नवे घर....


       नवीन जागा,नवीन घर,सगळे आजूबाजूचे वातावरण बदलणार हे नक्की,पण आधीच्या घराचा सहवास अगदी भिंतन भिंत आणि कोपरान कोपरा ओळखीचा झालेला.पहिले पाऊल टाकले ते ह्याच घरात इकडे आल्यावर,,त्यामुळे आता इतक्या दिवसांची,म्हणायला वर्षांची सवय मोडून पुढे जायचे,'सवय मोडून' हा शब्द अगदी जाणवतो आहे...मनाला काहीतरी वेगळेपण,मोठा बदल होणार आहे ह्याची जाणीव होते आहे..हे न,सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत होते,नाहीका?प्रत्येकाच्या बाबतीत,मात्र वेगवेगळ्या गोष्टींची सवय झालेली मोडायची,वेगवेगळे अनुभव.

       आपली घरातली स्वयंपाक खोली.विशेष ओळखीची माझी अशी,आता तिच्यातल्या सगळ्या लहान गोष्टी,भांडी रिकामे करून नीट एका ठिकाणी करायचे,त्या खोलीला पण त्या भांड्यांची,माझी सवय झाली असेल असे कुठेतरी वाटले.स्वयंपाकघर,तिकडे अगदी उत्तम पाककृती पासून अगदी साफ वाट लागलेल्या पाककृती पर्यंत अनेक अनुभव.नवीन आणलेल्या भांड्यांचा सेट,ते लावलेले स्वयंपाकघर.घरातली प्रत्येक खोली छान लावलेली,सगळे समान आता परत बांधायचे..घरातली पुस्तके एकत्र करून ठेवणे,जुने सामान काही त्यातले देऊन टाकणे किवा काही सोबत न्हेणे.घर अश्या वेळी अनोळखी दृष्टीने आपल्याकडे पाहत असल्यासारखे भासते.मनात कसलीतरी कालवाकालव होते मग!

        प्रत्येक वास्तूचे स्वतःचे असे एक अस्तित्व असत अस वाटत आले मला.घरातले देवघर,घराचे एकूण स्वरूप...तुम्हीं घर कसे नीटनेटके ठेवता ह्यावर पण आहे,पण प्रत्येक आपल्या घरातली वस्तू समजून घेणे महत्वाचे असते.प्रसन्न वाटेल असे नेटके लहानसे छानसे हे घर आता सोडून नवीन जागेत जायचे हा एक मोठा बदल आहे अनेकांना ह्याचा अनुभव येत असावा.काहींना हि गोष्ट अगदी काहीच वाटत नाही.काहींना थोडीशी त्रासदायक वाटते.त्रास जागा सोडून जाण्याचा कमी आणि सगळी सामानाची बांधाबांध,आणि बाकी येणारी सोबत सगळी कामे त्याचा कंटाळा असावा.....मला काय वाटते आहे...खरे सांगू? आनंद हो,होतो आहे पण मिश्र भाव आहेत मनात.काहीतरी इकडे इतकी वर्ष गवसलेले,एखादा रोप वाढते तसे अनेक अनुभवांचे,एक रोप वाढलेले ते इथे.त्या रोपाला उचलून परत दुसरीकडे नव्या जागेत रुजवायचे.प्रयत्न करायचा.मग 'निवास' म्हणतात शांत प्रफुल्लित असे जे घर,तिकडे नेहमीच चित्तवृत्ती सकारात्मक राहते.
               
      कशी असेल नवीन जागा? नुसती पाहून बाहेरून कल्पना येते पण प्रत्यक्षात जागेत जाऊन राहिल्या शिवाय कळू नाही शकत कि कसे वाटेल....सुरवात तर करायची आहे नक्कीच,मनात येते कि हि जी तळमळ वाटते आहे जागा बदलताना स्वतःच्या घरात जाताना ती नुसती आनंदाने भरलेली नाही आनंदासोबत काहीतरी हरवणार आहे ह्याची जाण आहे,घरासोबत आजूबाजूचा परिसर,शेजारी सगळेच आता बदलणार..'बदल'. होत असतो मान्य करावा लागतो इतकच!

