाद चैताली....
      अनपेक्षित अस बरच काही घडत असते,त्यातले जे आनंदाचे ते अर्थात हवेहवेसे वाटते पण जे त्रासदायक असेल त्याला सहन करणे आणि सामोरे जाणे निश्चितच सोपे नाही. कोणताही गडबडीत,भावनिक होऊन घेतलेला चुकीचा निर्णय मग अश्या वेळी खूप मोठा बदल घडवून आणू शकतो.मन स्थिर ठेवून निर्णय घेणे गरजेचे असते पण खरेतर मला वाटते वादळाची कल्पना आधी कशी येईल? हवामानाचा आढावा नाही तर मानवी आयुष्यातले अचानक येणारे हे वादळ. त्यात आपण पडलो माणसे ज्यांना भावना वेदना जाणवतात मग एखाद्या रोबोट सारखा माणूस अश्यावेळी वागूही शकत नाही...हि कथा मनात आली आणि वाटले कि शमाच्या मनात डोकवावे कि रवीच्या पण मग,'शमा' हे पात्र महत्वाचे ठरवले,आणि लिहिले...:)

      हटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