'श्रेय '
मी हरवलो आहे ग,पूर्णपणे...स्वतःला हरवून बसणे आणि ते सुद्धा मुद्दाम,हट्टाने,का ते माहित नाही..."सगळ्या प्रश्नांना उत्तरे असतात" हे माझेच वाक्य आहे आणि तुला ते नक्कीच आठवत असेल हे ऐकताना .. उत्तरे असतील,'कारणे'नसतात.'धडा शिकणे' आणि पुढे त्या वाटेकडे न झुकणे हे खूप कठीण असते पण करावे लागते.स्वतःला समजावताना किती महिने गेले असतील...विचार आणि प्रश्न ह्यांच्या गुंत्यात अडकून तोच तोचपणा आला होता.पण हे सगळे नाकारणे म्हणजे स्वतःशी अन्याय करणे झाले असते.खेचाखेची झाली मनात आणि शेवटी खूप ताण आला आणि दोरी किंचित उसवली....तिच्या तुटून हलक्या झालेल्या धाग्यांना काहीच इलाज नाही.दोरी परत तशीच्या तशी नाही होऊ शकणार कधी हे निश्चित.ह्या निर्णयापर्यंत नकळत यावेच लागले.स्वतःला फसवत राहता येणार नव्हते. आशा आणि निराशा ह्यात किती कमी जागा असते हे लक्षात आले.मला 'गद्य' लिहिता येत नसले तरी एक प्रयत्न करतो आहे आज,फक्त तुझ्यासाठी.
आज,'फिरून तुझी आठवण' ह्या माझ्या काव्य संग्रहाला पारितोषिक मिळाले...ते घेताना मंचावर होतो,अनेक मान्यवर कवी मित्र सभोवती होते.अनेकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आपली मूक संमती दर्शवली होती माझ्या यशासाठी.पण माझे मन मात्र तुझ्या खुर्चीकडे धावत होते,डोळे तुला शोधत होते...तू आज हे सगळे पाहून काय बोलली असतीस,किती आनंदित झाली असतीस..तू आलेलीस,मगाशी पाहिले होते तुला,पण थांबली नाहीस...किती हट्टी ग तू! तुझा हट्टीपणा आज पण तसाच राहिला आहे.मी मात्र तुझ्या हरकती कवितेत बंद करत गेलो...तुझ्या निखळ हसण्यातले सौंदर्य किती कवितेतल्या ओळींना आज मिळून गेले बघ !आणि सगळे शब्द तुझ्यासाठी ओतून पण आजदेखील माझ्या मनाची घागर भरलेलीच कशी...?
माझ्या कवितांमधले तुला फारसे काही कळत नसले तरी ऐकून घेत होतीस जेव्हां वाचायचो तुझ्यासाठी..समजून घ्यायचा सुद्धा प्रयत्न केलास,कौतुक आणि ते पण निर्व्याज!'मला अश्या कविता सुचतातच कश्या' हे देखील विचारायाचीस...त्याच त्या एका प्रश्नाचा कधीच कसा नाही ग कंटाळा आला तुला? आणि तो प्रश्न विचारतानाचे तुझे डोळे तितकेच निरागस,जणू पहिल्यांदा कुतूहलाने विचारते आहेस...."तू ह्या सगळ्या कविता प्रसिद्ध का नाही रे करत नुसत्या जवळ ठेवून का देतोस?"...असे म्हणून अनेकदा माझ्यापाठी लागलीस.तुझे प्रोत्साहन कारणी लागले बघ!
समोर बसलेले सर्व लोक आज माझे तुला लिहिलेले हे पत्र ऐकताहेत...आपल्याबद्दल नाही सांगायचे असे ठरवून घेतले होते पण माझ्या आजच्या ह्या काव्यासंग्रहापाठी जी व्यक्ती आहे तिला पूर्ण'श्रेय' द्यायचे होते,त्यासाठी हे जाहीर पत्रवाचन .'शेवटचे पत्र' माझे तुला.
आपल्या आवडी निवडी जपणे,कामाच्या रगाड्यापाठी दिवस अन रात्र धावताना ह्या सगळ्याला वेळ मिळतो का? कसा मिळेल? हे प्रश्न त्रास द्यायचे,पण तू माझे मनोबल नेहमीच वाढवलेस."सगळे आहे तसेच राहत नसते,सगळेच बदलते पण तुझ्या कविता तुला खूप काही देत राहतील नेहमीच "..हे तू मला सांगितलेस.माझ्या कवितेच्या जगात तुला एक अविभाज्य स्थान आहे आणि राहील.कधी सहज न सापडणाऱ्या अश्या अनेक चांगल्या गोष्टी तुझ्यात सापडत गेल्या तश्या माझ्या कविता अजूनच बहरत गेल्या....कधी शिशिर तर कधी वसंत...आणि मोहोर असला कि पानगळीची तू तयारी करून ठेवायचीस...किती ओळखू लागलो एकमेकांना आणि मग जे अंतर कमी झाले ते झालेच!
