नवे घर....
नवीन जागा,नवीन घर,सगळे आजूबाजूचे वातावरण बदलणार हे नक्की,पण आधीच्या घराचा सहवास अगदी भिंतन भिंत आणि कोपरान कोपरा ओळखीचा झालेला.पहिले पाऊल टाकले ते ह्याच घरात इकडे आल्यावर,,त्यामुळे आता इतक्या दिवसांची,म्हणायला वर्षांची सवय मोडून पुढे जायचे,'सवय मोडून' हा शब्द अगदी जाणवतो आहे...मनाला काहीतरी वेगळेपण,मोठा बदल होणार आहे ह्याची जाणीव होते आहे..हे न,सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत होते,नाहीका?प्रत्येकाच्या बाबतीत,मात्र वेगवेगळ्या गोष्टींची सवय झालेली मोडायची,वेगवेगळे अनुभव. आपली घरातली स्वयंपाक खोली.विशेष ओळखीची माझी अशी,आता तिच्यातल्या सगळ्या लहान गोष्टी,भांडी रिकामे करून नीट एका ठिकाणी करायचे,त्या खोलीला पण त्या भांड्यांची,माझी सवय झाली असेल असे कुठेतरी वाटले.स्वयंपाकघर,तिकडे अगदी उत्तम पाककृती पासून अगदी साफ वाट लागलेल्या पाककृती पर्यंत अनेक अनुभव.नवीन आणलेल्या भांड्यांचा सेट,ते लावलेले स्वयंपाकघर. घरातली प्रत्येक खोली छान लावलेली,सगळे समान आता परत बांधायचे..घरातली पुस्तके एकत्र करून ठेवणे,जुने सामान काही त्यातले देऊन टाकणे...