चिन्मयचा 'किल्ला'
त्याच्या लहानग्या विश्वात एक खूप मोठे वादळ आलेले असते.त्याचे बाबा जातात.आईची बदलीची नोकरी.पुणे सोडून,पुण्यातील मामा,मामेभाऊ खूप जवळचा,सोडून कोकणातील समुद्राकाठी वसलेल्या एका गावात तो आलेला असतो.जागा नवीन,कोकणचा खारा वारा,कौलारू लहानगे घर,घराच्या आजूबाजूला नारळीची झाडे,वाडीतले ओहोळ आणि कोकणी पोरे काही उनाड मस्तीखोर.शब्दातली गम्मत त्यातल्या एकाच्या तोंडी 'यक्कु'शब्द घर करून बसलेला. त्याला वेगळे वाटते हे सगळे पाहून………. आपण इकडे का आलो आहोत अशी विचारणा आईकडे होते.त्यात मुसळधार कोसळणारा पाऊस.चिंब भिजवणारा.ढगांचा गडगडाट आणि खवळलेला सागर,किनाऱ्यावर आदळणाऱ्या उसळलेल्या लाटा.आभाळ पावसाळी ढगांनी माजलेले आणि काळोख दाटलेलं आसमंत.दूरपर्यंत राखाडी रंगाचे वाटणारे क्षितीज,त्याच्या मनाची घालमेल.पावसामुळे जाणारी वीज आणि कंदिलाच्या प्रकाशात मावळती,पावसाळलेली संध्याकाळ. नवीन शाळा नवीन जग बदललेले ओलेचिंब,एकटे भासणारे....