मन कसे वेळी घट्ट करावे हे मात्र मला शिकवून गेली असतीस तर! तितकेच तुझ्याकडून घ्यायचे राहिले..
'तुझे असणे' आता पूर्वीसारखे जाणवत नाही.तुझा जाण्याचा निर्णय मान्य करताना जग उलटून पडले ते तसेच राहिले ....आजही तुझे पत्र येते पण ते वाचताना मी किती हरवलो आहे ते जाणवते...तू ज्या दिवशी गेलीस त्या दिवशीच्या पाऊलखुणा तश्याच माझ्या हृदयावर कोरल्या गेल्या आहेत ...जखम तशीच राहिली आहे आणि त्या वेदनेशी आपले सुखाचे चार क्षण नेहमीच स्पर्धा करत राहतात मनात.अलगद ऊन पडावे तसा मग एखादा हसरा क्षण घेऊन येतो काही ओळी ज्या हातातली लेखणी कागदावर ढाळते..."माझ्यापासून पळून जाऊ नकोस" इतकच सांगेन..".मला जे वाटले ते सहन कर...मनात जे उद्वेग होते ते समजून घे...तुझ्या पत्रांना मी उत्तरे का देऊ शकत नाही ते तुझ्याहून जास्त चांगल कोण समजू शकेल ग!"
माझ्या काव्यात नेहमी अशीच दरवळत रहा...साकारू देत मला,ते विस्कटलेले जग परत एकदा.प्रत्यक्ष कोण जाणे,पण अप्रत्यक्ष साथ देत आहेस....तितकी तरी देशीलच....शपथ आहे! म्हणू का?,कि तुला शपथा लक्षात राहत नाहीत! आता हे पत्र इकडेच संपवतो....आणि तुझ्या आयुष्यातल्या सर्व सुखासाठी मनोमन प्रार्थना करतो....किती सारे देत गेलीस ....शतजन्म पुरणार नाही इतके काही उरले आहे ग.!!....
आजच्या माझ्या यशापाठी तू आहेस फक्त तू! एक करशील माझ्यासाठी? माझ्यागत हरवू नकोस कधी!
तुझाच.........
- लेखिका श्रिया (मोनिका रेगे )
- लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

छान लिहिलं आहेस! सगळं असून देखील काही नसल्याची भावना छान व्यक्त केली आहेस. एका यशस्वी परंतु तरीही व्याकूळ मनाची ओढ जाणवते.
उत्तर द्याहटवातुझ्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद कौस्तुभ.... 'श्रेय'ह्या संकल्पनेला मुळात खूप महत्व असते ..एखाद्याच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना कधी कधी इतक्या पूरक असतात कि त्या व्यक्तीला कुठच्या कुठे न्हेऊन ठेवतात....उच्चांक गाठते ती व्यक्ती....मग आपल्या ह्या आजच्या यशापाठी कोण आहे असा एक प्रश्न येतो..आणि त्याची वेगवेगळी उत्तरे असू शकतात..ह्या लेखातला कवी त्याच्या यशाचे श्रेय तिला देतो....आणि तिच्या अस्तित्वाचा अंश त्याच्या कवितेत नेहमी असतो हे मान्य करतो.कित्येकांचे पाठबळ,आशीर्वाद,प्रोत्साहन ह्या मोठ्या लोकांच्यापाठी असते...पण श्रेय देणे आणि ते देखील जाहीर आणि मनापासून खूप मोठी गोष्ट आहे....
हटवात्याच्या व्याकूळ भावना छान उतरल्यात! कोणाच्या तरी प्रोत्साहनाची माणसाला सतत गरज असते. जर कोणी पाठबळ देणारे, कौतुक करणारे नसेल तर या प्रवासातली जान हळूहळू हरवून जाईल.
उत्तर द्याहटवा" श्रेय देणे आणि ते देखील जाहीर आणि मनापासून खूप मोठी गोष्ट आहे.... " +१००
मोठी मोठी लोकंही हे करत नाहीत.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद !....
हटवाभानस तुझे म्हणणे अगदी खरे आहे...:)
बकुळीचा गजऱ्याने सुगंधाची उधळण व्हावी तसा तिचं अस्तित्व लेखभर जाणवतेय...
उत्तर द्याहटवाअन त्याचे श्रेय तो गजरा सुकण्याआधीच मिळावे हा सुंदर योग ...
भक्ती
अभिप्राय पण किती सुंदर लिहितेस ग भक्ती....शब्द मनात घर करून रहातात तुझे!!
हटवाखूप सुंदर. प्रत्येकच गोष्टीमागे कोणाना कोणाचं श्रेय असतं. आणि कृतद्न्य लोक ते ज्याचं त्याला देतात, किंवा काहींना ते कोणाचं आहे हेच कधी समजत नाही. पण ज्याचं श्रेय त्याला देणारा हा लेख खूप आवडला.
उत्तर द्याहटवाखरे आहे इंद्रधनू....कृतज्ञता व्यक्त करणे,मोकळेपणी श्रेय देणे मोठ्या मनाचे द्योतक आहे.बोलक्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!
हटवा