गंधस्मृती
ह्या घरात रहायला आल्यापासून उंच इमारतीतून दिसणारे जग, एकदम जमिनीच्या पातळीवर आल्यासारखे भासू लागले आहे . दार उघडून पटकन बाहेर उडी मारली कि घरासमोरचा लहानगा रस्ता, दुतर्फा उंच झाडे असलेला . सदाहरित असे हे वृक्ष आणि सतत सावली आणि थंडावा जपून ठेवणारे . आता निसर्ग ‘ एका दारापलिकडे’ असेच काहीसे वाटू लागले आणि त्यात वसंताने तर सगळे काही बहरवून टाकले आहे ह्या वर्षी. बघावे तिथे रंगबिरंगी फुले आणि फुलपाखरे . अशीच कोपऱ्यावर नेहमीचा फेरफटका मारायला बाहेर पडलेले . माझे घर डोंगरावर असल्याने चढ उताराच्या रस्त्यांचे साम्राज्य सगळीकडे . नवा रस्ता दिसला आणि त्यावर पाऊल टाकले . बंगलीवजा घरांचे वेगवेगळ्या रंगाच्या छपरांचे , दरवाज्यांचे , सुंदर बागीच्यांचे निरीक्षण चालले असताना अचानक एक अतिशय मंद सुगंध आला . कुठून येत आहे ते कळेना . मोहक आणि स्वतःकडे खेचून घेणारा असा हा दरवळ मला बरीच वर्ष मागे घेऊन गेला . गंधांचे एक आ...