एक रूपक
एक सावली उन्हाच्या अगदी जवळपास विसावलेली. उन्हाचा रट्टा, दुपारचा कडक फटका तिच्या अंगवळणी पडलेला,सवयीचा झालेला. त्याची तगमग, म्हणजेच त्याच्या मनातली झळ. सावली गार, सतत थंडावा देणारी.तिचे वेगवेगळे आकार,तिच्या वेगळंवेगळ्या लांब्या. ऊन पण कमी जास्त होणारे,तो उन्हासारखा. अचानक तापणार; पण ती मात्र सतत सावली सारखी मागे पुढे धावत त्याच्या. ह्या दोघांमध्ये येणार म्हणजे फक्त पाऊस! तो आला कि असा गारवा पसरतो कि ऊनं नाहींसे झाल्यागत आणि सावली हरवलेली. हा पाऊस त्या दोघांना त्यांच्या कामांपासून,थोडा वेळ कुठेतरी लांब घेऊन जाऊन, कधी गडगडाट करत तर कधी चमचमाट करत राहतो. त्या दोघांना पाऊस आवडतो,मनापासून ! मग स्वप्न फुलतात,गीते उमलतात,नवीन मनाला पालवी फुटते . तो त्याची कटुता विसरू लागतो. त्याच्यातले ऊन निवू लागते.आनंदाचे तुषार आणि भावनांचा पाऊस ! तिची सावली त्याला काही काळ नकोशी होते. ती दुरावते,थोडी रुसते.स्वतःत गुरफटते.त्याच्याकडे पाहून न पाहिल्यासारखे करणे खूप अवघड असते पण ती तरीही ते झेलते . ऊन सावलीला दुरावते....