       लहानपणी एकदा जागा बदललेली आठवते.तेव्हा इतके कळत नव्हते किवा अभ्यास खेळ आणि लहान वय ह्यामुळे असेल लक्षात नाही आले विशेष.शाळा बदलली ते मात्र प्रचंड जाणवले.नवीन जागेत आलो नवीन रंगाचा वास,नवीन भिंती मोठी जागा,'आपले घर' हि भावना तेव्हां जाणवू लागली.माझी आणि बहिणीची अशी स्वतंत्र खोली मिळाली,,आमची अशी...वेगळे वाटले,खूप छान वाटले.गच्ची मोठी खेळायला आणि नवीन शेजारी पण सगळे चांगले.नवीन ओळखी नवीन माणसे जोडली गेली.एका गावातून शहरात आल्याने मनाचे पण थोडे शहरीकरण झाले.तरीही मला ती गावातल्या त्या घराची ओढ मात्र नेहमीच राहिली.गावातले आमचे घर हे एका वाड्याचा एक भाग होता..खेळायला चिक्कार जागा,आणि तसे सवंगडीही मिळाले होते.सगळे सण नातेवाईक आणि शेजाऱ्यान सोबत साजरे केले,शेजारी घरच्या सारखेच झालेले.गावात लहानसे मार्केट तिकडची फेरी बाबांच्या सायकल वर स्वार होऊन,नंतर बाबांनी गाडी घेतली तो पर्यंतचा प्रवास,,किती पटकन गेली वर्ष अस वाटते!पण तरीही ते जुने भाड्याचे लहानपणातले घर मागची वाडी,सगळ्याचे एक 'कोकण चित्र' मनाच्या पटलावर कोरले गेले आहे.
                 
        तसच आता इकडे हि काही वर्ष,जागेशी निर्माण होणारे नाते घनिष्ठ असते नाही?त्या जागेत काहीतरी असते जे आपल्याला परत त्या दिशेने खेचत असते.आजही मी भारतात गेले कि गावाकडे फेरी मारते आणि त्या घराला एकदा डोळे भरून पाहून घेते.आता ते बदलले आहे पण तरीही ते मुळात तेच आहे त्याचा पाया तोच राहिला आहे,माझ्या अमाप आठवणींचा पाया.आताचे घर त्याने देखील खूप काही दिले सोडताना त्रास अटळ आहे.पण नवीन स्वतःच्या घराची ओढ पण आहेच.आलेले सर्व बदल स्वीकारणे हेच तर आयुष्य आहे!नाही का? 

       नवे घर नवा परिसर पण तरीही जुने सोडताना मन हळवे होतेच आहे....नवीन वर्षाची सुरवात, नव्या घरात...
-लेखिका श्रिया (मोनिका रेगे )

टिप्पण्या

  1. काय योगायोग आहे ग बरोबर दोन वर्षांपूर्वी आम्ही पण असेच घर बदलले होते आता तू नेमक्या त्याच हंगामात मूव होतेस..खूप हळवं असेल न सध्या? मला माझे दिवस आठवले...वाचलं असशील कदाचित ...

    http://majhiyamana.blogspot.com/2009/11/blog-post_12.html

    कुठे निघाली आहेस? खूप खूप शुभेच्छा...

    उत्तर द्याहटवा
  2. अपर्णा छान वाटले तुझा अभिप्राय वाचून आणि तुझ्या शुभेच्छा पण मिळाल्या....:)आहे तिकडून जवळच जाते आहे साधारण २० मीन. गाडीने इतकाच बदल..हा एरिया सोडायचा नव्हता आणि त्यामुळे थोडे थांबले होते.....apartment मधून घरात..त्यामुळे आणि जागा पहिल्यांदा बदलते आहे त्यामुळे मनात हुरहूर आहे.हळवं तर वाटतेच आहे तू सुद्धा ह्याच हंगामात मूव झालेलीस न!ह्या आठवणी दगदग होत असेल तरीही,उत्साह वाढवून गेलेल्या असतात त्यामुळे तुला पण आठवले न मुविंग'नवे घर'वाचून?

    उत्तर द्याहटवा
  3. नवीन घरात छान वाटतं पण जुन्या घराच्या काही आठवणी आजिबात जात नाहीत :)

    उत्तर द्याहटवा
  4. इंद्रधनू तुझ्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद....
    नवीन घर,नव्या जागेत,जुन्या घराच्या आठवणी घेऊन जाते आहे....

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