!!! शुभ दीपावली !!!

        
     दिवाळी...........दिव्यांची,आकाश कंदीलांची,रांगोळीची,अभ्यंगस्नानाची,फराळाची,फटाक्यांची,बहार!

         वर्षातून एकदा येणारी हि दिवाळी सगळ्यांना आनंद देते.अनेक शुभेच्छा,भेटकार्डासोबत आणि मिठाई सोबत मैत्री घेऊन येते. हास्य विनोद,गप्पा रंगतात.नातेवाईक,आप्त,सर्वांच्या मेळाव्यात,एकत्र आनंदात सहभागी होऊन आपण आपले रोजचे जग थोडे बाजूला ठेवतो.दिवाळीच्या प्रत्येक दिवशी सणाचे महत्व जाणवते.लहानांना दिवाळीची गोष्ट सांगून पुढे दिवाळी अशीच येत राहावी आणि साजरी होत राहावी असा मोठ्यांचा प्रयत्न असतो.सर्वांना हा सण खूप आवडतो.नवीन कपडे,नवीन खरेदी आणि त्यासाठी लोकांची बाजारात झालेली गर्दी, उडालेली झुंबड,किती किती उत्साह ओसंडत असतो सर्वत्र!
     
     
           धनत्रयोदशी,नरक चतुर्दशी (छोटी दिवाळी),लक्ष्मीपूजन,पाडवा किवा बलिप्रतिपदा आणि भाऊबीज....तुळशी विवाह  हे दीपावलीचे दिवस .श्री राम जेव्हां रावणाचा वध करून सीतामाई आणि लक्ष्मण ह्यांसोबत अयोध्येला परत आले तेव्हां सर्व नागरावासियांनी आपला आनंद सर्वत्र रोषणाई करून प्रकट केला होता.ह्या दिवशी प्रभू रामचंद्राचे स्वागत करताना प्रजेने घरात गोड बनवून आणि सर्वत्र दिव्यांची रांग ठेवून 'दीपावली' साजरी केली होती,असे सांगण्यात येते.हा विजय दुष्ट, प्रवृतींवर सकारात्मक वृत्तीने मिळवलेला 'सुजय' होता म्हणून हिंदू धर्मात दीपावलीचे खास महत्व आहे!

      
             प्रत्येक दिवसाचे आपले एक महत्व आहे.दिवाळी चा दिवस जो 'धनत्रयोदशी' आहे त्या दिवशीची कथा अशी सांगण्यात येत कि जेव्हां 'समुद्र मंथन' झाले तेव्हां त्यातून 'अमृत कलश' घेऊन 'धन्वंतरी' बाहेर आले.हा 'अमृत कलश' मानवजातीच्या कल्याणासाठी होता. म्हणून ह्या दिवसाला 'धनत्रयोदशी' म्हणतात,लक्ष्मी देवी पण ह्या दिवशी घरात येते.....लहान पावले काढून तिचे घराघरात स्वागत करतात.'नरक चतुर्दशी' ह्या दिवशी पहाटे उठून 'अभ्यंगस्नान' सुवासिक उटणे,तेल लावून करण्यात येते. देवाची सर्वांनी पूजा करून,एकत्र फराळ केला जातो.ह्या दिवशी नरकासुराचा भगवान श्री कृष्णाने वध करून त्याच्या कैदेत असलेल्या अनेक ऋषी आणि देव कन्यांना मुक्त केले तसेच देवी अदितीची कर्णकुंडले तिला परत नेऊन दिली.ह्या दिवशी घराघरात उत्साहाने 'छोटी दिवाळी' साजरी होते. 'लक्ष्मी पूजनाच्या' दिवशी अमावस्या असते पण ह्या दिवशी घराघरात लक्ष्मी  देवीच्या स्वागतासाठी रोषणाई केली जाते,धनाची पूजा देवीच्या मूर्तीची पूजा केली जाते.कोणत्याही आर्थिक कार्याला सुरवात ह्या पूजेनंतर करता येते.देवी लक्ष्मी घरात यावी आणि सर्वांचे कल्याण करावे अशी प्रार्थना करण्यात येते.फटाके आणि दिवे, दिवाळीच्या दिवसांचे हे तर वैशिष्ठ्यचं आहे.'बलिप्रतिपदा','पाडवा' ह्या दिवशी पण घरात एक खास उत्साह असतो,पत्नी पतीचे औक्षण करते. उत्तर हिंदुस्तानात गोवर्धन पूजा केली जाते.
'भाऊबीज' ह्या दिवशी भावाला बहिण ओवाळते, आणि त्याच्या आरोग्य आणि  दीर्घआयुष्यासाठी प्रार्थना करते.

     
         दिवाळीत मला आवडणाऱ्या दिवसांपैकी भाऊबीज हा एक दिवस आहे. लहानपणी खास धमाल यायची जेव्हां सगळे जण एकत्र जमून दिवाळी साजरी करत असू.आजी आजोबा होते, घरात सगळे काका काकू आणि भावंडे जमत असू.फराळाचे पदार्थ, ते सर्व घरी आई आजी बनवत असत.त्यांची चव आजही आठवते.रांगोळी,दिवाळीतला बाले किल्ला,आकाशकंदील आणि दिव्यांची माळ, सगळे सगळे अगदी काल परवा घडल्यासारखे डोळ्यांसमोर येते.फटाक्यांची खरेदी पण आठवते.....आठवणींचा हा एक फायदा आहे ,परत एकदा बालपणाच्या कुशीत शिरते तेव्हां दिवाळी बरंच काही देऊन जाते.

     
       दिवाळीची सुटी लागली रे लागली कि सगळी तयारी न सांगता पटापट आम्हीं करत असू, घरात सगळे जमणार ह्या कल्पनेने उत्साह दुप्पट वाढत असे.एक वेगळाच आनंद सगळीकडे असायचा,सगळ्या शेजाऱ्यांच्या घरात देखील असेच वातावरण असायचे. दिवाळीसाठी फटाके,दिवे,रांगोळीसाठी लागणारे सर्व साहित्य आकाशकंदील,ह्या सर्वांचे आगमन दुकानांमध्ये आधीच झालेले असायचे. लहानपणी गावात होतो त्यामुळे घरासमोर ओट्यावर सुरेख रांगोळ्या दिसत.दिवाळीची सकाळ पण फटक्यांनी आणि उदबत्तीच्या सुवासाने भरून जायची. हवेतला पहाटेचा गारवा आणि लांबून येणारा फटाक्यांचा आवाज, काही खास असे होते जे शब्दात लिहिता येत नाहीये पण आता अनुभवते आहे हे नक्कीच! 

  
         आजही दिवाळीचे महत्व कायम आहे आणि पुढील सर्व पिढ्या नक्कीच हे महत्व टिकवून ठेवतील....खूप छान संस्कारांनी परिपूर्ण अशी हि दिवाळी हा आपला सण सर्वांच्या आयुष्यात आनंद घेऊन येवो!!!

    



   

 


 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कविता

श्री गुरूदेव दत्त !

एक लोभस संध्याकाळ