आगंतुक
खिडकीला टेकून आतल्या भिंतीला ती बसली होती.चुन्याचा लेप दिलेली भिंत.पाठीला चुना लागला असेल कोणास ठावूक!खिडकीच्या गजांमधून थोडासा प्रकाश डोकावत होता.समोर सारवलेल्या जमिनीवर दिवा ठेवेलेला पाहत बसली होती एकटीच.मास्तरांची पाऊले,त्यांची चाहूल लागल्यासारखी बाहेर.उठावेसे पण वाटत नव्हते तिला. मास्तर खरच झोपळ्यावर बसले असतील नेहमीसारखे? झोपळ्यावर कोणीतरी बसले आहे खास,कड्यांची करकर...कानात जाते आहे.खिडकी अचानक एका बाजूची बंद झाली उजेड खोलीत कमी वाटला एकदमच."कोण?" तिने विचारले."मी रवींद्र,आत येऊ का?"तिला नाव ओळखीचे वाटले नाही.कशाला उठायचे.तशीच बसून राहिली.पुन्हा एक प्रश्न," हे महेंद्रकरांचे घर ना ?"तिला हुंदका दाटून आला...तिने आवंढा गिळला.कशी तरी उठली.एकदम भोवळ आल्यासारखे वाटले म्हणून खिडकीच्या लाकडी पट्टीचा आधार घेत टेकून उभी राहिली."कोणी आहे का?"परत एक प्रश्न.तिला राग आला होता कि रडू येत होते ह्या प्रश्नांचे ?तिलाच कळेना.प्रश्न विचारणारी व्यक्ती ओळखीची नसावी... ...